-ः वळणवाट ः- शिवोलीचे प्रतिनिधित्व करणारे म्हापसावासी अशोक नाईक-साळगावकर

0
281
  • प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट

 

अ‍ॅड. चंद्रकांत उत्तम चोडणकर यांच्याप्रमाणेच म्हापसानगरी कर्मभूमी बनवून, शिवोली मतदारसंघातून निवडून येऊन विधानसभेत प्रवेश केलेले आणखी एक विधिमंडळ सदस्य म्हणजे श्री. अशोक तुकाराम नाईक-साळगावकर हे होत. त्यांच्याही कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणे उचित ठरेल.

श्री. अशोक नाईक-साळगावकर यांचा जन्म बार्देस तालुक्यातील शिवोली गावात दि. 19 ऑगस्ट 1943 रोजी झाला. त्यांचे वडील कै. तुकाराम नाईक-साळगावकर हे प्रवासी वाहतूक व्यवसायात होते. म्हापसानगरीतील नगरपालिका उद्यानाजवळील (सध्याचे राममनोहर लोहिया उद्यान) ‘वृंदावन’ उपगृहानजीक त्यांची ‘श्री लक्ष्मी मोटर सर्व्हिस’ या वाहतूक आस्थापनाची कचेरी होती. तळीवाड्यावरील आमच्या घरातून कै. विष्णू सावंत यांच्या इमारतीमधील पान-सिगारेट विक्रीच्या वडिलोपार्जित दुकानात जात असताना लांडी खाकी विजार, अर्धबाह्यांचा पंढरा सदरा, बूट घातलेले, स्थूल देहयष्टीचे कै. तुकाराम नाईक-साळगावकर यांना अस्मादिकांनी पाहिले आहे.

श्री. अशोक नाईक-साळगावकर यांचे शालान्त परीक्षेपर्यंत शिक्षण झाले आहे. पुढे मग ते व त्यांचे बंधू किशोर हे आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळू लागले. जन्मभूमी शिवोली असूनही म्हापसानगरी त्यांची कर्मभूमी बनली. त्यांनी म्हापशातील राजवाड्यावरील अलंकार सिनेमागृहाजवळ एक गॅरेजही सुरू केली होती. आज ही गॅरेज बंद आहे.

दि. 27 डिसेंबर 1984 रोजी झालेल्या सहाव्या गोवा, दमण व दीव संघप्रदेश निवडणुकीत त्यांना अ‍ॅड. रमाकांत खलप यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने शिवोली मतदारसंघाची उमेदवारी दिली असता श्री. अशोक नाईक-साळगावकर हे आपले नजीकचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अ‍ॅड. चंंद्रकांत चोडणकर (5201 मते) यांना पराभूत करून निवडून आले होते. त्यांना या निवडणुकीत 5967 मते मिळाली होती आणि गोवा, दमण व दीव संघप्रदेश विधानसभेत त्यांचा प्रवेश झाला होता. या निवडणुकीत म.गो. पक्षाचे फक्त आठ उमेदवार निवडून आले होते व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळून दि. 7 जानेवारी 1985 रोजी प्रतापसिंह राणे यांनी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

इ.स. 1986 च्या दरम्यान राजभाषा आंदोलनाला तोंड फुटले आणि दि. 17 जुलै 1986 रोजी प्रतापसिंह राणे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने फक्त कोंकणी भाषेला राजभाषेचा दर्जा देणारे विधेयक विधानसभेत सादर केले. त्यामुळे कोंकणीचे समर्थक व विरोधक असे दोन गट निर्माण झाले. हे आंदोलन वर्षभर तरी सुरू होते. एकूण परिस्थिती ध्यानात घेऊन विरोधी पक्षनेते म.गो.चे अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी ‘कोंकणी राजभाषेबरोबर मराठीलाही समान दर्जा’ अशा आशयाची दुरुस्ती सुचवली आणि विधिमंडळाने हे विधेयक दि. 4 फेब्रुवारी 1987 रोजी संमत केले. दि. 30 मे 1987 रोजी गोव्याला केंद्र सरकारने घटक राज्याचा दर्जा दिला. गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळताच गोवा विधिमंडळाचे तीसवरून चाळीस मतदारसंघ झाले. गोव्याला जरी घटक राज्याचा दर्जा दिला गेला तरी अस्तित्वात असलेली विधानसभा बरखास्त न करता तिला ‘हंगामी विधिमंडळ’ (प्रोव्हिजनल असेम्ब्ली) हा दर्जा दिला गेला. त्यामुळे या विधिमंडळाला आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला.

गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाल्यावर दि. 22 नोव्हेंबर 1989 रोजी घेण्यात आलेल्या पहिल्या गोवा राज्य विधानसभेची निवडणूक भाषा आंदोलनाच्या आणि केंद्रातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरकारने घटक राज्याचा दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली होती. केंद्र सरकारने गोमंतकीय जनतेच्या इच्छा पूर्ण केल्या होत्या. त्यातच डॉ. विल्फ्रेड डिसौझा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षातून फुटून वेगळा झालेला गट (गोवा काँग्रेस) पुन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात परतला होता.

याच दरम्यान अ‍ॅड. रमाकांत खलप यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व कै. शशिकलाताई काकोडकर यांच्या नेतृत्वाखालील भाऊसाहेब बांदोडकर पक्ष एकत्र आले होते. निवडणुकीत भा.रा.काँ. व म.गो. हे दोन्ही प्रमुख प्रबळ पक्ष आमने-सामने होते.

दि. 22 नोव्हेंबर 1989 मध्ये पहिल्या गोवा राज्य विधिमंडळासाठी झालेल्या या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 18 जागा मिळाल्या, तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचेही 18 उमेदवार निवडून आले. दोन अपक्ष सदस्य डॉ. कार्मो पेगादो (सांत आंद्रे) व कै. बाबू नायक (मडगाव) निवडून आले असता डॉ. पेगादो यांनी काँग्रेसला तर नायक यांनी मगोला पाठिंबा दिला. त्यामुळे भा.रा.काँ. व म.गो. या दोन्ही पक्षांच्या विधिमंडळ सदस्यांची संख्या समसमान झालेली असल्यामुळे कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नव्हता. या निवडणुकीतील महत्त्वाची घटना म्हणजे कुडतरी व वेळ्ळी मतदारसंघातून रुग्णशय्येवरील मरणासन्न इसमाची कुणीतरी उमेदवारी दाखल केली होती. (अ‍ॅड. राधाराव ग्रासियस यांनी त्यांची उमेदवारी दाखल केल्याची गोव्यात वदंता होती.) निवडणुकीपूर्वी या मरणासन्न उमेदवाराचे निधन झाल्यामुळे या दोन्ही मतदारसंघांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या दोन्ही मतदारसंघांच्या पुन्हा निवडणुका होऊन निकाल जाहीर होईपर्यंत कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करणे शक्य नव्हते. या दोन्ही मतदारसंघाच्या पुनर्निवडणुका घेण्यात आल्या. दि. 7 जानेवारी 1990 रोजी निकाल जाहीर झाला तेव्हा दोन्ही मतदारसंघांतून भा.रा.काँ.चे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे भा.रा.काँ.ला बहुमत प्राप्त झाले आणि दि. 11 जानेवारी 1990 रोजी प्रतापसिंह राणे यांच्या नेतृत्वाखाली भा.रा.काँ.चे सरकार सत्तेवर आले. या निवडणुकीत श्री. लुईझिन फालेरो हे नावेली मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले होते. भा.रा.काँ.चे प्रतापसिंह राणे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात ख्रि. डॉ. विल्फ्रेड डिसोझा (साळगाव), फ्रान्सिस सार्दिन (कुडतरी), सुभाष शिरोडकर (शिरोडा), लुईझिन फालेरो (नावेली), डॉ. कार्मो पेगादो (सांत आंद्रे) यांचा समावेश होता. अस्मादिक या निवडणुकीत म्हापसा मतदारसंघातून म.गो. उमेदवार म्हणून निवडून आले होते.

इ.स. 1989 च्या पहिल्या गोवा राज्य विधानसभेच्या निवडणुकीत भा.रा.काँ.ला काठावरचे बहुमत मिळाले व प्रतापसिंह राणे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले तरी ते फार काळ टिकू शकले नाही. सत्तेवर आल्यानंतर सभापतिपदी असलेल्या डॉ. लुईस प्रोतो बार्बोझा यांनी आपल्या भा.रा.काँ. पक्षाविरुद्ध बंड करून सात आमदारांसह पक्षातून बाहेर पडले व ‘गोअन्स पिपल्स पार्टी’ या नावाने आपला वेगळा गट व पक्ष स्थापन केला. चर्चिल आलेमांव (बाणावली), श्रीमती फॅरेल फुर्तादो (वेळ्ळी), माविन गुदिन्हो (कुठ्ठाळी), सोमनाथ जुवारकर (ताळगाव), लुईस आलेक्स कार्दोज (फातोर्डा) आणि जे. बी. गोन्साल्विस (पणजी) हे काँग्रेस विधिमंडळ सदस्य त्यांच्या गटात व गोअन्स पिपल्स पार्टी पक्षात सामील झाले होते. या गटाला म.गो. आणि एका अपक्ष सदस्याने पाठिंबा दिला. ख्रि. डॉ. लुईस प्रोतो बार्बोझा हे पीठासीन अध्यक्ष असल्याने त्यांना लगेच मुख्यमंत्रिपदी बसवणे शक्य नव्हते. त्यामुळे सुरुवातीला मुख्यमंत्री म्हणून चर्चिल आलेमांव यांनी दि. 27 मार्च 1990 रोजी शपथ घेतली. ते दि. 14 एप्रिल 1990 पर्यंत मुख्यमंत्रिपदावर होते. त्यानंतर डॉ. लुईस बार्बोझा यांनी दि. 14 एप्रिल 1990 रोजी आपल्या सभापतिपदाचा राजीनामा देऊन त्याच दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात अ‍ॅड. रमाकांत खलप हे उपमुख्यमंत्री झाले. गोवा राज्य विधानसभेच्या इतिहासात असे उपमुख्यमंत्रिपद प्रथमच निर्माण करण्यात आले होते.

दि. 16 नोव्हेंबर 1994 रोजी झालेली दुसरी गोवा राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर शिवोली मतदारसंघातून लढवली. त्यांच्या विरोधात म.गो. पक्षाने उमेदवारी बहाल केलेले अ‍ॅड. चंद्रकांत चोडणकर हे उभे होते. श्री. अशोक नाईक-साळगावकर (5327 मते) यांना अ‍ॅड. चंद्रकांत चोडणकर (7373 मते) यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर दि. 4 जून 1999 रोजी झालेली तिसरी गोवा राज्य विधानसभा निवडणूक शिवोली मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढवली, परंतु त्यांना भाजपाचे दयानंद मांद्रेकर (4455 मते) यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. या निवडणुकीत त्यांना 1905 मते मिळाली होती. डॉ. विल्फ्रेड डिसौझा यांच्या नेतृत्वाखालील गोवा राजीव काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणारे अ‍ॅड. चंद्रकांत चोडणकर (3346 मते) हे तिसर्‍या क्रमांकावर होते.

आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात अशोक नाईक-साळगावकर यांनी सार्वजनिक उपक्रम समिती सदस्य, तक्रार अर्ज समिती सदस्य, कायदा छाननी समिती सदस्य म्हणून कार्य केले होते. ते म्हापसा नागरी सहकारी बँक कार्यकारिणी सदस्य म्हणूनही काहीकाळ कार्यरत होते. शिवाय विविध सामाजिक, धार्मिक, क्रीडा संस्थांचे आश्रयदाते आहेत.