अखेर हटलेच!

0
60
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी ठाण मांडून बसलेल्या आणि कितीही गंभीर आरोप झाले तरी कोणालाही दाद न देणार्‍या नारायणस्वामी श्रीनिवासन यांची उचलबांगडी करून आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना बीसीसीआयचे कार्याध्यक्ष बनवून सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेटची एक शोकांतिका संपुष्टात आणली आहे. हे श्रीनिवासन महाशय भारतीय क्रिकेटची प्रतिष्ठा धोक्यात आली तरीही आपल्या खुर्चीला गुळाच्या ढेपेला मुंगळा चिकटून राहावा तसे गच्च चिकटून बसले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे जणू आपल्या इंडिया सिमेंटचीच एक उपकंपनी असल्याच्या थाटात त्यांचा आजवरचा कारभार चालला होता. त्यांच्या जावयावर गुरूनाथ मय्यप्पनवर सट्टेबाजीचा गंभीर आरोप झाला तेव्हाच नैतिकदृष्ट्या बीसीसीआयचे अध्यक्षपद त्यागणे हे श्रीनिवासन यांची प्रतिमा उंचावून गेले असते. परंतु कोणत्याही परिस्थितीत पद सोडायचे नाही असा जणू निर्धारच त्यांनी केला होता. मंडळाच्या बैठकीत आपल्या जावयाविरुद्धची चौकशी होईस्तोवर आपण त्या पदापासून दूर राहू असा सोयीचा तोडगा स्वतःच काढून श्रीनिवासन यांनी स्वतःचे पद वाचवले होते.

मय्यप्पनला जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी समितीने दोषी धरले, तेव्हातरी निदान श्रीनिवासन यांनी पायउतार होण्याची तयारी दाखवायला हवी होती. पण तेव्हाच काय, सर्वोच्च न्यायालयाने पद सोडण्यास सांगितले तरी हे आपले खुर्चीला चिकटलेलेच! त्यामुळे अखेर सर्वोच्च न्यायालयाने अखेरचा दणका देऊन या महाशयांची गच्छन्ती तर केली आहेच, शिवाय क्रिकेटवर प्रेम करणार्‍या आणि क्रिकेटसाठी आयुष्य वेचलेल्या गावस्करसारख्या ज्येष्ठ खेळाडूच्या हाती बीसीसीआयची धुरा सोपवून भारतीय क्रिकेटला जणू जीवदान दिले आहे. श्रीनिवासन यांनी बीसीसीआय आणि आयपीएलमध्ये आपल्या कंपनीची माणसे घुसडली होती. सीईओ सुंदर रमण, आयपीएलचे सीएफओ प्रसन्न कन्नन यांच्यापासून ते बीसीसीआयचे कायदा सल्लागार आणि अंतर्गत लेखापरीक्षकदेखील इंडिया सिमेंटशी आणि श्रीनिवासन यांच्याशी संबंधित होते. या सार्‍या मंडळींना येत्या आयपीएलपासून दूर ठेवण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांना येत्या आयपीएल ७ मध्ये खेळण्याची मुभाही न्यायालयाने दिलेली आहे. गावस्करला बीसीसीआयचा कार्याध्यक्ष या नात्याने आयपीएलच्या कारभारात लक्ष घालण्याचे अधिकारही न्यायालयाने दिले आहेत. बीसीसीआयसारख्या खासगी संस्थेवर गावस्कर यांची न्यायालयाकडून थेट नियुक्ती होणे हा वादविषय होऊ शकतो, परंतु या देशातील तमाम क्रिकेट चाहत्यांच्या भावनांचा आदरही त्यातून राखला गेला आहे. क्रिकेट असो किंवा अन्य कोणताही खेळ असो, त्या खेळाशी संबंधित असलेल्यांनीच त्याचे नियमन केले पाहिजे. कोणीही यायचे आणि क्रीडाविश्वात लुडबूड करायची हा प्रकार थांबला पाहिजे. आजकाल राजकारणी काहीही देणेघेणे नसताना क्रीडा क्षेत्रात लुडबूड करताना सर्रास दिसतात. क्रीडा संघटना आपल्या ताब्यात राहाव्यात यासाठी जी धडपड चालते ती पाहिली तर त्यामागची वखवख स्पष्टपणे नजरेत भरते. निदान त्या व्यक्तींचे त्या खेळावर निःस्सीम प्रेम तरी हवे. परंतु केवळ मानसन्मान आणि प्रतिष्ठा कमावण्यासाठी क्रीडाविश्वात अधिकार नसताना लुडबूड करणे हे त्या खेळांच्या मुळावरच येऊ लागले आहे. जगमोहन ‘डॉलरमियां’पासून शरद ‘पॉवर’ पर्यंत प्रत्येकाला क्रिकेटमध्ये एवढा रस का म्हणून? श्रीनिवासन यांनी जो तमाशा केला त्यातून जगभरात भारतीय क्रिकेटची नाचक्की झाली. पण ज्यांनी या प्रकाराविरुद्ध बोलायला हवे ते तोंड उघडायला तयार नाहीत. महेंद्रसिंह धोनी मौन पाळून आहे, कारण श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंटचा तो उपाध्यक्ष आहे. गेले अनेक महिने हा सारा वाद सुरू असताना धोनीने चकार शब्द काढलेला नाही. क्रिकेट ज्यांचा श्वास आहे, अशा इतर ज्येष्ठ खेळाडूंनीही या वादापासून स्वतःला दूर ठेवणेच पसंत केले आहे. परंतु या मौनातूनच अशा घातक प्रवृत्ती पुढे सरसावत असतात. आपला जो विषय नाही त्यात केवळ स्वार्थासाठी वेढा घालून बसतात. खेळ बाजूला राहतो आणि पदे टिकवण्यासाठी आणि सत्ता हाती  ठेवण्यासाठीच्या यांच्या लांड्यालबाड्यांचा खेळ चालतो. तो पाहण्यावाचून क्रीडाप्रेमींच्या हाती काही नसते.