ओरिसाच्या व्हीलर बेटावरून काल सकाळी ८.०७ वा. चाचणी घेण्यात आली. या चाचणीनंतर भारत आता ‘एलिट राष्ट्रांच्या’ पंक्तीत बसला आहे. सध्या केवळ अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन व ब्रिटन यांच्याकडेच आंतरखंडीय क्षेपणास्त्रे चालविण्याचे तंत्रज्ञान आहे.
१७.५ मिटर उंचीच्या या क्षेपणास्त्रात ५० टन वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यापैकी १.५ टन अण्वस्त्रे असतील.(मात्र ती कालच्या चाचणीवेळी वापरली गेली नाहीत) काल चाचणीवेळी क्षेपणास्त्राने ६०० कि.मी. उंच आकाशात उसळी घेतली व त्यानंतर हिंद महासागरात ५ हजार लांब लक्ष्य अचूकपणे गाठले. तीन वर्षांपूर्वी वैज्ञानिकांनी या क्षेपणास्त्रावर काम करणे सुरू केले होते.
येत्या काळात या क्षेपणास्त्राच्या आणखीन दोन तीन चाचण्या घेतल्या जाणार असून त्यानंतर २०१४-१५च्या दरम्यान ते ताफ्यात अधिकृतरित्या सामील करून घेतले जाईल.
दरम्यान, ही चाचणी परवा संध्याकाळी होणार होती मात्र खराब हवामानामुळे ती रद्द करून काल घेण्यात आली.
क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) वैज्ञानिकांनी आनंद व्यक्त केला.
पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रपती प्रतिभा सिंग पाटील, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, संरक्षण मंत्री ए. के. अँथनी आणि भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी वैज्ञानिकांचे अभिनंदन केले व भारताच्या संरक्षण कार्यक्रमाची ही एक मोठी उपलब्ध असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. भारताकडील अन्य अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे व त्यांचा पल्ला याप्रमाणे – अग्नी १ (७०० कि.मी.पर्यंत), अग्नी २ (२ हजार कि.मी.पर्यंत ा), अग्नी ३ (३ हजार कि.मी.पर्यंत), अग्नी ४ (३५०० कि.मी.पर्यंत), पृथ्वी १ (१५० कि.मी.पर्यंत-सध्या लष्करात), पृथ्वी २ (२५० कि.मी.पर्यंत-सध्या हवाई दलात), पृथ्वी ३ (३५० कि.मी.पर्यंत- सध्या नौदलात), सागरिका (७०० कि.मी.पर्यंत पाण्यातून पाण्यात मारा, काम सध्या अंतिम टप्प्यात)
चीनकडून सावध प्रतिक्रिया
भारताने क्षेपणास्त्राच्या लक्ष्याबाबत काहीही नमूद केले नसले तरी प्रथमच भारताने चीनपर्यंत लक्ष्य गाठू शकणारे क्षेपणास्त्र विकसित केल्याच्या प्रतिक्रिया जगभरात उमटल्या. खुद्द चीनने या चाचणीची दखल घेतली मात्र त्याबाबत सावध प्रतिक्रिया देताना भारत-चीन ही शत्रू राष्ट्रे नव्हेत, दोन्ही देशांचे चांगले संबंध आहेत, असे म्हटले. दोन्ही देशांनी मैत्रीपूर्ण संबंध राखून सहकार्याने वाटचाल केली पाहिजे असेही चीनने म्हटले आहे.
मात्र चीनी प्रशासनातील सूत्रांनुसार चीनने ही चाचणी गंभीरपणे घेतली असून दोन्ही देशांत शस्त्रांस्त्रे विकसित करण्याची स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे.
चीनच्या पराराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, दोन्ही देश परस्पर सहकार्याने विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहेत. क्षेपणास्त्राची पोच चीनपर्यंत असल्याबद्दल विचारल्याने प्रवक्त्याने सांगितले की, दोन्ही देश उभरत्या महासत्ता आहेत, मात्र शत्रू राष्ट्रे नव्हे. दरम्यान, चीनमधील काही वृत्तपत्रांनी मात्र भारताच्या क्षेपणास्त्रास तीव्र आक्षेप दर्शविला. काहींनी चीनची बाजू घेत भारतापेक्षा चीनची शस्त्रास्त्रे अधिक विकसित असल्याचे लिहिले आहे. चीनमधील प्रसार माध्यमे ही सरकारच्या कडक नियंत्रणाखाली असतात त्यामुळे क्षेपणास्त्राच्या बातम्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. चीनच्या पिपल्स लिबिरेशन आर्मीचा स्वत:चा गुप्त क्षेपणास्त्र विकसित करण्याचा कार्यक्रम असून त्यांच्याकडे शेकडो अण्वस्त्रे आहेत. चीनच्या क्षेपणास्त्रामध्ये भारतातील अनेक शहरे लक्ष्य करण्याची क्षमता आहे. शिवाय चीनने पाकिस्तान व उत्तर कोरियालाही क्षेपणास्त्रांसाठी वेळोवेळी सहाय्य केले आहे.