अत्यंत घातक

0
13

लेबनानमधील हिज्बुल्लाचे दहशतवादी वापरत असलेल्या पेजर्समध्ये एकाचवेळी स्फोट घडवून इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने आपण आपल्या शत्रूचा काटा काढण्यासाठी कुठवर जाऊ शकतो हे दाखवून दिले आहे. लेबनान आणि सीरियामधील ठिकठिकाणच्या हिज्बुल्ला दहशतवाद्यांजवळच्या पेजरमध्ये एकाचवेळी हे स्फोट झाले आणि त्यात आठजण ठार, तर जवळजवळ तब्बल तीन हजार दहशतवादी जखमी झाले. येथे प्रश्न हिज्बुल्ला आणि इस्रायलचा नाही, तर मुळात हे कसे घडवले गेले आणि ह्याच तंत्राद्वारे मोबाईल फोनमध्येही अशा प्रकारे स्फोट घडवून आणता येऊ शकतील का हा आहे. त्याचे उत्तर जर होकारार्थी मिळत असेल, तर आज जवळजवळ सर्वच देशांपुढे असलेल्या दहशतवादाच्या अक्राळविक्राळ संकटाच्या पार्श्वभूमीवर हा एक फार मोठा धोका संभवतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आज मोबाईल फोनचा जमाना असला, तरी हिज्बुल्ला आपल्या दहशतवाद्यांना पेजर वापरण्यास सांगत असे. पेजर हे जुनेपुराणे तंत्रज्ञान असल्याने त्यात जीपीएस नसतेे, त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा इस्रायलला शोधता येऊ नये हेच त्यामागील कारण होते. पूर्वी मोबाईल फोन यायच्या आधी पेजर अवतरले होते. सुरवातीला त्यामध्ये संदेश पाठवल्यावर केवळ दीर्घ बीप होई आणि पेजरधारकाने मग लँडलाइनवरून फोन करणे अपेक्षित असे. त्यानंतर छोटेखानी स्क्रीन असलेले पेजर आले, ज्यावर छोटेखानी संदेश पाठवले जाऊ लागले. पण लवकरच मोबाईल फोनचा जमाना आला आणि पेजर कालबाह्य झाले. काल ज्या पेजर्सचा स्फोट झाला ते गेल्या एप्रिल – मे मध्ये हिज्बुल्लाने खरेदी केलेले होते. ज्या कंपनीत ते बनवले गेले ती गोल्ड अपोलो ही कंपनी तैवानची आहे, पण त्या कंपनीने खुलासा केला आहे, की पेजर्सवरील ब्रँड जरी त्यांचा असला तरी हे उत्पादन त्यांनी बनवले नसून त्यांच्या ब्रँडचे हक्क असलेल्या युरोपमधील बीएसी नामक कंपनीने बनवले आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की हे स्फोट नेमके कसे घडवले गेले. त्याच्या काही शक्यता अशा संभवतात – एक तर हे पेजर्स बनवतानाच त्यामध्ये प्रत्येकी तीन ग्रॅम स्फोटके पेरली गेली असावीत किंवा पेजर्सच्या पुरवठा साखळीत हस्तक्षेप करून त्यामध्ये हे फेरबदल केले गेले असावेत. पेजर उत्पादन करतानाच त्यात स्फोटके ठेवली गेली असतील, तर ही कंपनी कोणाची, त्याच्या उत्पादनावेळी त्यात स्फोटके कशी ठेवता आली हे प्रश्न उपस्थित होतात. जर पुरवठा साखळीत हस्तक्षेप करून नंतर बदल केले गेले असतील, तरी हा हस्तक्षेप कशा प्रकारे केला गेला हा कुतूहलाचा विषय बनतो. प्रत्यक्ष पेजर्समध्ये काही ग्रॅम स्फोटके ठेवली गेली होती हे तर स्पष्ट झाले आहे, परंतु त्यांचा स्फोट कसा घडवला गेला हे कळायला मार्ग नाही. पेजर्सवर रेडिओ लहरींद्वारे संदेश पाठवला जाऊ शकतो. मग इस्रायने सांकेतिक संदेश पाठवून हे स्फोट घडवले का, त्यासाठीचे कोणते अद्ययावत तंत्रज्ञान त्यांनी वापरले हाही महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण वर म्हटल्याप्रमाणे हे पेजर्स पाच – सहा महिन्यांपूर्वी हिज्बल्लाने खरेदी केलेले होते. म्हणजे इस्रायलने हे स्फोट घडवण्यासाठी किती तयारी केली होती हेही कळून चुकते. त्यामुळे हे गूढ उकलण्याची गरज आहे, कारण हेच तंत्रज्ञान वापरून उद्या मोबाईल फोनमध्ये स्फोट घडवले जाऊ शकतात आणि कोट्यवधींचा जीव धोक्यात आणला जाऊ शकतो. हे शक्य असेल तर प्रत्येकाच्या घरापर्यंत दहशतवाद दस्तक देईल आणि कोणीही सुरक्षित उरणार नाही, कारण आज मोबाईल फोन हा प्रत्येकासाठी जणू नवा अवयव होऊन बसला आहे. अधूनमधून मोबाईल फोनमध्ये स्फोट घडल्याच्या बातम्या येत असतात, परंतु हे फोन बहुधा स्वस्तातले आणि किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी केलेले असतात. नामांकित कंपन्यांच्या मोबाईलमध्ये ओव्हरचार्जिंगमुळे स्फोट झाल्याचेही दाखले आहेत. आजकाल मोबाईल फोनमध्ये लिथियमची बॅटरी असते. फोनमधील बॅटरीचे तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा त्यामध्ये असते. परंतु ती बंद पाडणारे एखादे सॉफ्टवेअर त्यामध्ये घुसडता येऊ शकते का आणि त्याच्या आधारे बॅटरीचे तापमान वाढवून स्फोट घडवता येऊ शकतो का ह्यावर आता तंत्रज्ञानाच्या विश्वात चर्चा सुरू झाली आहे. एआयच्या जमान्यात हे अशक्यही म्हणता येणार नाही. त्यामुळेच ह्याकडे गांभीर्याने पाहिले जाणे जरूरी आहे. असे करणे शक्य असेल तर केवळ मोबाईल फोनच नव्हे, तर इलेक्ट्रिक वाहनेही अशा प्रकारे लक्ष्य केली जाऊ शकतील. इस्रायलने काही हे पहिल्यांदाच केलेले नाही. 1996 साली हमासचा नेता याह्या अय्याश याला त्याच्या फोनमध्ये पंधरा ग्रॅम आरडीएक्स ठेवून त्याला स्फोटात उडवले होते. इस्रायलच्या ह्या सूडसत्रातून दहशतवादी जगतासाठी घातपाताचे एक नवे खूप मोठी व्याप्ती असणारे साधन तर खुले झालेले नाही ना?