सरकारी नोकरीसाठी लाचखोरीच्या राज्यात उघडकीस आलेल्या अनेक प्रकरणांपैकी एक असलेल्या पूजा नाईक प्रकरणी पोलिसांनी तिलाच धडा शिकवण्याचा चंगच बांधलेला दिसतो. पोलिसांनी खरे तर हे प्रकरण आधीच जवळजवळ फाईलबंद केलेले होते. पण हे प्रकरण स्वतःवरच शेकणार ह्याची जाणीव होताच तिने एका वर्षानंतर प्रसारमाध्यमांपुढे तोंड उघडले, त्यामुळे पोलिसांना नाईलाजाने पुन्हा नव्याने तपास करावा लागला. परंतु एवढे गंभीर प्रकरण असूनही ह्या प्रकरणात तिने ज्या अधिकाऱ्यांची, राजकारण्यांची नावे घेतली, त्यांना ना कधी साधे चौकशीसाठी बोलावण्यात आले, ना त्यांचे कॉल रेकॉर्ड, मालमत्तेचे व्यवहार तपासले गेले. केवळ पूजा नाईक हिच्या वक्तव्यांतील विसंगतींच्या आधारे पोलिसांनी ह्या प्रकरणात केवळ तीच एकमेव सूत्रधार असल्याचा निष्कर्ष काढून हे प्रकरण तिच्यावरच शेकविण्याची पूर्ण सज्जता केली आहे. सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देत तिने ज्यांच्याकडून पैसे घेतले, त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात धाव घेतली होती. म्हणजे ते तरुण अस्तित्वात आहेत. त्यामुळे ह्या प्रकरणात ती म्हणते त्याप्रमाणे तिने शेकडो इच्छुकांकडून वेळोवेळी लाखो रुपये घेतले होते, ह्याला त्यामुळे सबळ प्रमाण मिळते. तिच्या बँक खात्यामध्येही कोट्यवधी रुपये आढळले आहेत आणि तिच्या मालकीची आलिशान वाहनेही ताब्यात घेतली गेली आहेत. हा पैसा केवळ आपल्याला मिळालेल्या दलालीचा पैसा असल्याचे ती म्हणते आहे. मूळ रक्कम आपण बड्या लोकांना पोहोचती केली असे ती सांगते आहे. येथे प्रश्न फक्त एवढाच उरतो की तिने हे पैसे ज्यांच्यापर्यंत पोहोचवले असे ती म्हणते आहे, त्याबाबतचे कोणतेही पुरावे नाहीत. आता अशा प्रकरणामध्ये जो कोणी पैसे घेणारा असेल तो साक्षीपुरावे मागे ठेवण्याएवढा निर्बुद्ध नक्कीच नसतो. त्यामुळे ह्या प्रकरणातील तथ्यांच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांनी अधिक कसोशीचे प्रयत्न करणे आवश्यक आणि अपेक्षित होते, जे झालेले दिसत नाही. पोलिसांची चौकशी केवळ ह्या पूजा नाईकवरच केंद्रित झालेली दिसली. ह्या प्रकरणात मंत्री व अधिकाऱ्यांना क्लीन चीट देण्यासाठी वारंवार पत्रकारांपुढे येणाऱ्या पोलीस अधीक्षकांनी जे नऊ मुद्दे पुढे केले आहेत ते सर्वच्या सर्व खरे आहेत असे जरी मानले, तरी अनेक प्रश्न तरीही अनुत्तरीत राहतात. पूजा हिने आपण एका प्रादेशिक पक्षाच्या सांतिनेज येथील कार्यालयात 2012 साली काम करीत होते असे सांगितले होते. त्यासंबंधी कोणताही पुरावा आढळलेला नाही. ज्या डायरीत 613 जणांचा आणि त्यांनी दिलेला तपशील नोंदवलेला होता ती किंवा ती ज्या तन्वी नाईक हिच्याजवळ दिल्याचे पूजाने जबानीत म्हटले हेोते ती सापडत नाही असे पोलीस म्हणत आहेत. अशा प्रकारची डायरी मुळात कोणी सांभाळून ठेवणार नाही आणि ती सापडली तर आपणच गोत्यात येऊ हे न कळण्याइतपत कोणी इथे दूधखुळे नाही. त्यामुळे ज्या प्रमाणे फोन फॉर्मेट करून विकला गेला, त्याच प्रकारे ह्या मधल्या काळात संबंधित डायरीही नष्ट केली गेलेली असू शकते. पोलिसांच्या अहवालानुसार, फोनची विक्री तिच्या पतीने केली या वर्षी म्हणजे सन 2025 च्या ऑगस्टमध्ये. पूजा नाईकचे नाव उजेडात कधी आले? ते प्रथम आले ऑक्टोबर 2024 मध्ये. म्हार्दोळ पोलिसांनी तिला अटक केली होती ऑक्टोबर 2024 मध्ये. मग ऑगस्ट 2025 पावेतो तिचा फोन, ज्यामध्ये ह्या सगळ्या व्यवहारासंबंधीचे सर्व पुरावे असल्याचे ती सांगत होती, तो पोलिसांनी तपासलाच नव्हता? ह्या प्रकरणातील ह्या सर्वांत महत्त्वाच्या पुराव्याची पोलिसांनी तिच्या पतीद्वारे विक्री कशी होऊ दिली? पोलीस ज्या कॉल रेकॉर्डस्च्या आधारे अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना क्लीन चीट देत आहेत तो कालावधी पोलीस सांगत आहेत 2023 ते 2025. पूजा तर म्हणते आहे की हे खूप जुने प्रकरण आहे. मग 2023 ते 2025 या काळात म्हणजे खरे तर पूजाच्या मागे पैसे दिलेल्यांचा ससेमिरा सुरू झाल्यानंतर आणि तिच्याविरुद्ध पोलीस तक्रारी दाखल झाल्यानंतर, तिला अटक झाल्यानंतर जे कोणी बडे मासे असतील ते तिच्या संपर्कात राहणे शक्य तरी आहे काय? बरे सरकारी नोकरीचे आमीष दाखवून बेरोजगार युवकांकडून लाखो रुपये उकळले जाण्याचे हे काही एकमेव प्रकरण नव्हे. मग इतर जी प्रकरणे आहेत आणि ज्यामध्ये मुख्यतः स्त्रियाच प्रमुख सूत्रधार आढळल्या आहेत, त्या प्रकरणांशी ह्याचा काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध जुळतो हे पोलिसांनी पाहायला नको? त्यामुळे पोलीस भले हे प्रकरण पूजावर शेकविण्याच्या तयारीत असले, तरी जे अनुत्तरीत प्रश्न आहेत त्यांचे काय? अधिकारी आणि राजकारण्यांना क्लीन चीट देण्याची घाई झालेल्या तपासयंत्रणेने ह्या अनुत्तरित प्रश्नांवर स्पष्टीकरण जरूर द्यावे.

