अटल सेतू खुला; वाहतूक कोंडीतून सुटका

0
9

डांबरीकरण आणि दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला अटल सेतू काल दुपारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. काल या पुलाचे सगळ्या मार्गिका दुपारपासून वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीतून आता वाहनचालक आणि नागरिकांची सुटका झाली आहे.

हा पूल खुला करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेचे व खास करून वाहनचालकांचे आभार मानले. पुलावरील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी तो बंद करण्यात आल्याने लोकांचे खूप हाल झाले याची आपणाला जाणीव आहे . या काळात जनतेने जे सहकार्य केले त्याबाबत आपण त्यांचे मन:पूर्वक आभार मानत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
त्याचबरोबर या पुलाचे डांबरीकरणाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी कामगारांनी रात्रंदिवस ज्या प्रकारे काम केले, त्यासाठी आपण त्यांचेही आभार मानत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळ आणि कंत्राटदारांचेही आपण आभार मानत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

डांबरीकरणासाठी हा पूल बंद ठेवण्यात आल्याने पणजी शहरातील वाहतुकीवर कधी नव्हे एवढा परिणाम झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानेही या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेताना पणजी महापालिका, इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी, वाहतूक खाते, सार्वजनिक बांधकाम खाते आदींना नोटीसा जारी केल्या होत्या. अटल सेतू वाहतुकीसाठी बंद केल्याने पणजी ते मेरशी, पणजी ते पर्वरी आदी मार्गांवर वाहतुकीची कोंडी होऊन वाहनचालकांचे हाल होऊ लागले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेतली होती.