अनधिकृत बांधकामांबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या

0
13

भाजप गाभा समितीच्या बैठकीत सूर; अन्यथा निवडणुकांत पक्षाला फटका?

राज्यातील अनियमित, बेकायदा बांधकामांवरील कारवाईबाबत राज्य सरकारने विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असा सूर भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीत काल उमटला.

या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री विश्वजीत राणे, सभापती रमेश तवडकर, आमदार दिगंबर कामत, गोविंद पर्वतकर, विनय तेंडुलकर, सिध्दार्थ कुंकळ्येकर यांची उपस्थिती होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशानुसार राज्य सरकारने सरकारी, कोमुनिदाद तसेच रस्त्यांलगतच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधितांना 15 दिवसांचा अवधी दिला आहे. त्यात राज्यातील बेकायदा घरे, तसेच बांधकामांमध्ये स्थानिक नागरिकांच्या अनियमित बांधकामांचाही समावेश आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामांवर कारवाईचा निर्णय राज्य सरकारने विचारपूर्वक घ्यावा, अशी मागणी गाभा समितीच्या बैठकीत करण्यात आली.

बेकायदा बांधकामांमध्ये परप्रांतीयांबरोबरच स्थानिकांची घरे आणि इतर बांधकामे आहेत. बेकायदा बांधकामांबाबत विचारपूर्वक निर्णय न घेतल्यास आगामी काळातील निवडणुकांत पक्षाला फटका बसू शकतो, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. राज्यातील बेकायदा आणि अनियमित बांधकामांच्या विषयावर योग्य तोडगा काढला जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

या बैठकीत राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर चर्चा झाली नाही. तसेच भाजप-मगो आघाडी यापुढेही कायम राहणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गाभा समितीच्या बैठकीत भाजप स्थापना दिन व इतर कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, संसदेत वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी चर्चेला येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. गाभा समितीच्या बैठकीत या विषयावर देखील चर्चा झाली.

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रम

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची पत्रकार परिषदेत माहिती

भाजपचा 6 एप्रिल रोजी स्थापना दिवस असून, काल पणजीत घेण्यात आलेल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्थापना दिनानिमित्त पुढील आठवडाभर राज्यात वेगवेगळे कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
6 एप्रिल 1980 या दिवशी भाजपची स्थापना झाली. यानिमित्त संपूर्ण देशभर पक्ष स्थापना दिवस मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे. या दिवशी गोवाभरात पक्षाच्या ध्वजाचे रोहण करण्यात येणार असून, राज्यभरातील कार्यकर्ते आपल्या घरांवर पक्षाच्या ध्वजाचे रोहण करतील.

त्याशिवाय पक्षाच्या कार्यालयांची रोषणाई करण्यात येईल. त्याशिवाय प्रदर्शन भरवण्यात येईल. या प्रदर्शनात अटलबिहारी वाजपेयी व अडवाणी यांच्या काळात देश पातळीवर व गोव्यात काशिनाथ परब ते दामू नाईक यांच्या काळात झालेले काम याचे प्रदर्शन घडवणारी छायाचित्रे, तसेच अन्य साहित्याचे प्रदर्शन होईल. भाजप स्थापना दिनाचा कार्यक्रम 6 ते 7 एप्रिल असे दोन दिवस होईल. त्यानिमित्त ‘बीजेपी फॉर विकसित भारत’चे व्हिडिओ वायरल करण्यात
येतील.

8 व 9 एप्रिल रोजी पक्षाचे राज्यातील 3750 क्रियाशील कार्यकर्ते एकत्र येतील व ते भाजपने देशात जी क्रांती घडवून आणली त्यासंबंधीची माहिती देतील.
7 एप्रिल रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अटल संमेलन होईल. त्याचबरोबर 7 ते 12 या दरम्यान ‘गाव चलो अभियान’ हाती घेण्यात येईल. त्यानिमित्त ध्वज रॅली, स्वच्छता अभियान, कारसेवकांचा सत्कार, बुथ समित्यांच्या बैठका आदी कार्यक्रम होतील.
दि. 14 रोजी आंबेडकर जयंती साजरी होईल. दि. 15 रोजी आंबेडकरांविषयी माहिती देणारी चर्चासत्रे होतील.