मुख्यमंत्र्यांची माहिती; उद्योग, इमारतींसाठी अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घ्या
अग्निशमन कर्मचारी वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून मदतकार्य करीत असतात. त्यामुळे राज्यातील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना या आर्थिक वर्षापासून ‘अग्नी जोखीम भत्ता’ दिला जाणार आहे. अग्निशमन कर्मचारी हे खरे आघाडीचे योद्धे आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त सांतइनेज पणजी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना काल सांगितले.
राज्यात इमारती बांधकाम, उद्योगांनी अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. अग्निशमन दलाकडून अग्निसुरक्षेबाबत वारंवार पाठपुरावा केला जातो. ही छळवणूक नसून, सुरक्षा आहे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाने मागील वर्षात चांगली कामगिरी बजावली आहे. तसेच, 398 नागरिकांचे प्राण वाचविले असून, 44 कोटी रुपयांची मालमत्ता वाचविली आहे. राज्यातील अग्निशमन कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, उपकरणे आणि मानव संसाधने विकसित करण्यावर भर दिला जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात 350 आपदा मित्र आणि आपदा सखी स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. हे स्वयंसेवक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्याचे काम करणार आहेत. गोवा सरकारकडून आपत्तींना तोंड देण्याची तयारी केली जात आहे. त्यासाठी अनेक आपत्कालीन केंद्रे तयार करण्यात आली आहेत. नागरिकांनी सुरक्षित गोव्यासाठी अग्निसुरक्षा उपायांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कर्तव्यावर आपले प्राण अर्पण करणाऱ्या अग्निशमन कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अग्निशमन कर्मचारी, स्टेशन अग्निशमन अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांचा प्रशस्तिपत्रे प्रदान करून सन्मान केला.
यावेळी मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, अग्निशमन सेवा संचालक नितीन रायकर व इतरांची उपस्थिती होती.