31 C
Panjim
Monday, January 25, 2021

अनपेक्षः शुचिर्दक्षः उदासीनो गतव्यथः …

– प्रा. रमेश सप्रे
प्रसंग आहे एका हिंदी चित्रपटातील. मोठं कुटुंबं. अनेकमाणसं. पण प्रत्येकाचं तोंड विरुद्ध दिशेला. त्यामुळे घरातशांतीपेक्षा समरप्रसंगच अधिक. सर्वांची सर्व कामं करणारा एक नोकर ही त्या घराची अत्यंत गरज होती. सुदैवानं असा नोकर मिळतोही. आपल्या मनमोकळ्या स्वभावानं अन् अंगी असलेल्या अनेक गुणांनी युक्त अशा त्या नोकरानं चमत्कार घडवला. सर्व मंडळींची दिलजमाई झाली. घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. त्यावेळी त्या नोकरानं आपलं इथलं काम झाल्यामुळे दुसर्‍या अशाच संवाद नसलेल्या कुटुंबात जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी या आनंदी घरातल्या मंडळींनी त्या नोकराला त्याच्या ‘नित्य आनंदी’ स्वभावाचं रहस्य विचारलं. त्यावर तो उत्स्फूर्तपणे म्हणाला, ‘इट्‌स सो सिंपल टु बी हॅपी. बट् इट्‌स व्हेरी डिफिकल्ट डु बी सिंपल.’ खरंच आहे. आनंदी बनणं नि राहणं अगदी सोपं आहे. पण सोपं होणं मात्र अत्यंत अवघड आहे. सहज साधं जगणं खूप कठीण आहे.गीतेत भगवंत भक्तीतून मुक्ती मिळवण्यासाठी भक्ताच्या अंगी असलेल्या लक्षणांविषयी सांगताना.. काही लक्षणांवर विशेष भर देतात ‘अनपेक्षित्वं अमानित्वं अनाग्रहित्वम्’ अशी काही लक्षणं आहेत. कोणाकडून कसलीही अपेक्षा केली नाही म्हणजे मान-अपमानाचा प्रश्‍नच येणार नाही (अमानित्वं) अन् कसलाही आग्रह धरला जाणार नाही (अनाग्रहित्वं). तसं पाहिलं तर या गोष्टी अगदी सहजसोप्या वाटतात पण प्रत्यक्षात त्या वृत्ती अंगी बाणणं मात्र खूप कठीण आहे.
भगवंत भक्ताची लक्षणं सांगताहेत ज्यात आपल्या आनंदी जीवनासाठी उपयुक्त समुपदेशन आहे.
‘‘अनपेक्षः शुचिर्दक्षः उदासीनो गतव्यथः|
सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः॥
(१२.१६)
आपल्या मनात विचार येईल की भक्ताच्या लक्षणांचा सामान्य माणसाच्या जीवनाशी काय संबंध? भक्ताचा प्राण म्हणजे भक्ती. अन् भक्ती व जीवनाचा संबंध काय सांगायला पाहिजे? कोणत्याही क्षेत्रातली कोणतीही कृती करायला जशी ज्ञान व कर्म यांची आवश्यकता असते तशी त्याला जर भक्तीची जोड लाभली तर सोन्याला सुगंध आल्यासारखं होईल.
उगीच का आपल्याला आईच्या हातचे पदार्थ चांगल्यात चांगल्या उपाहारगृहातल्या पदार्थांपेक्षा रुचकर लागतात? आईच्या मनात प्रत्येक पदार्थ बनवताना घरातल्या निरनिराळ्या व्यक्तींच्या आवडीनिवडींचाच विचार असतो. फक्त पैशाच्या लाभाचा नसतो. रामकृष्ण परमहंस एक मार्मिक दृष्टांत द्यायचे. एका गरीबाघरच्या आईचं हे उदाहरण अनेक अर्थांनी नि अंगांनी समर्पक आहे. तिला बाजारातून तिच्या पतीनं फक्त बटाटे आणून दिलेयत. ती माऊली त्याच बटाट्याची चमचमीत रस्साभाजी आपल्या तरूण मुलासाठी करते. मुलीला आवडतात म्हणून बटाट्याची भजी व काप करते व नवर्‍याला पथ्य असतं म्हणून साधं भरीत करते. तर नुकत्याच खाऊ लागलेल्या लहान मुलाला उकडलेला बटाटा मीठ लावून देते. अन् स्वतः आनंदानं उरलेल्या सर्व पदार्थातील एकेक घास खाऊन तृप्त होते. हे प्रेम, ही आतली ओढ तिच्या सर्व पदार्थांना अमृताची माधुरी देते. हा भक्तीचाच महिमा नाही का?
असे आणखी कोणते गुण भक्ताच्या ठिकाणी असलेले भगवंताना हवे आहेत?…
१. अनपेक्षः – कुसुमाग्रजांची ‘मूर्तिभंजक’ नावाची सुरेख कविता आहे. त्यात एक मूर्तिकार दगडातून देवतेची मूर्ती तयार करून जिवेभावे तिची सेवाभक्ती करत राहतो. पण आतून काही प्रसाद मिळाल्याची जाणीव होत नाही. मूर्तीसमोर गायन-नर्तन करूनही, तिचे दिवसरात्र भजनपूजन करूनही ती काही प्रसन्न होत नाही. तो निराश होतो. या निराशेला उद्देशून कवी उद्गारतो-
‘खुळाचि कळेना पाषाणापासून |
अपेक्षा कशाची उपेक्षेवाचून?’
किती खरंय हे! अपेक्षा केली की अपेक्षाभंगाची शक्यता आलीच. जीवनाचा अनुभव तर हे सांगतो की अपेक्षांची पूर्ती होताना दिसत असतानाही अपेक्षाभंगाची भीती ही असतेच.
आज समुपदेशक पालकांना सुचवतात की आपल्या मुलांकडून अमुक एका टक्केवारीची अपेक्षा करू नका. तुमच्या मनातलं लक्ष्य त्यांच्यापुढे ठेवू नका. त्यामुळे त्यांच्या मनावर प्रचंड दडपण किंवा ताण निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी पातळीवरच होते. मग अपेक्षाभंगाचं दुःख पालकांना व संवेदनशील मुलांच्या मनात अपराधाची भावना नि न्यूनगंड निर्माण होतो. स्वतःची नकारात्मक आत्मप्रतिमा (सेल्फ इमेज) निर्माण होते जी त्याच्या विकासाच्या दृष्टीने व एकूणच भविष्याच्या दृष्टीने मारक असते.
निरपेक्ष भावनेनं कृती व कर्म करत राहणं ही विकसित व्यक्तिमत्वाची ओळख आहे. हे जिद्दीनं व निग्रहानं मनावर नियंत्रण आणून केलंच पाहिजे. हे अवघड वाटलं तरी अनेक गुणांच्या विकासाप्रमाणेच अशक्य निश्चितच नाही.
२. शुचिः – शुचिता म्हणजे पवित्रता. पवित्रतेची भावना उपासनेसाठी अनिवार्य असते. शुचितेला अनेक पैलू असतात. * सर्वप्रथम स्थानशुचिता – उपासना, अभ्यासच नव्हे तर दैनंदिन काम करण्याची जागा पवित्र असणं आवश्यक असतं.
त्यानंतर * देह व वस्त्रशुचिता – विशेषतः आध्यात्मिक उपासनेसाठी अशी पवित्रता पूरक असते. नंतर * सर्व साधनांची शुचिता आवश्यक असते. यात स्वच्छता व त्यांचा उपयोग करताना * भावनेची शुद्धता आवश्यक असते.
* द्रव्यशुचिता म्हणजे ज्या मार्गानं पैसा मिळवून केलेल्या साधनेत अपेक्षित असलेली शुद्धता. वाटेल त्या मार्गानं पैसा मिळवायचा अन् त्याच्याद्वारे देवाची नि देवस्थानांची कार्ये (सत्यनारायण पूजा, व्रतवैकल्यांची साधना इ.) करायची ही परस्परविरोधी भावना आहे. याची जाणीव झाली नाही तर सर्वांगीण शुचिता माझ्या जीवनात येणार नाही व शुचितेअभावी आध्यात्मिक कार्य यशस्वी होणार नाही.
महात्मा गांधी व हिटलर ही एकाच काळात कार्यरत असलेली परस्परविरुद्ध व्यक्तिमत्वं होती. दोघांच्या दृष्टीत, वृत्तीत नि कृतीत खूप फरक होता. मुख्य भेद होता एका तत्त्वाबद्दल – हिटलर म्हणायचा – ध्येय उच्च असलं तर ते साध्य करण्यासाठी कोणतेही मार्ग किंवा साधनं वापरली तरी ते योग्य आहे (एंड जस्टिफाइज मीन्स) म्हणजे परीक्षेतील यशासाठी ‘कॉपी’ केली तरी चालेल. जर्मनीला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवण्यासाठी ज्यू नागरिकांची अमानुष हत्या करायला हरकत नाही. हिटलरने साठ लक्ष्य ज्यूंचा क्रूर पद्धतीनी केलेला नरसंहार सर्वपरिचित आहेच. याउलट गांधीजी म्हणत – साधनं पवित्र हवीत. साधनांवरून ध्येयाची योग्यता ठरते. (मीन्स जस्टिफाय एंड). यातूनच मानवी जीवनासाठी उपयुक्त असं उच्च मूल्य (व्हॅल्यू) जनमानसावर ठसवलं गेलं, ते म्हणजे ‘साधनशुचिता’(सँक्टिटी ऑफ मीन्स)! म्हणून शुचिता ही मानवाच्या चारित्र्याचं महत्त्वाचं लक्षण आहे.
३. दक्षः – दक्ष म्हणजे सावध. भक्तानंच नव्हे तर सामान्य माणसानं अनेक गोष्टींबद्दल सावध असणं आवश्यक आहे. सर्वप्रथम जाणारा काळ म्हणजेच संपणारं जीवन याविषयी अतिशय सावध असलं पाहिजे. आपण अत्यंत बेफिकिरीनं अन् बेसावधपणे जीवनाचा नाश होताना पाहतो. दिवसांमागून दिवस, महिने-वर्ष उडून जातात पण आपण चिरंजीव असल्याच्या खोट्या बेहोषीत जगत राहतो. जे दक्ष असतात ते कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झालेले दिसून येतात. समर्थ रामदासांच्या काळापेक्षा आजचा काळ असुरक्षित, अनियमित झालाय. आकस्मिकपणे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकट घाला घालू शकतं. हिमालयात केदारनाथ परिसरात झालेला जलप्रलय, ओरीसात वादळ नि उठणार्‍या प्रचंड सागरलाटा, गुजरातमधला भूकंप, कन्याकुमारीला त्सुनामीनं घडवलेला संहार तर उत्तर भारतात दिल्ली-काश्मिर प्रदेशातला आतंकवादी हिंसाचार… सार्‍या घटना एकच गोष्ट सुचवतात की जीवन अकस्मात् संपू शकतं. तरीही मृत्यूची जाणीव होत नाही. पैसा, इतर मालकीच्या वस्तू नि वास्तू याविषयी अतिदक्ष असलेले आपण सरणार्‍या आयुष्याबद्दल निद्रिस्तच असतो.
‘मरणाचे स्मरण असावे| हरिभक्तीस सादर व्हावे॥ हा सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. यात दक्षता समाविष्ट आहे. ‘दक्ष’ राहिलंच पाहिजे. नाही तर रावणाचं साम्राज्य ‘अकस्मात्’ बुडाले, अशा अकस्मात घटनांनी भरलेला ‘काळ बळे लागला पाठिलागी’ याचं भान सुटतं नि जेव्हा भानावर येतो तेव्हा उरतो पश्चात्ताप!
४. गतव्यथः – दुःखमुक्त होणं म्हणजे ‘गतव्यथः’ होणं. पण हे कायमचं होणं अवघड. एक व्यथा गेली तर दुसरी डोके वर काढते. म्हणून व्यथा नसणं शक्यच नाही पण व्यथा असूनही तिच्या प्रभावाखाली अगतिक होणं हे चुकवणं शक्य! असाध्य रोग झालेले अनेक लोक आनंदात असतात. पूर्ण पक्षाघात (पॅरालिसिस) झालेले इच्छाशक्तीच्या जोरावर गिर्यारोहक बनून उत्तुंग हिमशिखरं पादाक्रांत करू शकतात. एखादा स्टिफन हॉकिंग फक्त बुद्धीची कृती शाबूत असून बाकी सर्व देह अचेतन (निर्जीव) झाल्यावरही काळाच्या इतिहासाविषयी पृथ्वीच्या निर्मितीबद्दल मौलिक विचारचिंतन करून जगाला नवं ज्ञान, नवी दृष्टी देऊ शकतो. हे ‘गतव्यथा’ अवस्थेच्या स्पष्टीकरणासाठी प्रभावी उदाहरण नाही का?-
अशा अवस्थेशिवाय ज्ञानप्राप्ती, नवीन ज्ञान-निर्मिती शक्य नाही. जीवनावर विविध प्रयोग सिद्ध करणं अशक्य आहे. आज एका बाजूला आतंकित लोक बहुसंख्येनं दिसत असले तरी आपल्या सर्व प्रकारच्या व्यथा-वेदना यावर मात करून जगाला काहीतरी नवीन देणार्‍या व्यक्तींची संख्याही वाढतेय. विशेषतः कँसर, एड्‌ससारख्या व्याधींशी लढताना जग जिंकल्याचा आनंदही लुटता येतो याचा आत्मानुभव इतरांना देणारी ग्रंथसंपदाही वाढत्या संख्येनं आपल्यापर्यंत सर्व भाषांतून पोचतेय.
‘अपंग’ स्वतःला अकार्यक्षम (डिसेबल्ड) किंवा काहीतरी व्यंग असलेले (डिफॉर्म्ड) समजत नाहीत. तर ‘निराळ्या पद्धतीनं कार्यक्षम’ (डिफ्‌रंटली एबल्ड) समजतात व जगाला ठणकावून सांगतात- ‘आम्हाला फक्त साधनं द्या, साधना आम्ही करू. संघर्ष आम्हीच करू’ (गिव्ह अस् द टूल्स अँड वुइ वुइल फाइट)!
५. उदासीन – या शब्दाचा मराठीतला अर्थ दुःखी किंवा खचलेला असा आहे. पण संस्कृतमध्ये विशेषतः अध्यात्माच्या भाषेत याला फार महत्त्वाचा अर्थ आहे. निःपक्षपाती, तटस्थ, स्थिर मनाचा (स्थितप्रज्ञ) असा जो आहे त्याला उदासीन म्हणतात. साधुसंत, संन्यासीबैरागी असे लोक उदासीन असणं अपेक्षित असतं. पण उदासीनता म्हणजे भावशून्यता, पाषाणहृदयता नव्हे. अतिशय संवेदनशील पण नियंत्रित मनःस्थिती व त्याप्रमाणे कृती करणंही उदासीन वृत्तीत अपेक्षित असतं. आनंदी जीवनासाठी अशी उदासीनता उपकारक ठरते. या वृत्तीचा अभ्यास (साधना) करावा तेव्हाच ती लाभते.
६. सर्वारंभपरित्यागी – काया-वाचा-मनाकडून सुरू केल्या जाणार्‍या सर्व नवीन कामांचा, उपक्रमांचा प्रत्यक्षात नव्हे तर त्यांच्या कर्तेपणाचा अभिमान टाकणं महत्त्वाचं असतं. नाहीतर नवीन नवीन सुरू केलेल्या कामांचा (सर्वारंभ) व्याप पाठीमागे लागतो. त्या व्यापाचा उपद्व्याप होऊ देता कामा नये. नाहीतरी आपल्यातले बरेचसे, आपण ‘आरंभशूर’ असतोच. नवनवीन संकल्प-प्रकल्प मनातच नव्हे तर प्रत्यक्षात सुरू करतो; व्यवसायाच्या – संस्थेच्या शाखा इ. सुरू करतो नि काही अर्धवटच राहतात तर काहींमुळे जिवाचा आटापिटा होतो.
असे गुण (लक्षणं) असलेला माझा भक्त मला सर्वाधिक प्रिय असतो. भगवंताचा भागच असलेल्याला ‘भक्त’ म्हणतात. समर्थ रामदासांच्या शब्दात ‘भक्त म्हणजे विभक्त नव्हे| आणि विभक्त म्हणिजे भक्त नव्हे॥
भगवंताला अखंड जोडलेलं राहणं ही खरी भक्ती. हल्लीच्या भाषेत याला ‘कनेक्टिव्हिटी(अनुसंधान)’ म्हणतात. असं अखंड दिव्य अनुसंधान (कॉंस्टंट नि डिव्हाइन कनेक्टिव्हिटी) म्हणजेच भक्ती! आणि अशा भक्तीचं सहज सोपं साधन म्हणजे नामस्मरण! भगवंताचे चिन्मय चैतन्य स्मरण!!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

गो गोवा ऑर्गेनिक

श्रीरंग व्यंकटेश जांभळे सध्या चालू असलेला शेतीतील रसायनांचा वापर जमीन, पर्यावरण, प्राणी, मनुष्य यांच्या आरोग्याला घातक असून याचे...

‘कोरोना’च्या आशीर्वादाचे- असेही अभ्यंग… अवती-भवती

अंजली आमोणकर या लॉकडाऊनपायी मिळालेल्या जबरदस्तीच्या कैदेत सर्वांना ‘मनाच्या अभ्यंगाचा’ आशीर्वाद मिळून गेला. एकमेकांचा यथेच्छ सहवास मिळाल्यामुळे, मनातल्या...

सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक तजवीज

शशांक मो. गुळगुळे तुम्ही पेन्शनधारक असाल तर महिन्याला निश्‍चित ठरावीक उत्पन्न मिळू शकते. पेन्शन वृद्धांना स्वावलंबी बनवते. म्हणून...

दुभंगलेला अमेरिकन समाज

दत्ता भि. नाईक आतापर्यंत अमेरिकेतील द्विपक्षीय लोकशाही खेळीमेळीने चालते असा लौकिक होता. दोन्ही पक्षांमध्ये देशाच्या ध्येयधोरणांविषयी मतभिन्नता नसल्यामुळे...

कोरोनानंतरचे अर्थकारण

महेश देशपांडे, (गुंतवणूक सल्लागार) कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बरेच काही बदलणार आहे. गुंतवणूक म्हणून मालमत्तेपेक्षाही शेअर्स तसंच...

ALSO IN THIS SECTION

धान्यवर्ग

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज-पणजी) जिथे जे पिकते ते खावे, या न्यायाने संपूर्ण कोकणवासीय भात खाऊ शकतात.तांदळाच्या वरच्या कोंड्यात...

बायोस्कोप – ३ कोकोच शत्रू कोकोचा

प्रा. रमेश सप्रे तुझा सर्वांत चांगला मित्र (हितचिंतक) तू स्वतःच आहेस आणि तुझा सगळ्यात वाईट शत्रू (हितशत्रू)ही तूच...

तेथे कर माझे जुळती!

योगसाधना - ४९०अंतरंग योग - ७५ डॉ. सीताकांत घाणेकर ...

कोरोना लस पूर्वचाचणी

मंजुषा पराग केळकर माझे नातेवाईक, मित्रमैत्रिणी ह्यांनी खूप कौतुक केले व खूप शाबासकी दिली, धीर दिला. वेळोवेळी फोनवरुन...

मेळावली आंदोलनप्रकरणी तिघांची जामीनावर सुटका

शेळ मेळावली येथील आयआयटी संकुलाच्या जमीन सीमांकनाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात सहभागी झाल्या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केलेल्या तिघांजणांची काल जामीनावर काल...