(अग्रलेख) एक झुंज सरली…

0
290

 

‘जो अभिनय वाटत नाही, तोच सर्वांत चांगला अभिनय’ असे म्हणतात. अभिनयातील हाच सहजसुंदरपणा घेऊन दूरचित्रवाणीच्या पडद्यापासून चित्रपटाच्या बड्या पडद्यापर्यंत आणि बॉलिवूडपासून अगदी हॉलिवूडपर्यंत मजल मारलेला प्रतिभाशाली अभिनेता इरफान खान याने काल अचानक या दुनियेतून कायमची एक्झिट घेतली. चित्रपटातील नायक हा गोंडस चेहर्‍याचा, तुकतुकीत अंगकांतीचा, चॉकलेट हिरोच असला पाहिजे हे ठोकताळे खोटे पाडत जे मोजके कलाकार केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर पुढे आले आणि त्यांनी या झगमगत्या चित्रपटनगरीत आपले स्थान पक्के केले, त्यापैकी एक म्हणजे इरफान.

टीव्ही मालिकांमधल्या छोट्या छोट्या भूमिकांनी त्याने सुरवात केली खरी, परंतु राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा स्नातक असलेल्या इरफानने आपल्या अभिनयाच्या जोरावर आतापावेतो जी काही मजल मारली आहे ती थक्क करणारीच आहे. ऐंशीच्या दशकामध्ये मीरा नायरच्या ‘सलाम बॉम्बे’ सारख्या चित्रपटांतला इरफान आणि अगदी ताज्या ‘अंग्रेजी मीडियम’ मधला इरफान यामधून खूप पाणी वाहून गेलेे असल्याचे जाणवल्यावाचून राहात नाही. अभिनयाविषयी अधिकाधिक समज आणि अधिकाधिक पक्वता त्याच्यात सातत्याने दिसत राहिली म्हणूनच तो एवढ्या मोठ्या बॉलिवूडमध्ये इतकी वर्षे आपली वेगळी मुद्रा उमटवू शकला. आपण साकारत असलेल्या व्यक्तिरेखेच्या कंगोर्‍यांबाबतची प्रगाढ समज त्याच्यापाशी सुरवातीपासूनच होती, परंतु त्याच्या व्यक्तिमत्त्वास अनुरूप अशा भूमिका त्याला शोधत येऊ लागल्या तेव्हापासून त्याचा करिअर ग्राफ उंचावत गेला. त्याचा आवाज दमदार होताच, परंतु उच्चारणाची स्वतःशीच पुटपुटल्यासारखी त्याची अशी संवादफेकीची शैली चित्रपट रसिकांना त्याच्या भूमिकेकडे अधिक बारकाईने लक्ष देण्यास भाग पाडायची हेही तितकेच खरे. त्याचे सदैव जागरणाने तारवटल्यासारखे बटबटीत डोळे रुपेरी पडद्यावर विलक्षण बोलके होत. त्याचा तो एक यूएसपीच बनून गेला होता. हिरोचे पारंपरिक रंगरूप नसले म्हणून काय झाले, आपल्या वाट्याला आलेल्या नानाविध प्रकारच्या भूमिका त्याने त्यांच्याशी पूर्ण इमान राखून समरस होऊन साकारल्या असे निश्‍चित म्हणता येते. ‘हासील’ सारख्या चित्रपटातला त्याचा अलाहाबादी धतिंग विद्यार्थी नेता, नसिरुद्दिन शाह, ओम पुरी, पंकज कपूर यांच्या सारख्या कसलेल्या अभिनेत्यांच्या पावलांवर पाऊल टाकत ‘मकबुल’ किंवा ‘नेमसेक’ मध्ये त्याने तबूसारख्या संवेदनशील अभिनेत्रीसह गाठलेली अभिनयाची उत्तुंगता, ‘बिल्लू बार्बर’ सारख्या चित्रपटातली त्याची करुणास्पद घालमेल, ‘पिकू’ मध्ये महानायक अमिताभच्या समोर समर्थपणे उभे राहण्याची त्याची धडाडी.. ज्या ज्या भूमिका वाट्याला आल्या, त्यांना वेळोवेळी पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न त्याने केला.

२००१ साली त्याने ‘वॉरिअर’ सारखा आंतरराष्ट्रीय चित्रपट केला, तेव्हा बाहेर त्याचे कौतुक झाले, परंतु भारतात थंडा प्रतिसाद होता. पण चित्रपट महोत्सवांतून त्याच्या अभिनयाची वाहवा झाली. विदेशी चित्रपटनिर्माते त्याला शोधत मुंबईपर्यंत येत राहिले. ‘जंगलबुक’च्या हिंदी आवृत्तीला स्वतःचा आवाज देण्यापासून ‘अमेझिंग स्पायडरमॅन’ पर्यंत त्यानेही सर्वस्वीकारार्हता ठेवली आणि त्यातून सतत चर्चेतही राहिला. हे करीत असताना भारतात वाट्याला आलेल्या भूमिका स्वतःच्या ताकदीवर तो पेलत राहिला. गोव्याच्या इफ्फीत सादर झालेल्या ‘लाइफ ऑफ पाय’ सारख्या विदेशी चित्रपटाला त्याने स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे पेलले होते. एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील असे चित्रपट करीत असताना दुसरीकडे ‘पानसिंग तोमर’ सारख्या चित्रपटांतून त्याने स्वतःचा चाहतावर्गही विकसित करीत नेला.

वयाच्या ५३ व्या वर्षी इरफान हे जग सोडून गेला असला तरी तसे पाहता त्याची कारकीर्द पंचवीसहून अधिक वर्षांची आहे हे विसरून चालणार नाही. भले भले बाजूला फेकले जातात, तेथे इरफान मात्र सतत चर्चेत राहिला. मुख्य धारेतील चित्रपटांमधून त्याच्या अभिनयाची जशी वाहवा होत गेली, तशीच चित्रपट महोत्सवांमधील आस्वादकांनाही त्याच्या अभिनयातील वेगळेपणा जाणवल्यावाचून राहिला नाही. पाश्‍चात्त्य चित्रपटसृष्टीत तर तो भारताचा एक चेहरा बनून राहिला होता. बॉलिवूडमध्ये खानांची सद्दी होती, परंतु त्या खानांपेक्षा हा खान वेगळा होता. त्याचे मूळ नाव साहबजादे इरफान अली खान. पण या साहबजाद्यांनी पुढे पुढे तर आपले खान हे आडनाव लावणेही सोडून दिले होते. त्याच्या लोकप्रियतेला बिरुदांची गरज नव्हती. परंतु ‘पद्मश्री’ ने त्याच्या यशावर चार चॉंद लावले. ज्याला हिंदीमध्ये ‘सुलझा हुआ इन्सान’ म्हणतात तशा प्रकारचा हा एक समंजस गुणी अभिनेता होता. सुरवातीचा त्याचा काळ विलक्षण संघर्ष करण्यात गेला खरा, परंतु नंतरच्या काळात त्याला स्वतःची वाट गवसली होती. त्या वाटेवरून पूर्ण निष्ठेने मार्गक्रमणा करीत असतानाच त्याला कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीने मध्येच गाठले. त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर पार कोलमडून गेला असता. चित्रपट कारकिर्दीचीही इतिश्री होऊन गेली असती, परंतु इरफान त्या वादळातही निर्धाराने उभा राहिला. झुंजला.

जनता कर्फ्यूच्या दोनच दिवस आधी प्रदर्शित झालेल्या ‘अंग्रेजी मीडियम’ या ताज्या चित्रपटाकडून त्याच्या खूप अपेक्षा होत्या. त्याच्या प्रसिद्धीसाठी फिरण्याचीही त्याची इच्छा होती. परंतु त्या आधीच कोरोनाचे संकट देशावर घोंगावले आणि त्याचे त्या चित्रपटाचे यश पाहण्याचे स्वप्न एकाएकी भंगले. नुकतेच त्याच्या आईचे जयपूरमध्ये निधन झाले होते व लॉकडाऊनमुळे त्याला तिचे अंत्यदर्शनही घेता आले नव्हते. काल वर्सोव्याच्या स्मशानभूमीत या गुणी अभिनेत्याला ‘सुपूर्द ए खाक’ करण्यासाठी मोजकेच लोक हजर होते. मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट असल्यामुळे त्याच्या अंत्यसमयी केवळ वीस लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. परंतु ज्या प्रचंड प्रमाणावर सोशल मीडियावरून, ट्वीटरवरून, अन्य माध्यमांतून त्याच्याप्रतीच्या भावभावना व्यक्त झाल्या, त्यातच त्याचे मोठेपण सामावले आहे. एका गुणी अभिनेत्याला आपण मुकलो आहोत. एक उभरती कारकीर्द अर्ध्यावरच मिटली आहे.