विरोधी पक्षांच्या सर्व आमदारांनी बैठकीत घेतला निर्णय; रणनीतीवरही चर्चा
गोवा विधानसभेच्या 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील आमदारांची पर्वरी येथे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या कार्यालयात काल बैठक पार पडली. या बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. पावसाळी अधिवेशनाचा कालावधी खूपच कमी असून, हा कालावधी वाढवून मिळावा, यासाठी विरोधी पक्षांचे आमदार गोवा विधानसभेच्या सभापतींची भेट घेणार आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पत्रकारांना दिली.
या बैठकीला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह काँग्रेस आमदार आल्टन डिकॉस्टा, ॲड. कार्लुस फेरेरा, आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस, क्रूझ सिल्वा, आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांची उपस्थिती होती. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई अनुपस्थित होते.
राज्य सरकार लोकशाही कमकुवत करण्याचा आणि विरोधी पक्षांत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.
आमच्यात काही मतभेद असले तरी विरोधी पक्षांतील सर्व आमदार एकजूट आहेत. या अधिवेशनासाठी समन्वित प्रश्न व एक सामायिक रणनीती स्वीकारली जाणार आहे. जनहितार्थ महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी किमान 30 दिवसांचे विधानसभा अधिवेशन आयोजित करण्याची विनंती विरोधी पक्ष सभापतींकडे करणार आहे, असेही आलेमाव यांनी सांगितले.
या तीन दिवसाच्या अधिवेशनासाठी प्रत्येक दिवशी भरपूर सरकारी खाती चर्चेसाठी निश्चित केली आहेत. पहिल्या दिवशी 25 सरकारी खाती, दुसऱ्या दिवशी 22 सरकारी खाती आणि तिसऱ्या दिवशी 14 सरकारी खाती असा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. राज्यात नागरिकांच्या भरपूर समस्या प्रलंबित आहेत. आमदारांना या अल्प कालावधीच्या अधिवेशनात नागरिकांचे प्रश्न मांडण्यात खूप अडचणी येणार आहेत, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

