१३ पालिकांना वितरण
गोवा मुक्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कला व संस्कृती खाते तसेच सुवर्ण महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने गोव्यातील १३ नगरपालिकांना खास अनुदानाचे धनादेश वितरित केले.
मडगाव येथील रवींद्र भवनात विशेष समारंभात देण्यात आले. अ वर्ग नगरपालिकांना ३ कोटी, ब वर्ग नगरपालिकांना २ तर क वर्ग नगरपालिकांना १ कोटी रुपयांचे खास अनुदान दिले.
नगरपालिकांनी अनोखे प्रकल्प हाती घ्यावेत, जेणेकरून नेहमीच कायमचे स्मरणात राहतील. गटारे, रस्ते वा इतर कामासाठी उपयोग करण्यात हे अनुदान दिलेले नाही, असे सांगून मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले, इतर राज्यात अनुदान दिले जाते तसे हे अनुदान नाही. उत्कृष्ट प्रकल्पासाठी सरकार पैसे कमी पडू देणार नाही. सुवर्ण महोत्सवी वर्षात तयार केलेले प्रकल्प राज्यासाठी वरदान ठरतील.
खाण विभागांत मोडणार्या सत्तरी, डिचोली, सांगे, केपे तालुक्याच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली असून यावर्षी १०० रुपयांची तजवीज अर्थसंकल्पात केलेली आहे, असेही मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.
पणजीचे महापौर यतीन पारेख, मडगावच्या नगराध्यक्ष सुशीला नायक, सांगेचे संजय रायकर, वास्कोचे चोपडेकर यांची भाषणे झाली. सुरवातीस कला व संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी स्वागत केले तर पालिका प्रशासन संचालक दौलत हवालदार यांनी आभार मानले.