गेला महिनाभर ज्या ‘ऑपरेशन टायगर’ ची चर्चा होती, ते अखेर पूर्णत्वास गेल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जाहीर केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकूण नऊ खासदारांपैकी सहाजणांनी वेगळा गट स्थापन करून तो एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये विलीन केला आहे. नऊपैकी सहाजणांचा हा गट असल्याने अर्थातच लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पक्षांतरासाठी लागणाऱ्या किमान दोन तृतीयांश संख्याबळाचा अडसर दूर झाला आहे. त्यामुळे ही फूट नैतिकदृष्ट्या कितपत योग्य हा प्रश्न जरी असला, तरी ती कायद्याच्या आणि संवैधानिक चौकटीत बसते. 2022 मध्ये एकनाथ शिंदेंना फोडून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील शिवसेनेत पहिली मोठी उभी फूट पाडली, त्यानंतरची ही दुसरी मोठी फूट आहे. मात्र, ह्यावेळी निवडून आलेले आमदार फोडलेले नाहीत, तर खासदार फोडले आहेत. त्यामुळे त्यातून नवी राजकीय समीकरणे उदयाला येणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेत भाजपचे 132 आमदार गेल्या निवडणुकीत विजयी झाले व शिंदेंच्या शिवसेनेचे 57 आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडल्यानंतर अजित पवार गटाच्या आगमनामुळे शिंदेंचे महत्त्व महायुतीत कमी होत गेले होते. पवार यांच्या अपघाती निधनानंतर समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली, परंतु अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे त्या पक्षाचे नेतृत्व सोपवले गेले व राष्ट्रवादीचा प्रभाव कायम राहिला. पश्चिम बंगालमधील सत्तांतरानंतर तेथील राजकीय समीकरणे बदलली. वीस खासदारांनी वेगळा गट स्थापन करून नंतर नॅशनल सिटिझन्स पार्टी नामक नामधारी पक्षामध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला. पश्चिम बंगालच्या ह्या घडामोडींपासूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात हे ‘ऑपरेशन टायगर’ वरिष्ठ पातळीवरून घडवले गेले हे स्पष्ट दिसते. मात्र, येथे वेगळ्या पक्षात आसरा घेण्याऐवजी हे बंडखोर खासदार शिंदेंच्या शिवसेनेतच प्रवेशले आहेत. त्यामुळे अर्थातच नवी समीकरणे घडणार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 42 जागा आहेत. 2024 ची लोकसभा निवडणूक पाहिल्यास त्यात विरोधी महाविकास आघाडीने तब्बल तीस जागा जिंकून महायुतीला दणका दिला होता. महायुतीला केवळ सतरा जागा मिळाल्या होत्या, त्यात भाजपला नऊ आणि शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा जिंकता आल्या होत्या. याउलट महाविकास आघाडीतील काँग्रेसकडे तेरा, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे नऊ जागा होत्या. आता ह्या नऊपैकी सहाजण शिंदेंना येऊन मिळाल्याने सात अधिक सहा मिळून शिंदेंकडे तेरा खासदार आले आहेत. केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शिंदेंना अवघ्या सात खासदारांमुळे जे नगण्य स्थान होते, ते आता तेरा खासदारांमुळे बलवान बनले आहे. त्यामुळे आता ह्याची बक्षिसी शिंदेंना हवी असेल. केंद्रात मंत्रिपदासाठी त्यांच्या पक्षाच्या खासदारांचा विचार भाजपला करावा लागणार आहे. दिल्लीत वजन वाढल्याने अर्थातच महाराष्ट्रातील राजकारणावरही त्याचा अटळ परिणाम संभवतो. शिंदेंची नाराजी देवेंद्र फडणवीसांना यापुढे परवडणार नाही, कारण त्यांच्या भूमिकेचा थेट परिणाम केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर पडेल. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांच्या पक्षावर सतत मेहेरनजर फडणवीस सरकारला ठेवावी लागेल. ह्या फुटीतून एकनाथपुत्र श्रीकांत शिंदे यांनी आपणही कच्च्या गुरूचा चेला नाही हे दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांचे केंद्रातील वजन वाढणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सतरापैकी सोळा जागा महायुतीने जिंकल्या आहेत, तर नाशिकची जागा अपक्षाकडे गेली आहे, ज्याने शिंदेंना सहयोग देण्याचे जाहीर केले आहे. ह्या सगळ्या घडामोडी महत्त्वाच्या आहेत. एकनाथ शिंदेंपाशी आज शिवसेना हे पक्षाचे नाव आहे, धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह आहे आणि आता मूळ पक्षाचे आमदार आणि खासदारही आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासाठी निश्चितच हा फार मोठा झटका आहे. त्यांचे आमदार गेले, त्या पाठोपाठ पक्षाचे नाव गेले, पक्षाचे चिन्ह गेले आणि आता पक्षाचे खासदारही निघून गेले आहेत. ह्या खासदारांनी जाताना सरकारकडून विकासनिधी न मिळाल्याने पक्षांतर करावे लागल्याचे कारण दिले आहे. हे कारण असेल, पक्षांतरे घडवण्यासाठी निधीचा असा वापर केला जात असेल तर ती चिंतेची बाब म्हणावी लागेल. वैयक्तिक प्रकरणांत सुरक्षेची आणि विकासनिधीची हमी मिळाल्यावर विरोधी पक्षांत कोण राहील? तृणमूल आणि शिवसेनेतील फूट भारतीय राजकारणाचा नवा बदललेला रंगच दर्शवते आहे आणि ह्या अशा प्रकारच्या फुटींचे दूरगामी परिणाम भारतीय राजकारणावर यापुढे होणार आहेत.

