26.2 C
Panjim
Friday, June 25, 2021

अखेर सजा!

अकरा वर्षांपूर्वी गोव्यातच नव्हे, तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ माजवलेल्या स्कार्लेट कीलिंग मृत्यूप्रकरणात अखेर दोनपैकी एका आरोपीला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची सजा उच्च न्यायालयाने काल सुनावली. या हत्येची भीषणता पाहता या नराधमाला झालेली शिक्षा कमीच आहे, परंतु यापूर्वी बाल न्यायालयाने आरोपींना निर्दोष ठरवले होते, त्या पार्श्वभूमीवर किमान त्यापैकी एकटा दोषी सिद्ध झाला हेही नसे थोडके असेच या घडीस म्हणावे लागेल. स्कार्लेट प्रकरणाने अनेक गोष्टी जगासमोर आणल्या. किनारपट्टीवरील शॅक्समधून अमली पदार्थांचा चालणारा उघड व्यापार त्यातून दिसला, पहिल्या शवचिकित्सेत स्कार्लेटचा मृत्यू सरळसरळ आत्महत्या ठरवण्याचा वैद्यकीय अधिकार्‍यांचा बेजबाबदारपणा दिसला, किनार्‍यावर मृतदेहाशेजारी पडलेल्या स्कार्लेटच्या कपड्यांना ताब्यातही न घेणार्‍या पोलिसांची बेफिकिरी दिसली, या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरून चाललेली सारवासारवही दिसली. अनेक गोष्टी स्कार्लेट प्रकरणात सताड उघड्या पडल्या. जगामध्ये गोव्याची बदनामी झाली ती तर वेगळीच. तोवर गोवा हे पर्यटकांसाठी एक शांत, सुंदर, सुरक्षित ठिकाण समजले जात होते, त्या समजाचा भोपळा स्कार्लेट प्रकरणात पुरता फुटला. प्रदीर्घ न्यायालयीन लढाईअंती दहा वर्षांनी जेव्हा आरोपी बाल न्यायालयाने निर्दोष सोडले, तेव्हा भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाल्याची प्रतिक्रिया स्कार्लेटच्या आईने दिली होती. तिची गेलेली मुलगी परत येणे शक्य नाही, परंतु कालच्या निवाड्याने तिचे थोडे तरी समाधान झाले असेल अशी आशा आहे. स्कार्लेटला अमली पदार्थांचा डोस देऊन लैंगिक अत्याचार करून अत्यंत निर्दयीपणे हणजूणच्या समुद्रकिनार्‍यावर मृत्यूच्या जबड्यात ढकलून देण्यात आले, तेव्हा ती फक्त पंधरा वर्षांची मुलगी होती. पाश्‍चात्त्य संस्कृतीमध्ये वाढलेली असल्याने वागण्यात मोकळीढाकळी जरूर होती, कुटुंबासोबत कर्नाटकमध्ये न जाता एकटी मागे राहून पहाटे तीन वाजता ‘मित्रां’समवेत शॅकवर ती का गेली असा सवाल बर्‍याचदा केला गेला, परंतु तिच्या संस्कृतीमधील ‘मित्रा’ची व्याख्या वेगळी होती. येथे ‘मित्र’ म्हणून राक्षसी वृत्तीची गिधाडे टपलेली आहेत याची तिला कल्पना आली नाही. त्यामुळे ज्यांच्या भरवशावर ती गोव्याचे निसर्गसौंदर्य आस्वादण्यासाठी मागे राहिली, तेच तिचा कर्दनकाळ ठरले. स्कार्लेटला हणजूणच्या त्या शॅकवर बळजबरीने कोकेन सेवन करायला लावले गेले, ती त्या नशेत असताना तेथील पार्किंगमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले आणि शेवटी मारबडव करून हाकलून लावून ती बेशुद्धावस्थेत असताना तसेच मरणाच्या दारी सोडले गेले. हणजूणच्या किनार्‍यावर लाटांचे तडाखे खात ही पंधरा वर्षांची मुलगी कित्येक तास तडफडत राहिली आणि शेवटी तिने श्वास सोडला. पुढे जे काही घडले ते अत्यंत विदारक होते. तिच्या शरीरावर पहिल्या शवचिकित्सेत केवळ पाच जखमा दिसल्याचे सांगणार्‍या पोलिसांना तिच्या आईच्या आग्रहामुळे दुसर्‍यांदा कराव्या लागलेल्या शवचिकित्सेत तब्बल ५२ जखमा आढळल्या. ती बुडून मरण पावली असे सांगणारे नंतर तिने आत्महत्या केल्याचे सांगू लागले. या प्रकरणात हात वर करणार्‍यांना शेवटी प्रकरण सीबीआयकडे गेल्यानंतर तिचा खून झाला याची कबुली द्यावी लागली. जी प्रचंड सारवासारव आणि लपवाछपवी या प्रकरणात झाली तिच्या मुळाशी खरे तर जायला हवे होते. आता न्यायालयाच्या निवाड्यानंतर तरी ज्यांनी ज्यांनी तेव्हा सहेतुक किंवा निर्हेतुक कमालीची बेफिकिरी दाखवली त्यांना आता खरे तर निलंबित करायला हवे. किमान त्यांची पदावनती केली गेली पाहिजे. कोणत्या ड्रग माफियाच्या इशार्‍याखाली हे लोक वागत होते? कोण या प्रकरणावर पडदा पाडण्यासाठी प्रयत्नशील होते? स्कार्लेटचा खुनी कोण हे न्यायालयाने काल सांगितले, परंतु हे प्रकरण दडपण्यासाठी कोण कोण व का वावरत होते हे कुठे अजून जनतेपुढे आले आहे? ते कदाचित कधी येणारही नाही. उच्च न्यायालयात दोषी ठरलेला आरोपी कदाचित उद्या सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि पुन्हा निर्दोषही सुटेल. स्कार्लेट तर परत येणे शक्य नाही. गोव्याच्या किनारपट्टीवरील बीभत्स संस्कृतीचे वाभाडे काढत स्कार्लेट मृत्यूला सामोरी गेली. विदेशी पर्यटकांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना अजूनही थांबलेल्या नाहीत. नुकतीच अशा अत्याचाराची नवी घटना घडली. गोव्यात एकटीदुकटी येणारी विदेशी पर्यटक म्हणजे आपल्याला झडप घालायला सावजच असते अशी समजूत करून घेऊन हे लांडगे टपलेले असतात, ते मुळात निर्माण कसे होतात? सतत चाललेल्या गोव्याच्या सांस्कृतिक र्‍हासातूनच हे लोक निर्माण होत असतात. अशा गुन्हेगारांना दयामाया न दाखवता त्यांच्या घृणास्पद कृत्याची कठोरातील कठोर सजा मिळाली पाहिजे. असे गुन्हेगार, मग ते स्थानिक असोत वा परप्रांतीय, ते गोव्यासाठी लांच्छन आहेत. कलंक आहेत. हा कलंक मिटवायचा असेल तर मुळात गोव्यामध्ये शिरकाव केलेल्या विकृतींना दूर सारावे लागेल! आहे तयारी?

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

सुस्तावाल तर पस्तावाल!

कोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...

आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका

>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...

लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो

गोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...

सीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच

>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...

राज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार

>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...

ALSO IN THIS SECTION

सुस्तावाल तर पस्तावाल!

कोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...

विरोधक एकत्र येणार?

‘जो मै बोलता हूँ, वो मै करता हूँ, जो मै नही बोलता वो तो डेफिनेटली करता हूँ’ हा हिंदी चित्रपटातील संवाद ज्यांना...

स्वातंत्र्याचा हुंकार!

बरोबर ७५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी संध्याकाळी ठीक चार वाजता ह्या गोमंतकामध्ये एक चमत्कार घडला. एक अशी गोष्ट घडली जी कोणी कधी पाहिली...

कॉंग्रेसी सुंदोपसुंदी

कॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव आज गोवा दौर्‍यावर येत आहेत. राज्य विधानसभेची निवडणूक आता आठ महिन्यांवर आली असल्याने कॉंग्रेस पक्षाला त्यासाठी...

विझलेला चिराग

राजकारण हे कोणत्या थराला जाऊ शकते आणि रक्ताच्या नात्यावरही कसे मात करू शकते त्याचा दाहक प्रत्यय सध्या स्व. रामविलास पास्वान यांचे चिरंजीव...