अकाली अंत

0
25

आजच्या पिढीचा आवडता गायक केके याचे कोलकात्यातील कार्यक्रमानंतर झालेले आकस्मिक निधन त्याच्या चाहत्यांसाठीच नव्हे तर एकूणच संगीतप्रेमींसाठी अत्यंत धक्कादायक आहे. ५३ हे काही या जगातून निघून जाण्याचे वय नव्हे. आपली सांगीतिक कारकीर्द नुकतीच कुठे उमलू लागलेली असतानाच केके ऊर्फ कृष्णकुमार कुन्नथने ह्या जगाचा निरोप घेतला आहे. स्वच्छ, सुंदर आवाज, तरुणाईच्या ह्रदयाला स्पर्श करणारे शब्द आणि मेलडी यांनी युक्त अशा सुरेल गाण्यांनी केके याने तीव्र स्पर्धा असलेल्या आजच्या चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनक्षेत्रामध्ये स्वतःचे स्थान जिद्दीने निर्माण केले होते. चित्रपटसृष्टीशी जवळून संबंध येऊनही त्याने सदोदित ‘सेलिब्रिटी’ च्या मिजाशीत न वावरता अत्यंत साधेपणाचे जगणे कायम राखले होते हे येथे अधोरेखित करण्यासारखे आहे.
हॉटेल उद्योगामध्ये आणि विक्री क्षेत्रामध्ये काम करीत असताना केकेने गाण्याचा छंद जोपासला. छोट्या मोठ्या कार्यक्रमांमधून गात असताना दिल्लीतील एका कार्यक्रमात त्याला ज्येष्ठ गायक हरिहरन यांनी पाहिले आणि मायानगरी मुंबईत येण्याचा सल्ला दिला. मुंबईत केवळ आपल्या सुरेल आवाजाच्या भरवशावर आलेल्या केकेला चित्रपटात गाण्याची संधी मिळाली आणि तिचे सोने करीत आपल्या एकाहून एक हिट गाण्यांनी त्याने नव्या पिढीवर मोहिनी घातली. ‘आँखोंमे तेरी अजबसी अजबसी अदाए है’, ‘तूही मेरी शब है’, ‘तू जो मिला’, ‘हमको प्यार हुआ’ अशा अनेक सुरिल्या गाण्यांतून केके हे नाव नव्या पिढीच्या ओठी रुळले. तरुणाई आज त्याची अशी अनेक गाणी गाणी गुणगुणते आहे. खरे तर आजचा काळच असा स्पर्धात्मक आहे की, येथे एका रात्रीत स्टार बनतात, चमकतात आणि दुसर्‍या रात्री उपेक्षेच्या घनदाट अंधारात विरूनही जातात. असंख्य गुणी गायक – गायिका आपल्या वेगळ्या आवाजात एखादे गाणे गाऊन एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचतात आणि नंतर बघता बघता अडगळीत जाऊन पडतात. आजकाल स्पर्धाच एवढी आहे की कोणाला कोणी गॉडफादरही तारू शकत नाही. परंतु केके या क्षेत्रामध्ये आपले पाय मजबूतपणे रोवून उभा होता. आजच्या गायक गायिकांबाबत उगाचच नाके मुरडणारेही अनेक असतात. परंतु आजही जुन्या काळाची आठवण करून देणारे मेलडीयस म्हणता येईल असे संगीत ऐकू येत असतेच. तशी असंख्य गाणी कानी पडत असतात. एकीकडे हनी सिंग, टोनी कक्कड वगैरे पंजाबी मंडळी केवळ बीटस् आणि चित्रविचित्र शब्दांच्या जोरावर संगीतक्षेत्रात धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे अरिजित सिंग, आतिफ अस्लम, अरमान मलीक, केके यांची सुरेल गाणी दिलासा देतात. केकेची बहुतेक सर्वच गाणी बीटस्‌पेक्षा मेलडीवर भर देणारी आहेत आणि म्हणूनच ती पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. जुन्या सुरेल संगीताच्या जमान्याची ती पदोपदी आठवण करून देतात.
केवळ हिंदीच नव्हे, तर तामीळ, तेलगू, कन्नड, बंगाली अशा विविध भाषांतून गाणी केकेने गायिली. त्यामुळेच जेव्हा तो परवा कोलकात्याच्या विवेकानंद महाविद्यालयाच्या जाहीर कार्यक्रमासाठी कोलकात्याला गेला, तेव्हा हजारो चाहत्यांचा गराडा त्याला पडला होता. नझरुल मंचमधील त्याच्या अखेरच्या ठरलेल्या कार्यक्रमासाठी त्या सभागृहाची क्षमता अडीच हजार असताना त्याच्या दुप्पट संख्येने त्यांचे चाहते उपस्थित होते. ही गर्दीच या गुणी कलाकाराच्या जिवावर उठली असे दिसते. प्रचंड गर्दी, गोंधळ आणि प्रखर प्रकाशझोत या उकाड्याने हैराण होऊनही आपल्या चाहत्यांसाठी गाण्याचे कर्तव्य बजावणेच आयुष्यात संपूर्ण निर्व्यसनी असलेल्या केकेच्या जिवावर बेतले. कार्यक्रमस्थळी तीव्र उकाड्याने सतत घाम पुसतानाचा त्यांचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. अशा प्रकारचे गर्दीचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत असताना केवळ पैशांकडे न पाहता कलाकारांच्या सोयी – गैरसोयीचाही विचार व्हायला हवा हाच धडा या घटनेतून मिळतो आहे. अनेकदा कलाकारांकडून उत्तम सादरीकरणाची अपेक्षा बाळगली जाते. त्यांना दिली जात असलेली बिदागी म्हणजे जणू त्यांची किंमत असल्यासारखी हिशेबी वागणूक दिली जाते. कलाकार हाही माणूस आहे हे भान ठेवले जात नाही. वास्तविक, केके याला गर्दीचे कार्यक्रम काही नवे नव्हते. परंतु या कार्यक्रमातील अव्यवस्था त्याला मानवली नसावी. नेमके काय घडले? हा हार्ट स्ट्रोक होता की हीट स्ट्रोक होता हे तपासांती कळेल. मात्र, एक उमदा गायक तर आता आपल्यातून निघून गेला आहे. यापुढे तरी किमान अशा जाहीर कार्यक्रमांचे आयोजन करताना शिस्त, गर्दीचे नियोजन, कलाकाराची योग्य व्यवस्था या गोष्टींचे भान ठेवले जावे एवढीच अपेक्षा आहे.