गोवा मानवाधिकार आयोगाने गेल्या 3 ऑगस्ट रोजी मेरशी येथील ‘अपना घरा’च्या केलेल्या पाहणीमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या असून, अपना घरामधील सुरक्षा आणि पायाभूत सुविधांबाबत चिंता व्यक्त केली आहे. अपना घराच्या छताची पडझड होऊन त्यातील लोखंडी सळ्या उघड्या पडणे, सात सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे, पथदीप निकामी असणे आणि मुलींच्या वसतिगृहाजवळ सुरक्षा जाळ्यांचा अभाव यांसारख्या समस्यांचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अपना घराच्या तातडीने दुरुस्तीसाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही, पाहणीच्या तारखेपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती, असे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. आयोगाने इमारतीची तातडीने दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेरे व पथदीप पूर्ववत करणे, सुरक्षा जाळ्या बसवणे आणि परिसराची नियमित देखभाल करणे यांसारख्या उपाययोजनांची शिफारस केली आहे. आयोगाच्या 22 शिफारशींमध्ये संगणक व संगीत वर्ग, व्यावसायिक व जीवन-कौशल्य प्रशिक्षण, आरोग्य तपासणी आणि मुलांची सुरक्षा व ‘पोक्सो’ कायद्याबाबत नियमित जनजागृती सत्रे आयोजित करण्याच्या सूचनांचाही समावेश आहे. सध्या अपना घरात 35 मुले वास्तव्यास आहेत; त्यामध्ये कायद्याचा संघर्ष आलेली चार मुले आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेली 31 मुले (14 मुले, 16 मुली आणि एक लहान बाळ) यांचा समावेश आहे. आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांना 6 ऑक्टोबरपर्यंत, म्हणजेच 60 दिवसांच्या आत कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचा निर्देश दिला आहे.

