बरेच परप्रांतीय गोव्यातील आपल्या ‘सेकंड होम’ चा पर्यटकांसाठी ‘होम स्टे’ म्हणून बेकायदेशीररित्या वापर करू लागलेले आहेत. अशा व्यक्तींविरूद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिला आहे. या बेकायदेशीररित्या चालणाऱ्या ‘होम स्टे’कडून पर्यटन खात्याला महसूल मिळत नसल्याचे सांगून त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे खंवटे यांनी म्हटले आहे. पर्यटन खात्याकडे नोंदणी न केलेल्या ‘होम स्टे’ हॉटेल्स व एअरबीएनबी मालकांच्या मालमत्तांवर कडक कारवाई केली जाणार असून त्यांना नोंदणी करणे भाग पाडण्यास येणार असल्याचे काल खंवटे यांनी स्पष्ट केले.
देश-विदेशांतून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना राज्यात दर्जेदार अशा सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी गोवा सरकार पर्यटनाशीसंबंधीत ‘होम स्टे’ हॉटेल्स तसेच एअरबीएनबीसारख्या आस्थापनांना आवश्यक ते सर्व सहकार्य करीत असल्याचेही खंवटे यांनी म्हटले आहे.
जे कोण गोव्यात अशाप्रकारे आपली सेकंड होम्स, आपली घरे व आपल्या सदनिका पर्यटन खात्याकडे नोंदणी न करता बेकायदेशीररित्या पर्यटकांना उपलब्ध करुन देतात त्यांच्यावर पर्यटन खाते कडक कारवाई करणार असल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले आहे.

