अडवलपाल खाणपट्टा फोमेंतोकडे

0
9

>> दुसऱ्या टप्प्यातील खाणपट्ट्यांच्या लिलावास सुरुवात

राज्य सरकारच्या खाण खात्याच्या दुसऱ्या टप्प्यातील खाणपट्ट्यांच्या लिलावात अडवलपाल-थिवी येथील खाणपट्टा फोंमेंतो कंपनीने मिळविला आहे. अडवलपाल थिवी येथील 46 हेक्टर क्षेत्र असलेला खाणपट्टा फोमेंतो कंपनीने 58.85 टक्केवारीने मिळविला आहे.

राज्यातील दुसरा खाणपट्टा मिळविण्यास फोमेंतो कंपनीला यश प्राप्त झाले आहे. फोमेंतो कंपनीने पहिल्या टप्प्यात काले खाणपट्टा मिळविण्यास यश मिळविले होते. खाण खात्याने पहिल्या टप्प्यात चार खाणपट्ट्यांचा यशस्वी लिलाव करून बोलीधारक कंपन्यांना खाणपट्टे सुरू करण्यासंबंधी कागदपत्रे सुपूर्द केली आहेत. पहिल्या टप्प्यातील वेदांत कंपनीने डिचोली खाणपट्टा, साळगावकर कंपनीने शिरगाव खाणपट्टा, नाना बांदेकर कंपनीने मोन्त दी शिरगाव खाणपट्टा लिलावात मिळविला होता. राज्य सरकारचा पावसाळ्यानंतर खाणी सुरू व्हाव्यात म्हणून प्रयत्न सुरू आहे. राज्यातील खाणी गेली कित्येक वर्षे बंद असल्याने खाणव्याप्त भागातील अनेकांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

दुसऱ्या टप्प्यातील लिलावात पाच खाणपट्ट्यांचा लिलाव जाहीर केला आहे. उत्तर गोव्यातील या पाच खाणपट्ट्यांच्या लिलावाला खनिज कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे.
खाण खात्याकडून दुसऱ्या टप्प्यातील इतर चार खाणपट्ट्यांच्या लिलावाची प्रक्रिया येत्या 27 एप्रिलपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यात कुडणे कॉमोलेम खाणपट्टा, कुडणे खाणपट्टा, थिवी-पिर्णा खाणपट्टा आणि सुर्ला-सोनशी खाणपट्ट्यासाठी लिलाव घेतला जाणार आहे.