– डॉ. सोमनाथ कोमरपंत
आपल्या देवनागरी लिपीचे गुणवैभव जितके वर्णावे तितके कमीच. तिच्या सौष्ठवाचा शास्त्रपूत विचार केला तो समर्थ रामदासांनी. ‘दासबोधा’च्या एकोणिसाव्या दशकात ‘शिकवणनाम’ या शीर्षकाखाली त्यांनी अक्षरलेखन कसे असावे याविषयी मौलिक मार्गदर्शन केले आहे. त्यांचा हा अक्षरविचार उद्धृत केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. द्रष्टेपणा आणि लेखनव्यवहार यांचा मेळ घालून ज्या बारकाईने सुलेखनाविषयी जे विचार त्यांनी मांडले त्यावरून त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित तर होतोच; शिवाय त्यांच्या सर्वसंचारी प्रज्ञेपुढे मती कुंठित होते. ‘दासबोधा’त त्यांनी कशाकशावर म्हणून लिहावे? असीमाचा प्रदेश आपल्या कवेत घेणारा हा अवलिया होता.
ते म्हणतात ः
अक्षर वळवून असे सुंदर करावे की ते पाहताच चतुरांना आनंद व्हावा. काळीभोर शाई (मसी) करून अक्षर वाटोळे, सरळ, मोकळे लिहावे. काळ्या कुळकुळीत ओळी अशा एकसारख्या लिहाव्यात की जणू काय मोत्यांच्या माळाच! प्रत्येक अक्षर नीट लिहावे. मधले अंतर एकसारखे असावे. पहिल्या अक्षरापासून ग्रंथ संपेपर्यंत पाहत गेलो तर एकाच टाकाने सर्व ग्रंथ लिहिला आहे असे वाटले पाहिजे. अक्षराचा काळेपणा, वळण, वाकण तशीच टाकाची जाडी सर्व काही सर्वत्र एकसारखे असावे. ओळीला ओळ लागू नये. रेघ आणि मात्रा एकमेकांमध्ये घुसू नयेत. खालच्या ओळीस वरची ओळ लागू नये. अति लांबट अक्षर काढू नये. अगोदर पान शिशाने रेखाटून त्यावर व्यवस्थित लिहावे. ओळीचे अंतर कमीजास्त नसावे. ग्रंथाची पाने आधी शिशाने रेखाटावीत आणि नेमके रेघांवर लिहावे. क्वचित शोध करावा लागला तर अडचण होऊ नये, लिहिण्यात चूक सापडू नये, ज्याने लिहिले त्याचीच फक्त गरज भागेल असे लिहू नये, लेखकाने कसर किंवा कुचराई केली असा आरोप होऊ नये. अल्पवयीन मुलाने फार जपून लिहावे. ते पाहून लोकांना मोह पडावा. तरुणपणात फार बारीक लिहिलेले अक्षर म्हातारपणी उपयुक्त ठरत नाही. म्हणून फार बारीक नव्हे आणि फार मोठे नव्हे असे मध्यम अक्षर असावे. सभोवार जागा सोडून मध्ये छानदार ठसठशीत लिहावे.
रामदासांच्या अक्षरलेखनविषयक सगळ्याच मुद्यांचा परामर्श येथे घातलेला नाही. पण रामदासांपासून चालत आलेल्या परंपरेचा स्वीकार आधुनिक कालखंडातील अक्षरतज्ज्ञांनी केलेला आहे. काही प्रयोग केले आहेत. अशा जाणकारांमध्ये प्रामुख्याने र. कृ. जोशी, अच्युत पालव, ल. ना. ऊर्फ अप्पा गोवेकर, श्रीकृष्ण बेडेकर, विनय सायनेकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. महेश वेंगुर्लेकर आणि गोविंद नाईक या सिद्धहस्त गोमंतकीय चित्रकारांनी अक्षरलेखनात स्वतःची पृथगात्म मुद्रा उमटविली आहे. लक्ष्मण पित्रे, अरविंद सायनेकर आणि रावजी जाधव यांची अक्षरसाधना निरंतर चालू आहे.
अच्युत पालव हे प्रतिभासंपन्न सुलेखनतज्ज्ञ आहेत. र. कृ. जोशींप्रमाणे त्यांनी आजमितीला अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे सजविली आहेत. आंतरिक सजावट केलेली आहे. रामदासांनी ग्रंथीत केलेली सुंदर हस्ताक्षरासंबंधीची सारी लक्षणे अच्युत पालवांच्या अक्षरलेखनाला लागू पडणारी आहेत. चित्र, काव्य आणि अक्षरलेखन या तीन सर्जनशील कलांचा संगम त्यांच्या सुलेखनकलेत झालेला आहे. अच्युत पालवांची ही अक्षरपालवी अनुभवताना अननुभूत आनंदाची लहर मनात तरळते. चित्तवृत्ती पुलकित होते. नेत्रांना निर्वाण प्राप्त होते. गेली काही वर्षे ‘शब्दब्रह्म’ ही अक्षरदैनंदिनी ते प्रसिद्ध करतात. ‘शब्दब्रह्म २०१३’ ही त्यांची दैनंदिनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत रामदास यांच्या मराठी मनाला आल्हाद देणार्या वाङ्मयसंचिताच्या अमृतानुभवावर आधारलेली आहे. वेधक मुखपृष्ठ तिला लाभलेले आहे. डॉ. यशवंत पाठक यांच्यासारख्या अमोघ शब्दकळेचा स्वामी असलेल्या रसज्ञ अभ्यासकाची प्रस्तावना वाचताना ‘समसमा संयोग की जाहला’ असे उद्गार उत्स्फूर्तपणे मुखावाटे निघतात. संक्षेपाने त्यांनी शब्दशक्तीचा महिमा सांगितलेला आहे ः
‘‘शब्द हा प्राण आहे. प्रत्येक शब्दाला स्वतंत्र श्वास आहे. हा श्वास कधी संजीवनी देतो. जीवन जगण्याची प्रेरणा देतो. शब्द हवेत विरत नाहीत. ते काळजाच्या गावातून वस्ती करतात. दिल्या शब्दाचा नि केल्या कामाचा माणूस आपला होतो. असे शब्द संत ग्रंथांमध्ये आहेत. संतांना भेटायचे असते ते त्यांच्या शब्दांमधून. शब्दांच्या समिधांनी त्यांच्या वाणीचा अखंड यज्ञ चालू असतो. काळावर फक्त शब्दांची सत्ता चालते. बाकी सारे काळाच्या अधीन आहे. काळ ज्याच्या अधीन होतो तो शब्द मृत्युंजयी असतो. तो संतांचा असतो. तेच पसायदान असते.’’
अच्युत पालव हे अक्षरांचे निस्सीम उपासक. ‘‘अक्षर हा माझा ध्यास, अक्षर हा माझा श्वास, अक्षर हेच माझे ध्येय, सबकुछ अक्षर!’’ हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र. ध्यास आणि अभ्यास एकात्म झाले तर अशी अभिनव अक्षरे अवतरतात. संचिताचा स्वर मग चिरंतनतेचे लेणे बनून येतो. जसे घारापुरीचे… अजिंठ्याचे… वेरुळचे.
पहिल्या पृष्ठावर परिपार्श्व भागावर सोनेरी अक्षरात ॐ येतो. त्यावर ज्ञानदेवीच्या पहिल्या अध्यायातील श्रीगणेशवंदन आणि श्रीशारदावंदन येते. या आदिबीजाला वंदन करूनच वाचक पुढचे पान उघडतो. मग येतो लाल रंगाचा गोळा… कुंकुमतिलक… पावित्र्याचे चिन्हे… भागवतधर्माचे प्रतीक… त्यानंतर स्वतंत्र पृष्ठावर ज्ञा हे अक्षर… ‘अक्षरामाझि विशदु’ ‘अकारू तो मी॥ ही अक्षरे निळ्या आणि लाल रंगावर स्वतंत्रपणे सजलेली. दोहोंमधली अची गगनगामी रेषा आल्हाददायी…. ‘विश्वाचे आर्त माझ्या मनीं प्रकाशलें’पासून सुरू झालेले शब्द ‘हृदयीं नटावला ब्रह्माकारें’पर्यंत येऊन थांबतात आणि आर्तजनांना प्रतीतिविश्रांती लाभते. नंतरच्या पृष्ठावर काळ्या पार्श्वभूमीवर ‘माझा मर्हाटाचि बोलु कवतिकें| परि अमृतातें हीं पैजेंसीं| ऐसीं अक्षरें चि रसिकें मेळवीन॥ ही अक्षरे उठून दिसतात. ‘अक्षरें’ हा शब्द ठळक करण्यात एक प्रयोजन आहे. तिमिरातून तेजाकडे जाण्याची प्रेरणा त्यातून सूचित झालेली आहे.
‘इवलेंसें रोप लावियलें दारीं…’ या ओव्यांतील अक्षरांतील लपेटदारपणा आशयातील भावलावण्याला आपल्या कवेत घेणारा. आसमंतातील हवादेखील येथे सुगंधाने भारल्यासारखी वाटते. ‘अवचिता परिमळु’मधील टाकाच्या फेकीमध्ये सुगंधाच्या लडीमागून लडी उलगडल्याचा आभास होतो. ‘चांचरती चांचरती बाहेरी निघालें’ ही सूक्ष्माक्षरांत रचना करताना भावृत्तीला नेमकेपणाने अच्युत पालवांनी पकडलेले आहे. ‘रंगा येई वोये’ या अक्षरांच्या रेषा तर अतिशय लयदार आणि धारदार. ‘हरिमुखें म्हणा हरिमुखें म्हणा| पुण्याची गणना कोण करी॥ भक्तिभाव घरातील जुन्या पोथीपठणाची आठवण करून देणारा. ‘देशियेचेनि नागरपणें| शांतु शृंगाराते जीणे|’मधील अक्षरसौष्ठव अत्यंत आनंददायी. ‘पुढां स्नेह पाझरे| मागा चालति अक्षरें| शब्दु पाठिं अवतरे कृपा आधी|’ ही अक्षरे आणि त्यांना तोलून धरणारे मधले बिंब मनाला ओलेचिंब करून सोडणारे. ‘माऊली’ या अक्षरांची उभट रचना मातीचे मार्दव सांगणारी. मातेचे मार्दव जाणवून देणारी. ‘हरि आला रे…’ आणि ‘हरि वाचे रे’मधील ‘हरि’ची आक्षरिक रचना आश्वस्त वाटते. ‘हरिमुखें म्हणा’ या ओळींवरचा पांढर्या रंगातला ‘ह’देखील वडीलधारा वाटतो. ‘जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती’ यातील अक्षरमुद्रा आणि वरचा काळा बुक्का अन् पांढरा टिळा आशयामधील श्रद्धेय भाव जागता ठेवण्यात यशस्वी झालेला आहे; पार्श्वभागाचा लाल रंग त्याला पोषक ठरलेला आहे. ‘अवगुणी अन्यायी किती म्हणोन सांगो’ ही रचना दोन वर्तुळाकारांत बसवून केंद्रस्थानी ‘मी’ असे अक्षर रचण्याने चित्राकृतीचे सौंदर्य तिला प्राप्त झालेले आहे. ‘दया तिचें नांव भूतांचें पाळण| आणीक निर्दळण कंटकांचे॥ या अक्षरांचे डौलदार वळण लक्ष वेधून घेणारे. ‘संसारतापें तापलों मी देवा’ या तुकारामांच्या अभंगातील अंतर्संघर्ष, दुःखमयता, आर्तता, एकाकीपणा आणि कासाविशी यांची व्यामिश्रता अच्युत पालवांनी अक्षरांच्या वळणा-वाकणांनी सूचित केली आहे. ‘आम्हां घरीं धन शब्दांचीच रत्नें| शब्दांचीच शस्त्रें यत्न करूं’ यांची रचना अच्युत पालवांनी ज्या कल्पकतेने आणि कलात्म पद्धतीने केलेली आहे की त्यामुळे चित्रकार म्हणून त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये प्रकट झाली आहेत. त्यातील बिंब-प्रतिबिंब भाव… काळ्या-पांढर्या रंगांतील अंतर्विरोधी लय लक्षणीय स्वरूपाची. ‘लहानपण दे गा देवा’ ही अक्षरे लहान, ‘ऐरावत’मधील ऐ मोठा करण्यातील मथितार्थ उमजून येतो. तीच गोष्ट ‘मुंगी आणि रावा’ या अभंगाची.
‘तुझ्या नामाची आवडी’ या अभंगाच्या रचनेतील रंगसंगती विलोभनीय स्वरूपाची. भागवतधर्माचा पाया आणि कळस येथे अमूर्त आकारात अनुभवण्याचा आनंद लाभतो. ‘मी कोण ऐसा निवाडा’ची रचना अशीच कलात्मक. त्यानंतर काही अभंग येतात पारंपरिक सुलेखनशैलीत. ‘विठ्ठल’ ही उभट आकाराची अक्षरे विठ्ठलमूर्तीच साकार करतात. ‘आनंदाचे डोही आनंदतरंग’ या आक्षरिक रचनेत आनंदरसाची कारंजी आहेत. ‘आपुलिया बळें नाहीं मी बोलत’ या अक्षरांतील नाजूक कळा या अभंगातील भावार्थाला पेलणारी आहे. यातील आ हे अक्षर सुरेख आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरीं वनचरें’ या रचनेतील लपेटदार, रेखीव स्वरूप ‘स्वानंदाचे जिव्हार’ साकार करते.
या दैनंदिनीमध्ये तुकारामांचे जे काही अभंग कलात्मकतेच्या अंगाने सर्वांगसुंदर झालेले आहेत त्यांत ‘सुख पाहतां जवापाडें| दुःख पर्वताएवढे’, ‘मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास| कठिण वज्रास भेंदूं ऐसे|’, ‘कार्तिकीचा सोहळा| चला जाऊं पाहूं डोळां’, ‘न लगे चंदना सांगावा परिमळ| वनस्पतिमेळ हाकारुनी’, ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग| अंतर्बाह्य जग आणि मन॥ ‘वेद अनंत बोलिला| अर्थ इतकाचि साधिला|’, ‘आपुलें मरण पाहिलें म्यां डोळा’, ‘अणुरणीयां थोकडा| तुका आकाशाएवढा॥ व ‘आम्ही जातों आपुल्या गावा’ या अभंगांची मांडणी अच्युत पालवांनी त्यांचे अंतरंग उमजून केलेली आहे. रंगसंगती तर अप्रतिम आहे.
अच्युत पालवांनी रामदासांच्या ‘दासबोधा’तील अक्षरलेखनाच्या मार्गदर्शनार्थ जे लिहिले त्यातील महत्त्वाची अधोरेखिते प्रस्तुत दैनंदिनीत आढळतात. ‘सत्यकथा’ मासिकाच्या बहराच्या कालखंडात र. कृ. जोशींनी रामदासांची अवतरणे कलात्मक ढंगांने रेखाटली होती. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून वेगवेगळ्या आकारांत, वेगवेगळ्या ढंगांत अच्युत पालव यांनी ही आक्षरिक रचना केलेली आहे. या अवतरणांत ‘ब्राह्मणें बाळबोध अक्षर| घडसुनी करावें सुंदर|’, ‘शुद्ध नेटकें ल्याहावें’, ‘अक्षर सुंदर, वाचणें सुंदर’ इत्यादी रचना आहेत. रामदासांनी देवादिकांचे केलेले स्तवन येथे आढळते. विशेषतः श्रीगणेशवंदन, गुरुवंदन यांचा येथे उल्लेख करावा लागेल. अन्य विषयांवरील रचनादेखील तेवढ्याच रेखीव केलेल्या आहेत. त्यात ‘आत्मज्ञान जीर्ण जर्जर| त्याचा करी जीर्णोद्धार’, ‘विस्कळित मातृका नेमस्त कराव्या’, ‘नाना रत्ने साठविली| ते अभाग्याने त्यागिलीं’, ‘अक्षरें गाळून वाची’, ‘धीट पाठ प्रासादिक| ऐसें बोलती अनेक|’, ‘आधीं प्रपंच करावा नेटका| मग घ्यावें परमार्थविवेका|’, ‘उत्तम संगतींचे फळ सुख| अधम संगतीचें फळ दुःख|’, ‘उत्तम संगती घराची| आपली आपण चिंता करावी’ आणि ‘जाणत्यापासीं लेहो सिकावें| जाणत्यापासी वाचूं सिकावें|’ या आशयाची अक्षररेखाटने अच्युत पालव यांनी अत्यंत तन्मयतेने केलेली आहेत.
सर जे. जे. उपयोजित कला महाविद्यालय एलिमेन्टरीच्या वर्गात असताना प्रा. र. कृ. जोशी यांच्याकडून खास लेक्चरमधून जे अच्युत पालवांना मिळाले ते पुढील सुलेखनकलेचे पाथेय ठरले. या संदर्भात अच्युत पालव म्हणतात ः
‘‘अलीकडे प्रसिद्ध झालेल्या माझ्या‘ऊर्जाक्षर’ या पुस्तकात ‘ख श्रळज्ञश ींे लश र वेीं. खीं हरी शुळीींशपलश र्लीीं पे वळाशपीळेप’ हे कदाचित मला न कळलेल्या र. कृ. जोशींच्या बिंदूतूनच आलं असावं. पण खरा साक्षात्कार झाला तो इथेच.’’ (लोकमत, अक्षरयोग, दीपोत्सव २००८, पृ. १२८). संतांची वचने अच्युत पालवांनी आपल्या अक्षररचनेच्या दैनंदिनीतून मांडली त्या संदर्भात ते म्हणतात ः
‘‘संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास यांची शब्दरचना घेऊन मी लोकांसमोर गेलो हा केवळ आनंद नसून, तो अक्षरानुभव आहे, हे मी दैनंदिनीमार्फत लोकांसमोर मांडलं. या अक्षरानुभवातून मी बर्याचदा अक्षरांच्या पलीकडे गेल्याचा आनंद अनुभवत होतो. कधीकधी अक्षरांच्या आकारात एवढा गढून जायचो की नकळतपणे या तिन्ही संतांनी मांडलेले अनुभव माझ्या अक्षरांतून कागदावर उमटायचे.’’ (तत्रैव, पृ. १३०)
देवनागरी लिपीबरोबर मराठीत एकेकाळी प्रचलित मोडी लिपीचा आपल्या वळणदार अक्षरलिपीत अच्युत पालव यांनी समावेश करून घेतला. वेगवान लिहिण्यासाठी या लिपीचा उपयोग होत असे. वळण-वाकण आणि सौष्ठव बिघडवू न देता. एकाएकी ही लिपी का मागे पडली हे कळायला मार्ग नाही. ‘दीपलक्ष्मी’ मासिकाचे संपादक ग. का. रायकर यांनी ती टिकविण्यासाठी प्रयत्न चालविले. अच्युत पालव यांनी अक्षरलिपीद्वारा तिची पुनर्प्रतिष्ठा वाढावी म्हणून काही प्रयोग केले. या संदर्भात त्यांचेच विचार समजून घेणे अगत्याचे ठरेल. ते म्हणतात ः
‘‘पुढे इतर लिप्यांचा या लिपीवर पडलेला प्रभाव आणि तरीही त्यातून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व राखून ठेवणारी ही लिपी माझ्या पुढच्या आयुष्याची ओळख ठरेल, याची तेव्हा सुतरामही कल्पना नव्हती. तिच्यामागे धावताना एक नव्या प्रवासाला सुरुवात झाली. या वेगवान सौंदर्यात माझी मला दिशा सापडली. हिच्यात एवढं सौंदर्य असूनही ही लिपी मागे का पडली? याचा शोध घेता घेता काही नव्या गोष्टी समोर आल्या आणि कलेचा आणि इतिहासाचा मेळ घालता येईल काय, याचा विचार करू लागलो.’’ (तत्रैव, पृ. १३०)
अच्युत पालवांचे अक्षरांची अखंडितपणे साधना करताना समांतरपणे तद्विषयक चिंतन चाललेले असते. या अक्षरप्रवासातील काही संस्मरणे, काही तरंग ते वेळोवेळी टिपत असतात. त्यांच्या मनातील सर्जनात्मकतेचा हा शोधदेखील त्यांच्या अक्षरांच्या सौंदर्यात्मक आकृतींसारखाच आल्हाददायी असतो. या लेखनात काव्यात्मकतेचे रंग आहेत. मिताक्षरी छंद त्यात आहेत. रेखाटनकला (रीीं ेष ळश्रर्श्रीीींीरींळेप) यातूनही साकार होत असल्याचा प्रत्यय येतो. त्यांच्या संवादातून आपल्याला मौलिक विचारांचे अंतःसूत्र गवसल्याचा आनंद लाभतो ः
‘‘भारत देश हा शेतीप्रधान आहे, तसाच तो लिपीप्रधान आहे. वेस बदलली की लिपी बदलते. भाषा बदलते, हा अनुभव जगात कुठेही तुम्हाला येणार नाही, तो या देशात मिळाला.’’
देवनागरी लिपी हा आपला राष्ट्रीय ठेवा आहे. तो आपण जपायला हवा. ही लिपी चित्रदर्शी आहे. त्यामुळे अच्युत पालवांना नवनिर्मितिक्षमतेची प्रेरणा मिळालेली आहे. अक्षरांकडे ते सचेतनत्वाने लक्ष पुरवितातच; शिवाय अंकांनाही विविध आकार देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांचे अक्षरांवर, लिपीवर, भाषेवर, वाङ्मयावर आणि व्यापक संस्कृतीवर निस्सीम प्रेम आहे. या ओथंबलेपणाची रूपकळा त्यांच्या अक्षरयोगात सामावलेली आहे. अच्युत पालवांचा हा ध्यासपंथ मुलखावेगळा आहे.

