श्रीमन्मध्वाचार्य प्रणित द्वैत तत्त्वज्ञान अनुसरलेल्या वैष्णव सांप्रदायी सारस्वत समाजाच्या मठपरंपरेस पाचशे पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने अकरा दिवसांचा भव्य सार्ध पंचशताब्दी महोत्सव आजपासून पुढील अकरा दिवस पर्तगाळच्या श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठामध्ये उदंड उत्साहात आणि अनुपमेय स्वरूपात साजरा होणार आहे. पंतप्रधानांपासून संतमहंतांपर्यंत आणि राष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांपासून मठपरंपरेच्या निःस्सीम अनुयायांपर्यंत हजारो लोकांचा त्यात नित्य सहभाग राहणार आहे. स्वतः श्रीमन्मध्वाचार्यांनी जे आठ मठ स्थापन केले होते, त्यापैकी उडुपीच्या फलिमार मठाचे दहावे आचार्य श्रीरामचंद्रतीर्थ हिमालयात यात्रेस गेले असता बद्रिनाथक्षेत्री त्यांना दुर्धर व्याधीने ग्रासले. आपला मृत्यू ओढवला तर मठपरंपरा खंडित होऊ नये ह्या हेतूने त्यांनी यात्रेत समवेत असलेल्या सारस्वत ज्ञातीतील शिष्यास संन्यासदीक्षा दिली आणि त्याला ‘नारायणतीर्थ’ असे नामाभिधान दिले. मात्र, फलिमार मठाधीश त्या दुर्धर दुखण्यातून बरे झाले तेव्हा त्यांच्यापुढे पेच निर्माण झाला की आपल्या उडुपीतील मठाचे शिष्यत्व पूर्वनिर्धारित द्रवीड ब्राह्मण समाजाच्या आपल्या शिष्यास द्यावे की ह्या आपण आपत्काली संन्यासदीक्षा दिलेल्या सारस्वत समाजाच्या शिष्याला. त्यामुळे श्रीमद्नारायणतीर्थांस भटकळ येथे नूतन मठस्थापनेची आज्ञा करून गुरूस्वामींनी त्यावर उचित तोडगा काढला. त्यामुळे सारस्वत समाजाचे प्रथम स्वामी श्रीमद्नारायणतीर्थांना शके 1397 म्हणजेच इ. स. 1475 साली संन्यासदीक्षा मिळाली तेथपासून ही मठपरंपरा मानली जाते, जिला यंदा साडेपाचशे वर्षे पूर्ण होत आहेत. पन्नास वर्षांपूर्वी 1975 साली मठपरंपरेची पंचशताब्दी होणार होती, परंतु तेव्हा देशात आणीबाणी लादली गेली होती. त्यामुळे आणीबाणी उठल्यानंतर 1977 साली मठपरंपरेची पंचशताब्दी अशाच उत्साहात साजरी केली गेली होती. ह्या सार्ध पंचशताब्दीच्या निमित्ताने पर्तगाळच्या ऐतिहासिक मठाचे संपूर्ण नूतनीकरण विद्यमान पीठाधीश श्रीविद्याधीशतीर्थ यांच्यासारख्या तेजस्वी, तरुण स्वामींनी गेल्या तीन वर्षांपासून हाती घेतले होते, तो त्यांचा संकल्पही ह्यानिमित्ताने अत्यंत सुंदररीतीने सिद्धीस गेला आहे. मठामधील प्राचीन श्रीराममंदिराचा पुनरुद्धार असो, भव्य स्वरूपात उभे राहिलेले वीरविठ्ठल मंदिर असो किंवा मठसंकुलाच्या दर्शनी भागामध्ये उभी राहिलेली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते अनावरण होणार असलेली प्रभू श्रीरामांची देशातील सर्वांत मोठी कांस्यप्रतिमा असो, अशा अनेक वैशिष्ट्यांसह पर्तगाळच्या 369 वर्षे जुन्या मठसंकुलाचा पुनरुद्धारही ह्या निमित्ताने अतिशय देखण्या रीतीने, परंतु पूर्वीचाच साधेपणा आणि पावित्र्य कायम राखून झालेला आज पाहायला मिळतो. केवळ पर्तगाळ मठाच्या अनुयायांसाठीच नव्हे, तर संपूर्ण गोमंतकासाठी हा सार्ध पंचशताब्दी महोत्सव एक अभिमानाचा विषय आहे. नानाविध परकीय राजवटी, आक्रमणे, धर्मच्छळ ह्या सगळ्या अरिष्टांना तोंड देत हा संस्कृतीचा, अस्मितीचा, धर्माचा दिवा अखंड तेवत राहिला आहे. मठपरंपरा पाच शतकांहून अधिक काळ अखंड चालण्याची उदाहरणे देशामध्ये अनेक आहेत, परंतु तरीही ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अखंड कार्यरत राहून ह्या मठपरंपरेेने आपल्या अनुयायांच्या आध्यात्मिक उन्नतीमध्ये आणि त्यांच्यामध्ये सकल समाजाविषयीची सहिष्णुता आणि सेवाभाव जागवून सामाजिक सेवेच्या क्षेत्रामध्ये योगदान दिले आहे ते अद्वितीय आहे. सारस्वत समाज हा गोमंतकाच्या सार्वजनिक क्षेत्रात पूर्वीपासून अग्रणी राहिलेला समाज. गोव्याच्या जडणघडणीमध्ये त्याचे योगदान फार मोठे राहिले आहे. निव्वळ प्रज्ञा आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये यश संपादन केले. त्यासाठी जग पालथे घातले, परंतु आपली जन्मभूमी, आपली कुलदैवते, आपला समाज, आपली धार्मिक परंपरा ह्याला मात्र कधीही तिलांजली दिली नाही. त्यामुळेच पर्तगाळ मठामधील कोणतेही कार्य असो, विविध क्षेत्रांत अग्रणी असणारे समाजातील धुरीण आपले सर्व व्याप बाजूला ठेवून सेवेसाठी धावून जाताना दिसतात. प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही कसे सांभाळावे ह्याचा आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे. पर्तगाळ मठाचा आज शेकडो कोटी खर्चून जो पुनरुद्धार शक्य झाला आहे तो केवळ ह्या समाजाचे कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व याच्या बळावर. केवळ आपल्या समाजापुरते पाहू नका. सकल समाजाच्या भल्याची कामना करा हे ह्या मठपरंपरेतील प्रत्येक स्वामीजींचे सांगणे राहिले. विद्यमान पीठाधीश श्रीमद्विद्याधीशतीर्थ हेही त्याला अपवाद नाहीत. सकल समाजाला प्रेरणा देईल असे ‘आदर्श धाम’ त्यांनी पर्तगाळला ह्या सार्ध पंचशताब्दीच्या निमित्ताने उभारले आहे. ते हाच सहिष्णुतेचा आणि सर्वांच्या कल्याणाचा संदेश देत राहील.

