अपयशामुळेच रैना संघाबाहेर

0
204

>> २०१८-१९ मोसमात दिलेली संधी गमावली ः प्रसाद

सुरेश रैनाला पुनरागमनाची पुरेशी संधी देण्यात आली होती. परंतु, २०१८-१९ मोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्ये अपेक्षित प्रदर्शन करण्यात आलेल्या अपयशामुळे रैना ‘टीम इंडिया’मध्ये पुनरागमन करू शकला नाही, असे टीम इंडियाच्या निवड समितीेचे माजी प्रमुख एम.एस. के. प्रसाद यांनी काल मंगळवारी सांगितले.

डावखुर्‍या रैनाने काही दिवसांपूर्वीच निवड समितीवरील आपली नाराजी जाहीर करताना वरिष्ठ खेळाडूंना अधिक सन्मानाने वागवायचा सल्ला दिला होता. ३३ वर्षीय रैनाने भारताकडून २२६ वनडे, ७८ टी-ट्वेंटी व १८ कसोटी सामने खेळले आहेत. इंग्लंडमध्ये जुलै (२०१८) रैना आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

मागील वर्षी रैनाने नेदरलँड्‌स येथे जाऊन आपल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करवून घेतली होती. पुनर्वसन पूर्ण झाल्यानंतर आपली आयपीएल फ्रेेंचायझी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमनाचा रैनाचा प्रयत्न होता.

१९९९ साली व्हीव्हीएस लक्ष्मणला खराब कामगिरीमुळे कसोटी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. लक्ष्मणने यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये १४०० पेक्षा अधिक धावा करत संघातील गमावलेले स्थान परत मिळविले होते. याच तर्‍हेच्या कामगिरीची अपेक्षा वरिष्ठ खेळाडूंकडून असते, असे प्रसाद यांनी रैनाचा उल्लेख न करता सांगितले. २०१८-१९ रणजी मोसमात रैनाला २ अर्धशतकांसह केवळ २४३ धावा करता आल्या. आयपीएलच्या इतिहासात सवाधिक धावा करणार्‍यांमध्ये दुसर्‍या स्थानी असलेल्या रैनाला १७ सामने खेळूनही २०१८-१९ आयपीएल मोसमात अवघ्या ३८३ धावा जमवणे शक्य झाले होते. यामुळेच विश्‍वचषक स्पर्धेत खेळण्याचे त्याचे स्वप्न भंग पावले होते. एरव्ही आयपीएलमध्ये दाखवत असलेले सातत्य रैनाला देशांतर्गत क्रिकेटमध्ये दाखवता आले नाही. त्याचवेळी देशांतर्गत तसेच ‘अ’ संघाकडून खेळताना अनेक नवोदित खेळाडूंनी खोर्‍याने धावा जमवल्या, असेही प्रसाद यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच रैनाने ‘स्पोटर्‌‌स तक’ शी यूट्युबवर बोलताना निवड समितीवर टीका केली होती. संघातून वगळतानाचे कारण अजूनही मला सांगण्यात आले नाही, असे रैनाने यावेळी म्हटले होते. माझ्यात काही उणीवा राहिल्या आहेत तर दाखवून द्यायच्या होत्या. मेहनत घेऊन मी त्या दूर केल्या असत्या, असेही रैना म्हणाला होता. बीसीसीआय निवड समितीमधील किती सदस्य मैदानावर उपस्थित राहून रणजीचे सामने पाहतात, असा सवालही रैनाने केला होता.
प्रसाद यांनी मात्र रैनाच्या या आरोपांचे दुःख झाल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशचे सामने मी स्वतः कानपूर व लखनौ येथे जाऊन पाहत होतो. माझे तत्कालीन सहकारी अनेक सामन्यांना हजर राहत असत तसेच सातत्यपूर्ण खेळाडू, अडखळत खेळणारे खेळाडू, प्रतीभावान खेळाडू व पुनरागमन करणार्‍या खेळाडूंची विशेष नोंद ठेवत होते, असे सांगताना प्रसाद यांनी रैनाला फटकारले. मागील चार वर्षांत निवड समिती सदस्यांनी मिळून २०० पेक्षा जास्त रणजी सामने पाहिले आहेत, असे प्रसाद यांनी अभिमानाने सांगितले.

संघातून बाहेर बसवल्यानंतर रैनाला त्याचे कारण सांगण्यात आले होते. संघात परतण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा, याची माहिती मी स्वतः रैनाला दिली होती, असा सांगताना प्रसाद यांनी रैनाच्या आरोपांचे खंडन केले.

१९८३ सालच्या विश्‍वचषकाचा नायक मोहिंदर अमरनाथ यांचा आदर्श रैनाने ठेवणे गरजेचे आहे, असे प्रसाद यांनी सांगितले. आपल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत कित्येकदा खराब कामगिरीमुळे संघातून वगळण्यात आल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेहनत घेऊन पुन्हा संघात प्रवेश मिळवण्यामध्ये अमरनाथ यांचा हात अजून कुणीही धरला नसल्याचे प्रसाद यांनी उल्लेख केला.