भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या १ नोव्हेंबर रोजी गोव्यात पोचणार असलेल्या जनचेतना यात्रेसाठीची सगळी तयारी पूर्ण झालेली असून दक्षिण गोव्यातील कुडचडे व उत्तर गोव्यातील म्हापसा अशा त्यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत त्यांना प्रत्येकी ५ हजार लोक उपस्थित राहणार असल्याचे गोविंद पर्वतकर व राजेंद्र आर्लेकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
सध्या अडवाणी यांची जनचेतना यात्रा केरळला पोचली असून १ नोव्हेंबर रोजी ती गोव्यात पोचणार असल्याचे ते म्हणाले. दोन्ही ठिकाणी होणार्या सभा तसेच ज्या ज्या ठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. त्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याचे पर्वतकर म्हणाले. अडवाणी यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा रक्षक तर असतीलच शिवाय स्थानिक पोलिसांचीही सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी मदत घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. अडवाणी हे ज्या मार्गाने येणार होते त्या मार्गावर एक पाईप बॉम्ब सापडल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात येणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले. एक कॉंग्रेस पक्ष सोडल्यास सर्वांनीच अडवाणी यांच्या भ्रष्टाचारविरोधी यात्रेला पाठिंबा व्यक्त केला असल्याचे ते म्हणाले. अडवाणी हे निष्कलंक राजकारणी असून त्यांच्या या यात्रेला विरोध करण्याचा कॉंग्रेसला अधिकार नसल्याचे ते म्हणाले. अडवाणी यांच्या भ्रष्टाचार विरोधी यात्रेला विरोध करणार्या कॉंग्रेसचे लाडके युवा नेते राहूल गांधी हे भ्रष्टाचार विरोधी यात्रा का काढत नाहीत. नुसते आदिवासींच्या घरी जाऊन भोजन करून ढोंगीपणा का करीत आहेत, असा प्रश्नही पर्वतकर व आर्लेकर यांनी केला. अडवाणी यांच्या भ्रष्टाचारविरोधी यात्रेला विरोध करणारे गोव्याचे खासदार शांताराम नाईक हे गोव्यातील दिग्वीजय सिंह असल्याचेही यावेळी आर्लेकर म्हणाले.
अडवाणी यांच्यावर एकदाच भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. हवाला प्रकरणी त्यांच्यावर जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते तेव्हा जोपर्यंत या आरोपातून आपण मुक्त होत नाही तोपर्यंत लोकसभेत येणार नाही अशी घोषणा त्यानी केली होती याची आठवणही यावेळी आर्लेकर यांनी करून दिली. भारतातील ज्येष्ठ राजकारण्यांपैकी त्यांच्या एवढे स्वच्छ चारित्र्याचे दुसरे नेते नसल्याने भ्रष्टाचार विरोधी यात्रा काढण्याचा त्याना जेवढा अधिकार आहे तेवढा अधिकार आणखी कुणाला नसल्याचे ते म्हणाले.
गोवा सरकारने १४४ कलम लागू करण्याचा निर्णय घेतलेला असून अशा परिस्थितीत ही यात्रा कशी होईल, असे पत्रकारानी विचारले असता अधिवेशनाच्या काळातही सरकार १४४ कलम लागू करत असते. मात्र, तरीही त्यावेळी कित्येक मोर्चे शहरात येतात असे ते म्हणाले. या यात्रेसाठी आवश्यक ती परवानगी मिळाली असल्याचेही त्यानी यावेळी स्पष्ट केले.