– प्रमोद मुजुमदार
‘देशात मोदींचा प्रभाव मिडियाने उभा केला आहे, भाजपाने काही वाहिन्या अक्षरश: विकत घेतल्या आहेत, विकासाचे उभे केलेले मॉडेल चुकीचे आहे’, अशा प्रकारचा प्रचार खोटा होता आणि देशात यावेळी खरोखरच मोदींची लाट होती हे लोकसभा निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे दिल्लीच्या तख्तावर मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजपा आघाडीचे सरकार विराजमान होणार आहे. साहजिकच कॉंग्रेसप्रणित आघाडीला नव्याने आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. या निकालाने दिल्लीत भाजपा मुख्यालयात अक्षरश: दिवाळीचा माहोल दिसून आला. कार्यकर्ते मोठ्या संख्येने ढोल-ताशांच्या तालावर आणि गुलालाची मुक्त उधळण करत नाचताना दिसत होते. १४, पंत मार्ग येथील भाजपाचे प्रदेश कार्यालय आणि ११, अशोक रोड येथील केंद्रीय कार्यालय या दोन्ही ठिकाणी हेच वातावरण आहे. दिल्लीत भाजपाची व्यापार प्रकोष्ठ म्हणून एक शाखा आहे. या शाखेतर्ङ्गे अडीच टन लाडू तयार करून वाटप करण्यात आले. दुसर्या बाजुला कॉंग्रेसच्या मुख्यालयात शांतता पसरल्याचे पहायला मिळाले. कार्यालयातील उपस्थितीही तुरळक दिसून आली. या निवडणुकीतील पराभवाची कल्पना कॉंग्रेसला आली होती. त्यामुळेच ‘पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारावा आणि प्रतिक्रिया व्यक्त करताना पुरेशी काळजी घ्यावी’ अशी सूचना कॉंग्रेसने आपल्या प्रवक्त्यांना तसेच नेतेमंडळींना अगोदरच केली होती. त्याच वेळी या पराभवाची जबाबदारी एकट्या राहुल गांधींवर टाकणे योग्य ठरणार नाही असेही मत व्यक्त होत होते.
खरे तर शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर समोर आलेल्या सर्वेक्षणानुसार यावेळी केंद्रात भाजपाची सत्ता येणार हे स्पष्ट झालेे. त्यानंतर भाजपाची वरिष्ठ नेतेमंडळी उत्साहाने तयारीला लागली होती. वाराणसीत मतदान झाले त्या दिवशी रात्री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी जवळपास दोन तास चर्चा केली. त्यात खातेवाटपाबद्दल महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली आहे. दरम्यान, मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये कोण असणार या विषयीही विविध पातळ्यांवर चर्चा होत राहिल्या. अर्थात, ‘अजून लग्नाचा पत्ता नाही आणि निघाले मधुचंद्राला’ अशी टीकाही करण्यात आली. परंतु बहुमत मिळण्याबाबत मोदींना ठाम आत्मविश्वास होता. तो प्रचारकाळातील त्यांच्या बोलण्यातून वारंवार जाणवत होता. हाच आत्मविश्वास जनतेला भावला असेही म्हणता येईल.
१९७७ मध्ये कॉंग्रेसविरोधात लाट होती. आता त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे असे म्हणता येईल. त्याचबरोबर निवडणूकपूर्व विश्लेषणात व्यक्त करण्यात आलेला अंदाज बर्याच प्रमाणात खरा ठरला हीसुद्धा दखल घेण्यासारखी बाब आहे. कारण ‘या अंदाजांवर जाऊ नका, प्रत्यक्ष निकाल पहा’ असे कॉंग्रेसच्या वतीने सांगितले जात होते. त्याच बरोबर ही सर्वेक्षणेही मॅनेज केलेली आहेत अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु प्रत्यक्ष निकालाने या शंकांना चोख उत्तर दिले आहे. या निवडणुकांमध्ये काही दिग्गजांचा सुपडा साङ्ग होणे हीसुद्धा मोठी घटना ठरते. भाजपाच्या या विजयी घोडदौडीची सुरूवात झाली बागपत मतदारसंघातून. येथे भाजपाचे उमेदवार मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपालसिंग यांनी अनपेक्षित धक्का देत विजय मिळवला. त्यांनी अजितसिंग यांचा पराभव केला. वास्तविक सत्यपालसिंग यांचा यापूर्वी या मतदारसंघाशी संपर्क नव्हता. उलट अजितसिंह हे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचे पुत्र होत. या मतदारसंघात जाट मतदारांची संख्या मोठी आहे आणि तो कायम चरणसिंह आणि अजितसिंह यांच्या पाठिशी उभा होता. त्यामुळे येथे या घराण्यात विजयाची परंपरा कायम राहिली. परंतु यावेळी या मतदारसंघात सत्यपालसिंह यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराने मिळवलेला विजय धक्कादायकच म्हणावा लागेल. परंतु हा मोदी लाटेचाच प्रभाव आहे हे नक्की. अमेठी हा कॉंग्रेसचा परंपरागत मतदारसंघ. येथील राहुल गांधी विरूद्ध स्मृती इराणी या लढतीकडे सार्या देशाचे लक्ष होते. परंतु येथे पहिल्या काही ङ्गेर्यात राहुल गांधी पिछाडीवर राहिले आणि कॉंग्रेस गोटातील चिंता आणखी वाढली. पक्षाच्या उपाध्यक्षाची अशी अवस्था हा कॉंग्रेससाठी मोठा ठरला. अंतिम निकाल काही का लागेना, परंतु राहुल गांधी मतमोजणीच्या काही ङ्गेर्यात मागे पडणे म्हणजे त्यांनी पराभूत होण्यासारखेच आहे अशाही प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.वास्तविक राहुल गांधींनी आपल्या भाषणात पायाभूत सुविधांच्या विकासाचा उल्लेख केला होता. परंतु पायाभूत सुविधांबाबत अमेठीची अवस्था दयनीय आहे. या मतदारसंघातील जनता विविध समस्यांचा सामना करत आहे. असे असताना आजवर राहुल गांधींनी या मतदारसंघाकडे म्हणावे तितके लक्ष दिले नाही. शिवाय तरुण नेतृत्व म्हणून अमेठीतील जनतेच्या राहुल गांधींकडून बर्याच अपेक्षा होत्या. परंतु जनतेच्या पदरात निराशाच आली. त्यामुळे जनतेत नाराजी आणि असंतोष असणे स्वाभाविक होते.
कॉर्पोरेट क्षेत्राचा भक्कम पाठिंबा हेही भाजपाच्या या घवघवीत यशामागील प्रमुख कारण म्हणावे लागेल. विशेषत: गेल्या दोन वर्षांत या क्षेत्राला सरकारी धोरणाचा मोठा ङ्गटका सहन करावा लागला. त्यात वस्तुनिर्माण उद्योग भरडला गेला. या पार्श्वभूमीवर मोदींची प्रो-कॉर्पोरेट अशी निर्माण झालेली प्रतिमा या क्षेत्राला आकर्षित करणारी ठरली. या शिवाय भूतकाळावर ङ्गार अवलंबून रहायचे नाही ही भावना तरुण मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. अशा परिस्थितीत हा वर्ग काळाची गरज ओळखून भविष्यकालीन धोरणे आखण्याबाबत मोदींकडून आशा बाळगून आहे. साहजिक यावेळी प्रथमच मतदान करणारा युवा वर्ग मोठ्या संख्येने मोदींच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून भाजपाला मतदान करता झाला. या शिवाय यावेळी लोकसभा निवडणुुकांमध्ये रा. स्व. संघाने घेतलेला उघड सहभाग हा ङ्गॅक्टरही भाजपाच्या विजयासाठी महत्त्वाचा ठरला. १९७७ मध्ये आणिबाणीनंतर अशाच पद्धतीने संघाने प्रथमच लोकसभा निवडणुकीत उघड सहभाग घेतला होता आणि तत्कालीन जनता पक्षाच्या मागे आपली ताकद उभी केली होती. यावेळी हीच ताकद मोदींच्या मागे उभी राहिली. गेल्या वर्षी रा. स्व. संघाच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी शतप्रतिशत संघशक्तीने मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्याचाही परिणाम झाला हे उघड आहे.
अलीकडे एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळणे आणि प्रादेशिक पक्षांची संख्या वाढणे यामुळे आघाडी सरकारचा प्रयोग अपरिहार्य ठरू लागला होता. परंतु या प्रयोगाद्वारे केंद्रात अस्थिर सरकारची जणू परंपराच निर्माण झाली. त्याचा देशाच्या विकासावर विपरीत परिणाम झालाच; शिवाय जनतेचे प्रश्नही कायम राहिले. या पार्श्वभूमीवर यावेळी भाजपाला सर्वाधिक जागा मिळवून देण्याचे जनतेने ठरवले असणार आहे. त्यामुळेच हा पक्ष स्वबळावर मोठी मजल गाठू शकला तर आघाडी मिळून स्पष्ट बहुमत प्राप्त करणे शक्य झाले. त्यामुळे या पक्षाला आता बहुमतासाठी काही नवे मित्र जोडण्याचा, त्यासाठी तडजोडी करण्याचा प्रश्न राहिलेला नाही. थोडक्यात, यापुढे प्रादेशिक पक्षांची संख्या मर्यादित राहणे हिताचे ठरणार असल्याचा संदेश जनतेने या निकालाद्वारे दिला आहे असेही म्हणता येईल. या सार्या बाबींवरून या वेळच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाद्वारे देशात एक नवे पर्व सुरू झाले आहे असे म्हणता येईल. ते जनतेसाठी आश्वासक ठरावे एवढीच अपेक्षा आहे.

