>> लेखी स्वरूपात हमी देण्यास नकार
येथील आझाद मैदानावर गेले ४२ दिवस आपल्या बडतर्फीच्या विरोधात आंदोलन करणार्या सात अंगणवाडी सेविकांनी लेखी स्वरूपात हमी देण्यास स्पष्ट नकार काल दिला. तसेच सरकारने बुधवारी रात्रीपर्यंत बडतर्फीची कारवाई मागे न घेतल्यास पाण्याचा त्याग करण्याचा इशारा या अंगणवाडी सेविकांनी दिला. आमचे काही बरे वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील, असेही अंगणवाडी सेविका संघटनेच्या अध्यक्ष देवयानी तामशे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविकांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर महिला व बालकल्याण खात्याने गेल्या एप्रिल २०२२ मध्ये अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणार्या संघटनेच्या सात पदाधिकार्यांना बडतर्फ केले आहे.
या सात अंगणवाडी सेविकांनी सुरुवातीला साखळी उपोषण केले. त्यानंतर आमरण उपोषण सुरू केले; मात्र तरीही सरकारने बडतर्फीची कारवाई मागे घेतलेली नाही. त्यामुळे आता पाण्याचा त्याग करण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. मधल्या काळात एका अंगणवाडी सेविकेची प्रकृती खालावली होती. तिच्यावर बांबोळी येथील सरकारी इस्पितळात उपचार करण्यात आले. उपचारानंतर सदर अंगणवाडी सेविका पुन्हा आंदोलनात सहभागी झाली आहे.
दरम्यान, भविष्यात कोणत्याच आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे लेखी दिल्यास उपोषण करणार्या अंगणवाडी सेविकांना सेवेत घेण्यास हरकत नाही. आठ दिवसांपूर्वी तसा प्रस्ताव दिलेला आहे. लेखी लिहून देऊन अंगणवाडी सेविकांनी आंदोलन मागे घ्यावे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.