अंगणवाडी कर्मचार्‍यांचे आंदोलन तात्पुरते मागे

0
3

>> सरकारकडून बहुतेक मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्‍वासन

राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या बहुतेक मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्‍वासन सरकारकडून मिळाल्यानंतर अंगणवाडी कर्मचार्‍यांनी आझाद मैदानावरील धरणे आंदोलन तात्पुरते काल मागे घेतले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासमवेत अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली. पगारवाढ, निवृत्ती मानधन आदी काही मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारी पातळीवर प्रक्रिया सुरू आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांची वारसदार नोंदवून घेण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. येत्या रविवारी अंगणवाडी कर्मचार्‍यांची बैठक घेऊन मागण्यांबाबत आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सल्लागार ऍड. हृदयनाथ शिरोडकर यांनी दिली.

अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या पगारात वाढ आणि पेन्शन योजनेसाठी सरकारला नव्याने प्रस्ताव सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे धरणे आंदोलन करणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांशी असभ्य वर्तणूक करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अंगणवाडी कर्मचारी संघटनेला त्यांच्या मागण्यांबाबत माहिती न देणार्‍या महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे, असेही शिरोडकर यांनी सांगितले.