अजून किती बळी?

0
8

पावसाळा सुरू होतो न होतो तोच युवकांच्या बुडण्याच्या बातम्या यायला सुरूवात झाली आहे. आता हे दरवर्षीचे होऊन बसले आहे. 2020 ते 2025 ह्या पाच वर्षांत गोव्यात 419 जणांचा बुडाल्याने मृत्यू झाला. यावर्षी जानेवारी ते एप्रिल ह्या चार महिन्यांत 44 जण बुडाल्याने मृत्युमुखी पडले. ह्या जून महिन्यातच 13 तारखेला चौघे, 18 तारखेला 1 आणि परवा 21 तारखेला आणखी दोघे मिळून सात जण बुडून मृत्युमुखी पडले आहेत. गोव्यात बुडाल्याने होणारे सर्वाधिक मृत्यू हे समुद्रात नव्हे, तर गोव्याच्या अंतर्भागात झाले आहेत हे लक्षात घेतले तर खरा धोका कुठे आहे हे कळून चुकते. सरकार जनतेला आवाहन करते, नदीनाल्यांत, धबधब्यांवर, चिरेखाणींमध्ये साठलेल्या पाण्यांत पोहण्यासाठी अथवा स्नानासाठी न उतरण्याचे आवाहन प्रशासन करते, त्यासाठी काटेरी तारांची कुंपणे उभारते, तरीही युवक अत्यंत बेफिकिरीने पाण्यात उतरतात आणि हकनाक जिवाला मुकतात. समुद्रात बुडण्याच्या घटनाही अशाच प्रकारच्या. समुद्र कधी न पाहिलेले पर्यटक समुद्र पाहिला की वेडे होतात आणि पाण्यात असलेले उतार, भुसभुशीत सरकती वाळू, पाण्याचा जोर वगैरे कशाचा विचार न करता पाण्यात पुढे पुढे जात राहतात. खासगी जीवरक्षक यंत्रणेच्या तैनातीमुळे आजवर कितीतरी जीव वाचले असले, तरी हे प्रकार पूर्णांशाने थांबलेले नाहीत. पावसाळ्यात तर समुद्र खवळलेला असतो, परंतु त्याचीही तमा बाळगली जात नाही. हे झाले किनारपट्टीचे. परंतु गोव्याच्या अंतर्भागांमध्ये पावसाळ्यात नद्या आणि धबधब्यांमध्ये बुडण्याच्या सर्वाधिक घटना दरवर्षी घडतात, परंतु त्यापासून ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ हा बोध कोणी घेताना दिसत नाही. ही तरुणाई मौजमजेसाठी नवनव्या जागा शोधून काढत असते. आजकाल समाजमाध्यमांमुळे नवनव्या अपरिचित जागांची माहिती मिळत असल्याने तरुणाई तेथे धाव घेताना दिसते. त्या जागा धोकादायक ठरू शकतात, आपल्या जिवावर बेतू शकतात ह्याचा विचारही अशा वेळी केला जात नाही. स्थानिक नागरिकांसाठीही खरे तर हा उपद्रव असतो. अनेकदा पावसाळ्यात पाण्याची मजा लुटण्यासाठी जाणारे तरुण पार्टीच्या जोशात आणि मद्याच्या नशेत असतात. शिवाय स्थानिक परिसराचा, पाण्याच्या खोलीचा अंदाजही नसतो. त्यामुळे मौजमजेच्या नादात जरासा निष्काळजीपणा झाला की तो जिवावर बेतू शकतो. अशा घटना सातत्याने घडू लागल्याने सरकारने अनेक ठिकाणी, विशेषतः धबधब्यांच्या ठिकाणी पाण्यात उतरणे धोकादायक असल्याचे फलक लावले आहेत, परंतु त्याकडे बघतो कोण? काही ठिकाणी पर्यटन खात्याने स्थानिक जीवरक्षक नेमले आहेत परंतु अशा लोटणाऱ्या झुंडींना रोखणार कसे? मात्र, हकनाक जात असलेले हे बळी उघड्या डोळ्यांनी बघत बसणेही योग्य होणार नाही. किमान पावसाळी पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या निवडक ठिकाणी सुरक्षा जॅकेटस्‌‍ची सक्ती, जीवरक्षकांची तैनाती आणि धोकादायक ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करावाच लागेल. त्यासाठी स्थानिक जनतेचीच मदत घेतली गेली पाहिजे, कारण कोणालाही आपल्या गावात येऊन लोक बुडाले ही गावची बदनामी नको असते. त्यामुळे आपल्या गावातील किंवा गावानजीकच्या पावसाळी पर्यटनासाठी लोकप्रिय ठिकाणी बाहेरची मंडळी येऊन धांगडधिंगा करीत असतील, तर त्यांना त्यापासून रोखण्यासाठी, नुसत्या मौजमजेसाठी जरी ही मंडळी आलेली असली तरी त्यांना तेथील धोक्यांची कल्पना देणे ह्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी नक्कीच पुढाकार घेऊ शकतात. समाज माध्यमांवरील इन्फ्ल्यूएन्सर्सनीही अशा धोकादायक ठिकाणांची, तेथील धोक्यांची माहिती सामाजिक बांधिलकी मानून तरुणाईपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. स्थानिक ग्रामपंचायती आणि नगरपालिकांनी आपापल्या परिसरातील पावसाळी पर्यटनाच्या लोकप्रिय स्थळांवर दुर्घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना गांभीर्याने अमलात आणाव्या लागतील. त्यासाठी सरकारने दिशानिर्देश जारी करावेत व त्यांची कार्यवाही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून होईल हे पाहावे. अर्थात, हे उपाय पूर्णांशाने यशस्वी ठरतील असेही नाही. खरी गरज आहे ती स्वयंप्रेरणेने अशा धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याची. त्यासाठी तेथे धोका आहे हे कळले पाहिजे. अनेकदा अल्पवयीन मुले मजा करण्यासाठी म्हणून पालकांना न सांगता साहसी बेत आखत असतात. परंतु अनेकदा ते अंगलट येतात. एकटा बुडतो आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्याचाही बळी जातो. अशा दुर्दैवी घटनांनी कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत आणि ह्या घटना काही तुरळक नाहीत. सुरूवातीलाच म्हटल्याप्रमाणे ह्या वर्षी आतापर्यंतच्या सहामाहीतच बुडाल्याने झालेल्या मृत्यूंनी पन्नाशी गाठली आहे. ती आणखी वाढू नये!