26 C
Panjim
Monday, January 18, 2021

अन् म्हणावे चांदणीने मी दिशांना सांधते

  • मीना समुद्र

आकाशातल्या इवल्याशा चांदणीसारखी मनातली आशा लुकलुकून सांगते आहे की, तू निराश होऊ नको. विसरलेल्या वाटा मी उजळीन. विखुरलेल्या दिशा माझ्या अंतःस्थ तेजाने सांधीन. तुझ्या मनाचा गोंधळ मिटून तुला तुझे प्रेयस गवसेल.

मैत्रिणीने व्हॉट्‌स ऍपवरून पाठविलेली एक सुंदर गझल परवा वाचली आणि तिच्यातल्या सौंदर्याने, आशयाने ती मनाला भिडली. अर्थाचे मोरपिसारे उलगडत ती मनाच्या अंगणात थुईथुई नाचत राहिली आणि सतत भोवती भोवती पिंगा घालत कानात रुणझुणत राहिली.
अशी एखादी भावलेली कथा-कविता-लेख वाचताना सहजच वर किंवा खाली त्या लिहिणार्‍याचं नाव बघण्याची उत्सुकता असते; किंवा त्याबाबतीतला अंदाज खरा ठरला तर मनाला आनंद होतो. तसेच या कवितेच्या बाबतीत घडले. तिथे नाव नव्हते पण सध्याचे आघाडीचे गझलकार वैभव जोशी यांच्या कवितेशी नातं सांगणारी मात्र ती नक्की वाटली.

बाभळीची देहजाळी चंदनाला सांगते
पार्थिवाला जाळतो तू, मी चुलीशी नांदते
बाभळी- नाजूक जोडपानांची, काटक अंगाची, रानावनात, रस्त्याकडेला, शेतबांधावर अशी कुठेही उगवणारी वनस्पती. तशी ठेंगणी ठुसकी आणि गोंडेदार गोल पिवळी नाजूक फुलं अंगावर माळली की अतिशय देखणी दिसणारी. वसंत बापट यांनी वर्णन केल्याप्रमाणे ‘अस्सल लाकूड टणक गाठ; ताठर कणा टणक पाठ’ अशी ही बाभळी. शेळ्यामेंढ्यांना तिचा पाला खाण्यासाठी; पण लाकडं मात्र चुलीत जाळण्यासाठी. म्हणजेच भुकेलेल्याचं रांधण्यासाठी, त्याचं पोट भरण्यासाठी. उन्हात जळणारी तिची सावली ही तिच्या नक्षीदार पानांची जाळी जमिनीवर विणते आणि ती स्वतः दुसर्‍याचे अन्न शिजविण्यासाठी स्वतःचा देह जाळते. चंदनवृक्ष हा उंच. सहाणेवर याचा तुकडा घातला तरी सुगंध देणारा. स्वतः झिजून दुसर्‍याचं जीवन सुगंधी करणारा. मर्त्य शरीर जाळताना त्यात चंदनाचा तुकडा टाकतात. एखाद्या महान विभूतीचे; कीर्तिवंत, यशवंत माणसाचे; कर्तृत्ववान, लोकप्रिय नेत्याचे पार्थिव दहन करताना तर चंदनाची चिता रचली जाते. मातीत जन्म घेणार्‍याला मातीतच विरून जाताना, मिळून जाताना चंदनवृक्ष साक्षी आणि सहाय्यभूत होतो तो असा स्वतःचा देह जाळून. बाभळी आणि चंदन दोन्ही ‘देहजाळी’ आहेत. लोकोपयोगी आहेत. जळण्याचं निमूटपण त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यांचे हेतू मात्र भिन्न आहेत. चंदन माणसाची अंतिम यात्रा सुगंधी करतो आणि बाभळी त्याची सतत जीवनयात्रा सुफल करते. जीवन जगविण्याचं काम ती करते तरी चंदनाची ‘पवित्र वृक्ष’ म्हणून गणना होते आणि चुलीशी रांधणारी बाभळी मात्र नगण्य ठरते. पुरुषप्रधान संस्कृतीत जीवनसर्वस्व संसारासाठीच अर्पण करणार्‍या स्त्रीची ससेहोलपट या साध्याशा बाभळीच्या रूपकातून व्यक्त होते असे वाटून जाते. चंदनाची जगात प्रशंसा होते; मात्र रोज चुलीत जळत, मरण भोगत जीवनाची राख होत असताना बाभळी त्याग आणि कर्तव्य भावना नेकीने निभावत असूनही ती नगण्य ठरते याकडे कवीला लक्ष वेधायचे असावे असेही वाटले.

सावली वार्‍यास बोले डाव मांडू वेगळा
तू जरासा थांब आता, मी उन्हाशी भांडते
माणसाचं आयुष्य म्हणजे ऊन-सावलीचा खेळ असं आपण म्हणतो. ऊन आणि सावली यांची नियती वेगवेगळी. आणि वारा हा सूत्रधार. तो उन्हाचा ताप कमी करतो आणि उन्हातली सावलीची मांडामांड त्याच्या मर्जीने होते. इथे सावली ही झाडाचीच गृहित धरलेली असावी असे वाटते. वार्‍यामुळे झाडे हलली की त्याच्या सावल्या हलतात. कधी एकमेकांत मिसळतात, कधी विलग होतात, कधी तिचे अस्तित्व मिटूनही जाते. वार्‍याच्या लहरीवर सावलीचं स्थान, काळ, वेळ नक्की होते. कधी उन्हात तळणार्‍या सावलीला वार्‍याचा दिलासा अन् आधारही वाटतो. सततच्या अग्निदिव्यातून आपण वाचते म्हणून ती जणू आपल्या त्या सहकार्‍याला सांगते की तू आता जरा थांब. आपण एक वेगळाच डाव खेळू. मी उन्हाला चार खडे बोल ऐकवीन. आपल्या जळण्याची, कष्टाची जाणीव त्याला करून देईन. हे सारे सावलीच्या स्वभावाविरुद्ध आहे. तिचे काम छायामाया देण्याचे. थंडावा, विसावा देण्याचे. पण उन्हाची मग्रुरी वाढेल तसा जीवांना होणारा ताप तिला सहन होत नाही. दुसर्‍याच्या चालीने चालण्यापेक्षा एक ठाम पाऊल उचलून अन्यायाविरुद्ध जाब विचारण्याचे सामर्थ्य सावलीसारख्या शीतलतेतही जागू शकते आणि आत्मविश्‍वास जागृत होऊन जळण्याचे, जगण्याचे भान तिला येते. त्यामुळे या पंक्तींद्वारे तिचा निर्धार व्यक्त होतो तो एखाद्या स्त्रीचेच प्रतीक आहेसे वाटते.

ऐकवीते वात इवली तळपत्या सूर्यासही
घे विसावा पश्‍चिमेला मी दिवाळी मांडते
सूर्यापुढे एका पणतीची, समईची वा निरांजनाची वात ती केवढी? तिची शक्ती आणि क्षमता ती किती? अगदीच नगण्य. किंबहुना ती शक्ती, ते सामर्थ्य, ते तेज हे सूर्यामुळेच तिला प्राप्त झाले आहे. त्या तेजाचा ती एक इवलासा बिंदू आहे. इवलासा अंश आहे. तरीही तिचे रूप सौम्य आहे, शांत आहे. दाहक नसून दृष्टीला सुखदायक आहे. म्हणून दिवसभर सतत जीव जाळत तळपणार्‍या सूर्याला ती सांगते, पश्‍चिमेला तू थोडा विसावा घे. दिवसरात्र जळणे, तळपणे बरे नाही. मावळतीला मवाळ होऊन तू विसावा घेशील तेव्हाही तुझे कार्य थांबणार नाही. माझ्या इवल्या जिवाची पराकाष्ठा करत मी अंधार उजळीत राहीन. अशाच आणखी सख्यासोबत्यांना बरोबर घेऊन, त्याच्याशी मैत्री करत आम्ही इथे दिवाळी साजरी करू. शांत, मंद तेजाचा मांड माडू. सर्व जगाला मनाची बेचैनी दूर करून विसावा देऊ. एखाद्या कर्तव्यनिष्ठ, काळजीवाहू बापाला लेकीने सांगावे असे हे समजूतदार शब्द! तुमचा लौकिक राखून मी तुम्हाला आराम देईन. तुमचा वसा अखंड चालवीन असे हे शब्द मला वाटतात.

कस्तुरीचा धुंद दरवळ रानजाई मांडते
मज म्हणे मग रातराणी मी उशाला नांदते
कस्तुरीचा अनोखा गंध लेवून रानजाई बहरली आहे. तो धुंद दरवळ रानावनात पसरला आहे. आसमंतही धुंद झाला आहे. टपोर रानजाईला नाजूक रातराणी सांगते आहे, दिवसा तुझा दरवळ आणि रात्री जाऊन माझ्या इवल्या शुभ्रकळ्या उमलून येणारा दरवळ. मी थकल्याभागल्या जीवांना सुखनिद्रा देईन. धुंद गंधात न्हाऊन रात्री स्वप्नील करीन आणि स्वप्नपूर्तीही करीन.

माग उरला ना फुलांचा परत येण्या अंगणी
अन् म्हणावे चांदणीने मी दिशांना सांधते
आठवणींच्या गावात आता पूर्वीची हाकारणारी, वाट दाखवणारी सुगंधी फुले उरली नाहीत. नाती कोमेजली आहेत. काहींचे निर्माल्य झाले आहे. शिंपणाविना झाडेवेली-फुले-पानेही सुकून गेली आहेत. अंगणात परतून फुलांचा वास घ्यावा, मायेचा श्‍वास घ्यावा अशी जिव्हाळ्याची माणसेही आता उरली नाहीत. परतीचे रस्ते बंद झालेले असतानाच आकाशातल्या इवल्याशा चांदणीसारखी मनातली आशा लुकलुकून सांगते आहे की, तू निराश होऊ नको. विसरलेल्या वाटा मी उजळीन. विखुरलेल्या दिशा माझ्या अंतःस्थ तेजाने सांधीन. तुझ्या मनाचा गोंधळ मिटून तुला तुझे प्रेयस गवसेल. येत्या नववर्षात असेच श्रेयस आणि प्रेयस सर्वांना मिळो आणि निरामय जीवनानंद सुखसमृद्धीने नांदो हीच शुभेच्छा!!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागणी मान्य

अखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाचे

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

पंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस

अंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...

ALSO IN THIS SECTION

आर्थिक २०२० ः सिंहावलोकन

शशांक मोहन गुळगुळे एक महिन्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांना २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करावा लागणार. हा अर्थसंकल्प सादर...

उद्याचा काय नेम?

डॉ. सोमनाथ कोमरपंत माणसाने कसे वागावे याची संथा कवीने दिलेली आहे. तुला आज जे काय वाटतं ते तू...

कोरोनाने विश्‍वच बदलले!

श्रीशा वागळे (जीवनशैलीच्या अभ्यासक) रेस्टॉरंट्‌स, कॅङ्गेज्‌मधली मेनूकार्डस्, रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी पेये, खाद्यपदार्थांनी सजली आहेत. लग्नं अगदी कमी खर्चात उरकली...

स्वीकार

डॉ. फ्रान्सिस फर्नांडिस ‘‘दोन वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध मी लग्न केलं. डॅनी हँडसम, प्रामाणिक व सरळ स्वभावाचा म्हणून मी...

भोबे, ‘मासे आणि मी’ आणि… मी!

सखाराम शेणवी बोरकर केवळ अठ्ठेचाळीस वर्षांच्या भोबे यांच्या आयुष्यातील शेवटची दहा वर्षे हा त्यांचा लेखनकाळ होता. या दहा...