अजित शंखवाळकर याचा अटकपूर्वजामिनासाठी न्यायालयात अर्ज

0
17

अबकारी आयुक्त बनावट आदेश प्रकरणातील संशयित आरोपी अजित शंखवाळकर याने अटकपूर्व जामिनासाठी मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
पणजी पोलिसांनी अबकारी आयुक्त बनावट आदेश प्रकरणामध्ये अजित शंखवाळकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. मनोज तळेकर याला अबकारी आयुक्तपदी नियुक्तीचा बनावट आदेश देऊन 27 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच, संशयित अजित शंखवाळकर याने लेखाधिकारी नियुक्तीचे आमिष दाखवून 22 लाख घेतले आहेत. पणजी पोलीस या दोन्ही प्रकरणाची चौकशी करीत आहे. तथापि, अजूनपर्यंत संशयित आरोपी शंखवाळकर पोलिसांना सापडू शकला
नाही.

विशेष तपास पथकाद्वारे
चौकशी करा ः काँग्रेस

राज्यातील कथित नोकरी भरती घोटाळ्यांची न्यायालयाच्या देखरेखीखालील विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल केली. ‘पैशांच्या बदल्यात नोकरी’ (कॅश-फॉर-जॉब्स) घोटाळा आणि कथित बनावट अबकारी आयुक्त या प्रकरणांचा संभाव्य संबंध असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला.
अबकारी आयुक्त प्रकरणातील बनावट स्वाक्षऱ्या, सरकारी आदेशांमधील फेरफार आणि पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.
संशयित आरोपी अजित शंखवाळकर याला अटक करण्यास होत असलेल्या विलंबावरून गोवा पोलिसांच्या तपास पद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी चोडणकर यांनी केली.