अधिकार्‍यांची पाठराखण; दुकानदार निशाण्यावर

0
10

>> रेशन धान्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून नागरी पुरवठा खात्याला ‘क्लीन चीट’; घोटाळेबाज दुकानदारांची होणार चौकशी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने उघडकीस आणलेल्या लाखो रुपयांच्या रेशन धान्य घोटाळा प्रकरणी नागरी पुरवठा खात्याला काल ‘क्लीन चीट’ दिली. राज्यातील काही स्वस्त धान्य दुकानांतून शिल्लक राहणार्‍या तांदुळ आणि गव्हाची स्वस्त धान्य दुकानदारांकडून परस्पर विक्री केली जाते. नागरी पुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांचा त्यात थेट सहभाग नाही. सदर धान्य परस्पर विकणारे स्वस्त धान्य दुकानदार शोधून काढण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल प्रथमच रेशन धान्य घोटाळा प्रकरणी भाष्य केले. हा घोटाळा उघड झाल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका चालवली होती. अखेर काल मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
नागरी पुरवठा खात्याच्या राज्यभरातील गोदामांतून काही व्यक्ती स्वस्त धान्याची तस्करी करत असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार फोंडा येथील एका खासगी गोदामांत साठवून ठेवलेला सदर धान्य साठा पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला होता.

स्वस्त धान्य घोटाळ्याची कसून चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वस्त धान्य दुकानात महिन्याच्या शेवटच्या दिवसांत घाईघाईत स्वस्त धान्याची दलालांना विक्री केली जाते. महिन्याच्या शेवटच्या दिवसात अधिक धान्याची विक्री करणारे स्वस्त धान्य दुकानदार शोधून काढण्यात येणार आहेत. या स्वस्त धान्य घोटाळ्यातील मुख्य सूत्रधाराला देखील अटक केली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नागरी पुरवठा खात्याचे मंत्री रवी नाईक यांनी स्वस्त धान्याच्या गोदामामध्ये धान्य घोटाळा झालेला नसल्याचे गुन्हा अन्वेषण विभागाने छापा घातल्यानंतर स्पष्ट केले आहे. तसेच नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांनी देखील घोटाळ्याची शक्यता फेटाळली आहे.
… म्हणून भरारी पथकांची स्थापना
स्वस्त धान्य दुकानदारांकडून नागरी पुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांच्या संगनमताने शिल्लक धान्याची परस्पर विक्री केली जात आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. या प्रकारामुळे नागरी पुरवठा खात्याची गोदामे, स्वस्त धान्य दुकानांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक नियुक्तीची घोषणा नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक यांना करावी लागली आहे.

मुख्य सूत्रधाराच्या अटकपूर्व
जामिनावर आज सुनावणी
गुन्हा अन्वेषण विभागाने स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या मुख्य सूत्रधार सचिन नाईक बोरकर याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पणजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. गुन्हा अन्वेषण विभागाने सचिन नाईक बोरकर आणि वीरेंद्र म्हार्दोळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर ते दोघेही फरार झाले आहेत. त्यानंतर त्या दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी पणजी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. वीरेंद्र म्हार्दोळकर यांच्या जामीन अर्जावर २१ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

पोलिसांकडून चौकशी
गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक निधीन वालसन, पोलीस अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल पणजी, फोंडा व इतर भागांतील नागरी पुरवठा खात्याच्या धान्य गोदामांना भेट देऊन चौकशी केली. तसेच नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांतील कागदपत्रांची देखील तपासणी केली.

नेटवर्कअभावी काही ठिकाणी
ऑफलाईन पद्धतीने धान्याचे वितरण
राज्यातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार नागरी पुरवठा खात्याच्या तालुका कार्यालयातून त्यांच्या कोट्यानुसार धान्याची उचल करतात. धान्य वितरणासाठी बायोमेट्रिक मशीन ही ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. काही ठिकाणी नेटवर्क समस्येमुळे ऑनलाईन यंत्रणेत अडथळा येतो, त्यावेळी थेट ऑफलाईन पद्धतीने धान्याची विक्री केली जाते. त्याचबरोबर अनेक ग्राहक आपल्या कोट्यातील धान्याची उचल करत नाही. या दोन्हीचा फायदा उचलत काही दुकानदार परस्पर दलालांना धान्य विक्री करतात.

तिघांना सशर्त जामीन मंजूर
या धान्य घोटाळा प्रकरणातील तिघा संशयितांची सशर्त जामिनावर गुरुवारी सुटका करण्यात आली. त्यात प्रकाश कोरीशेट्टर, तोसिफ मुल्ला आणि राजकुमार गणेश हजम या तिघांचा समावेश आहे. तिघाही संशयितांची प्रत्येकी २० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, गुन्हा अन्वेषण विभागाने धान्य घोटाळा प्रकरणी पाच जणांना अटक केली होती. त्यातील हजरत अली सय्यद आणि विनयकुमार गुडीमनी या दोघांची फोंडा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने सशर्त जामिनावर बुधवारी सुटका केली होती.