केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
यापुढे निधन पावणार्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकरिता एक सामायिक समाधी स्थळ उभारण्याचे केंद्र सरकारने ठरविले असून दिल्लीत यापुढे अतिमहनीय व्यक्तींकरिता स्वतंत्र समाधी स्थळे उभारली जाणार नसल्याचे ठरविण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मध्य दिल्लीत यमुना नदीकिनारी ‘राष्ट्रीय स्मृती’ प्रकल्प उभारण्याचे ठरविले आहे. जागेच्या अभावामुळे वरील निर्णय घेतला गेला आहे. सध्या महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या समाधीस्थळांची जागा सुमारे २४५ एकर इतकी भरते. यामुळे आता माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या एकता स्थळानजीक राष्ट्रीय स्मृती उभारली जाईल व यापुढे राष्ट्रीय पदांवरील अतिमहनीय व्यक्तींचे अंत्यसंस्कार याठिकाणी केले जातील. यासंबंधीचा प्रस्ताव सर्वप्रथम २००० साली समोर आला होता मात्र तो प्रलंबित होता. याआधी राजघाटनजीक समाधीस्थळे बांधण्याचा प्रघात होता.
गांधी हेरिटेज सायट्स मिशनला परवानगी
राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्याशी संबंधीत वारसा स्थळांच्या जतन व देखभालीच्या उद्देशाने ‘गांधी हेरिटेज सायट्स मिशन’ स्थापन करण्यास काल केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. महात्मा गांधींशी संबंधित गोष्टींची देखभाल व व्यवस्थापनाची जबाबदारी त्याच्यावर असेल. महात्मा गांधींचा वारसा सांगणार्या सुमारे २ हजार जागा गोपाळकृष्ण गांधी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शोधल्या होत्या.