Home बातम्या अन्न सुरक्षा अध्यादेशावर मोदी यांची टीका

अन्न सुरक्षा अध्यादेशावर मोदी यांची टीका

0

कॉंग्रेसच्या टीकेला प्रत्त्युत्तर

गुजरात दंगलींसंदर्भातील एका वक्तव्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांकडून लक्ष्य ठरलेल्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल येथे एका समारंभावेळी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. कॉंग्रेसने पुढे आणलेले अन्न सुरक्षा विधेयक अध्यादेश ही या पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची कल्पना असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच कॉंग्रेस पक्षाच्याच नेत्याने राष्ट्रकूल स्पर्धा घोटाळा करून जगाच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय सन्मानाला बाधा पोचविली असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘जणू काही ताटात अन्न आले आहे अशा थाटात त्यांनी देशासमोर अन्न सुरक्षा विधेयक आणले आहे.’ अशी टिप्पणी त्यांनी केली. मोदी येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या एका समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित होते.

कॉंग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांनी राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनात घोटाळा करून जगात भारताची नाचक्की केल्याचा दावा त्यांनी केला. ‘दोन देशांनी दोन स्पर्धांचे आयोजन केले… दक्षिण कोरियाने ऑलिम्पिकचे आयोजन केले आणि भारताने राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन भारताने भूषविले. पण कोरियाने आपल्या देशवासियांसाठी गौरवास्पद कामगिरी केली. मात्र कलमाडींच्या घोटाळ्याने भारताच्या १२० कोटी जनतेला खाली मान घालायला लावली’, असे मोदी म्हणाले. सायबर गुन्ह्यांमध्ये चिंता करण्याजोगी वाढ झाली आहे याकडे लक्ष वेधून त्यांनी आपले सरकार जगातील पहिल्या फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठाची गुजरातेत स्थापना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावरही कॉंग्रेसकडून टीका होईल असे ते म्हणाले. स्व. राजीव गांधी यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी देशाला २१ व्या शतकात नेण्याच्या वक्तव्यांची खिल्ली उडवली. भारताला २१ व्या शतकात नेण्याची दूरदृष्टी कोणत्या नेत्याने दाखवली असा सवाल त्यांनी केला. असा कोणता द्रष्टेपणा नजरेसमोर ठेवून कोणी काम केले असते तर आम्ही आज जेथे आहोत तेथे नसतो असा दावा त्यांनी केला.