गहाळ फाईल्सवरून हंगामा
यूपीएचे महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा विधेयक काल राजीव गांधींच्या जयंतीदिनी संसदेत चर्चा करून संमत करण्याचे केंद्र सरकारने ठरवले होते. मात्र कोळसा घोटाळ्याच्या फाइल्स गहाळ झाल्याप्रकरणी भाजपने हंगामा करीत सभागृहाचे कामकाज रोखून धरल्याने हे विधेयक चर्चेस येऊ शकले नाही.
काल राजीव गांधींची जयंती असल्याने कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक संसदेत चर्चेला आणण्याचे कॉंग्रेसने ठरविले होते. काल तेलंगणावरून गोंधळ घालणार्या कॉंग्रेस खासदारांनाही निलंबनाची तंबी देण्यात आली.
या विधेयकाला काही पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी विधेयकात दुरुस्त्या करण्यासही सरकार तयार झाले आहे. सरकारला बाहेरून पाठिंबा देणार्या समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी यांनी काही दुरुस्त्यांसह विधेयकाला पाठिंबा देऊ केला आहे. नितीष कुमार यांचा जनता दल- संयुक्त पक्षही विधेयकास पाठिंबा देणार आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने केंद्र सरकारला पत्र लिहून आपला विधेयकातील काही तरतुदींना आक्षेप असल्याचे कळविले आहे. ‘विधेयकाला विरोध नाही, पण दुरुस्त्या हव्यात’ अशी भूमिका भाजपने घेतली आहे. आधीच देशाची आर्थिक स्थिती कोलमडलेली असताना हे विधेयक आणून देशाच्या तिजोरीवर अनुदानाचा भार कॉंग्रेस का टाकू पाहते असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे. अन्न सुरक्षा विधेयक कायदा बनल्यानंतर देशातील ७० टक्के लोकसंख्येस अनुदानित दरात अन्न धान्य मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याशिवाय काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका २०१४ च्या लोकसभा निवडणुका यामुळेही कॉंग्रेसला विधेयक लवकर संमत झालेले हवे आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन ३० ऑगस्ट रोजी पर्यंत चालणार आहे.