रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजयोत्सवावेळी बेंगळुरू शहरात झालेली चेंगराचेंगरी अत्यंत ह्रदयद्रावक आहे. एका चौदा वर्षांच्या बालिकेसह विशी – तिशीतल्या कोवळ्या मुलांचा ह्या दुर्घटनेत बळी गेला. मुळात आयपीएल स्पर्धेतील विजय तो काय! परंतु अठरा वर्षांनंतर मिळालेल्या विजयाची जणू विश्वचषक स्पर्धेतील विजय असल्यागत हवा करण्यात आली आणि भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईत निघालेल्या विजयी मिरवणुकीच्या धर्तीवर विजयोत्सव साजरा करण्याचे घिसाडघाईने ठरवले गेले. एकीकडे चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयोत्सव साजरा करण्याचे ठरल्यावर मग कर्नाटक सरकार तरी कशाला मागे राहील? ह्या सोहळ्यात मिरवून घेण्याची हौस भागवून घेण्यासाठी विधानसौधमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्याचा घाट घातला गेला. एकाचवेळी दोन ठिकाणी दोन मोठे सोहळे आयोजित केले गेले. परिणामी सुरक्षा यंत्रणेवर प्रचंड ताण आला. त्यात ह्या सगळ्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तरूण मुला-मुलींची दोन्ही ठिकाणी रीघ लागली. परिणामी तीस हजार क्षमतेच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर तीन लाखांची गर्दी जमली. बहुतेक पोलीस बळ मात्र विधानसौधमध्ये अतिमहनीय व्यक्तींच्या सुरक्षेसाठी तैनात केले गेले. गर्दी वाढल्याने स्टेडियमची प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आणि गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. परिणामी धावाधाव आणि चेंगराचेंगरी होऊन हे सारे हकनाक बळी गेले. गर्दीच्या व्यवस्थापनाची कोणतीही तजवीज न करता गर्दीचे सोहळे आयोजित करून मोकळे होणे ही आपल्या देशात जणू परंपराच बनली आहे. अशा गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये केवळ अतिमहनीय व्यक्तींची सोय पाहिली जाते. आम नागरिकांची सुरक्षा मात्र त्यासाठी वाऱ्यावर सोडली जाते. त्यामुळे चेंगराचेंगरी होते तेव्हा आम नागरिकांचा बळी जातो. बेंगळुरूमध्येही काही वेगळे घडलेले नाही. कमालीची बेफिकिरी हेच ह्या दुर्घटनेचे खरे कारण आहे. आता ह्या घटनेची कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेतलेली आहे. त्यामुळे ह्या दुर्घटनेमागील कारणांची चौकशी होईल. एकमेकांवर दोषारोप होतील, परंतु पुढच्या वेळी अशाच प्रकारची दुर्घटना होणार नाही ह्याची मात्र खात्री कोणीही देऊ शकणार नाही. कर्नाटकमधील चेंगराचेंगरीची दूरचित्रवाणी वाहिन्यांवर तावातावाने चर्चा होते आहे, कारण तेथे सरकार काँग्रेसचे आहे. महाकुंभमध्ये किंवा शिरगावच्या जत्रेत अशाच प्रकारच्या बेफिकिरीमुळे चेंगराचेंगरी झाली त्यावर कोणी चर्चा केल्याचे दिसले नाही. म्हणजेच अशा दुर्घटनांचेही सोईस्कररीत्या राजकारण केले जात असते. सरकार कोणत्याही पक्षाचे का असेना, आयोजक कोणीही का असेना, गर्दी गोळा होईल अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करताना तेथे कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये ह्यासाठी योग्य व सर्वंकष पूर्वतयारी करण्याची जबाबदारी कोणाची हे निर्धारित झाले पाहिजे. पुरेशी पूर्वतयारी असेल तरच अशा प्रकारच्या गर्दीच्या कार्यक्रमांच्या आयोजनास परवानगी दिली गेली तरच अशा दुर्घटना टळतील. बेंगळुरू पोलिसांनी विजयी मिरवणुकीला परवानगी नाकारली होती. परंतु ऐनवेळी आरसीबीने ट्वीट केले की विजयी मिरवणूक निघेल आणि त्यासाठी मोफत प्रवेशिका दिल्या जातील. साहजिकच तरुणतरुणींची प्रवेशिका मिळवण्यासाठी आणि ह्या मिरवणुकीचा भाग होण्यासाठी झुंबड उडाली तर त्यात त्यांचा काय दोष? परंतु हे निमंत्रण म्हणजे साक्षात् मृत्यूचे निमंत्रण आहे ह्याची कल्पनाही कोणाला आली असेल काय? कोणताही कार्यक्रम आयोजित करीत असताना किती लोक येतील ह्याचा काही आडाखा बांधायचा असतो आणि त्यानुसार तयारी करायची असते. परंतु बेंगळुरूच्या आरसीबीच्या विजयोत्सव सोहळ्यात किती गर्दी जमेल ह्याचा काही अंदाजच केला गेलेला दिसला नाही. एकूण आयपीएल स्पर्धेचा झगमगाट आणि अठरा वर्षांनंतर मिळालेल्या विजयाची हवा व त्यात मुख्य म्हणजे विराट कोहलीला पाहण्याची त्याच्या हजारो चाहत्यांची अनावर ओढ ह्या सगळ्यातून ही अपेक्षेबाहेरील गर्दी जमली आणि जे घडू नये ते घडले. अनेक प्रश्न ह्या अशा दुर्घटना उपस्थित करतात, परंतु त्यांची उत्तरे मात्र कधीच शोधली जात नाहीत. चौकशी समित्या, अहवाल ह्यांचा घोळ घालून निष्कर्षाप्रत येईपर्यंत पुढील दुर्घटना घडून गेलेली असते. शिरगाव जत्रेतील चेंगराचेंगरीच्या अहवालाचे काय झाले? प्रशासन, देवस्थान समिती, पोलीस ह्या सगळ्यांनी एकमेकांकडे बोटे दाखवली. शेवटी कोण जबाबदार ठरले? कोणाला शिक्षा झाली? बेंगळुरूच्या चेंगराचेंगरीच्या बाबतीतही असेच होईल. पुन्हा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी अशीच झुंबड उडेल आणि हकनाक मानवी बळी जातील. हे थांबवण्यासाठी आपण काय करणार आहोत हा खरा प्रश्न आहे.