अटल सेतू बंद; पणजी, पर्वरीत पुन्हा वाहतूक कोंडी

0
10

>> ‘अटल सेतू’ वाहतुकीसाठी पूर्णत: बंद केल्याचा परिणाम; जलद कामासाठी निर्णय

मांडवी नदीवरील ‘अटल सेतू’ हा पुन्हा एकदा कालपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने पणजी, पर्वरी व आसपासच्या भागांतील वाहतुकीवर परिणाम होऊन वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. विशेषत: सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात अर्धा-अर्धा तास वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

काल वाहतूक पोलीस अधीक्षकांनी एका आदेशाद्वारे हा पूल वाहतुकीसाठी बंद केला. या पुलाच्या रस्त्यावर डांबरीकरण व अन्य काम करायचे असल्याने हा पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम विनाविलंब करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अटल सेतुवरील सगळे पदर या दुरुस्तीकामासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

दुचाकीचालक, विद्यार्थी, परीक्षार्थी आदींनी याची नोंद घ्यावी, असे कळवण्यात आले आहे. अटल सेतू बंद करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी होणार आहे. त्यामुळे परीक्षार्थी व अन्य विद्यार्थी तसेच सर्वांनीच आपल्या प्रवासाचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना वाहतूक पोलिसांनी केली आहे. वाहतूक पोलीस वाहतुकीवर लक्ष ठेवणार असल्याचेही कळवण्यात आले आहे.

गोवा विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वी पुलाच्या डांबरीकरणासाठी अटल सेतू वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता; मात्र अधिवेशनामुळे नंतर पूल खुला करण्यात आला होता. या आधी पूल बंद केला असता पणजी ते पर्वरी व पणजी ते बांबोळी, तसेच पणजी ते दोनापावला आदी ठिकाणच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. सकाळी व नंतर संध्याकाळच्या वेळी वाहतुकीची मोठी कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळत होते. आता पूल बरेच दिवस बंद राहणार असल्याने पुन्हा एकदा पणजी शहरात वाहतुकीची कोंडी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी पणजी व आसपासच्या भागांत वाहतूक पोलिसांना तैनात करण्यात येणार असल्याचे पोलीस वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.