Home बातम्या अडवाणींची ‘जनचेतना’ यात्रा सुरू

अडवाणींची ‘जनचेतना’ यात्रा सुरू

0

बिहारमधील सिताब दिआरा या जयप्रकाश नारायण यांच्या जन्मस्थळाहून आपल्या यात्रेचा शुभारंभ ८३ वर्षीय अडवाणी यांनी केला. त्यानंतर छपरा येथे बिहारचे मुख्यमंत्री व जनता दल (संयुक्त) चे नेते नितीष कुमार यांच्या हस्ते यात्रेचे अधिकृतपणे उद्घाटन झाले. यावेळी लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील भाजन नेते अरुण जेटली, अनंत कुमार उपस्थित होते.

यावेळी बोलताना अडवाणी म्हणाले, जेपीनी (जयप्रकाश नारायण) भ्रष्टाचार व आणिबाणीविरुद्ध लढाईत दिलेल्या योगदानातून आपण प्रेरणा घेतली आहे. सामान्य लोक आज चिंताग्रस्त आणि निराश बनत चालले असून बळकट देश घडविण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करण्याची गरज आहे. या यात्रेदरम्यान विदेशातील काळे धन पुन्हा भारतात आणण्याची जोरदार मागणी करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आले कर बिहारप्रमाणे विकासाभिमुख नेतृत्व देशाला मिळेल असे यावेळी त्यांनी सांगितले.

नितीष कुमार यांनी सांगितले की, अडवाणी हे भ्रष्टाचाराशी लढाईत नेहमीच पुढे राहिले आहेत. दरम्यान, यात्रेची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून होणार होती. मात्र नंतर हे स्थळ बदलण्यात आले. अडवाणी या यात्रेत खास बनविलेल्या बस रथातून दिवसा ३०० कि. मी. प्रवास करणार आहेत. एकूण २३ राज्ये व चार केंद्रशासीत प्रदेशांतून यात्रा फिरेल.

लालूंचा राजभवन मार्च

दरम्यान, अडवाणींच्या यात्रेचा बिहारमधून शुभारंभ हा जयप्रकाश नारायण यांचा अपमान असल्याचे सांगत व मुख्यमंत्री नितीष कुमार यांनी अडवाणींच्या केलेल्या स्वागतास आक्षेप घेत राजद पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी राजभवनवर मोर्चा नेला.

संकेतस्थळ, मिसड् कॉल, रिंगटोन

अडवाणी यांच्या यात्रेचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने भाजपतर्फे खास संकेतस्थळ सुरू करण्यात आले. यात अडवाणींची भाषणे, ठिकठिकाणचे यात्रेचे वृत्तांत देण्यात येतील. याशिवाय मिसड् कॉलसेवाही सुरू करण्यात आली आहे. यानुसार ०२२६१५५०९०० या क्रमांकावर मिसड् कॉलदेणार्‍यास यात्रेचा ताजा वृत्तांत एसएमएसद्वारे पाठविला जाईल. याशिवाय युवकांना डोळ्यांसमोर ठेवून मोबाईल रिंगटोन्सही बनविण्यात आले आहेत.