-ः खुले मैदान ः- राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता मुष्टियोद्धा अखिल कुमारही ‘कोरोनो फायटर’

0
280
  • सुधाकर रामचंद्र नाईक

राष्ट्रकुल मेळा सुवर्णपदक विजेता तथा प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार विजेता मुष्टियोद्धा अखिल कुमार हरयाना पोलिस दलातील पोलिस अधिकारी, उपअधीक्षक या नात्याने हरयानातील जनतेला ‘घरी रहा, स्वस्थ रहा’ असा मौलिक सल्ला देण्यासाठी रस्त्यावर सक्रिय आहे.

 

‘कोविड 19’ महामारीच्या वैश्विक प्रादुर्भावामुळे संपूर्ण मानवजात हादरली असून या भयावह साथीचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक देश आपापल्यापरीने हरतर्‍हेचे प्रयत्न करीत आहे. आपल्या भारत देशातही या प्रलंयकारी, विस्मयकारी अरिष्टाचा सामना करण्याचे प्रयत्न जारी असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात ‘लॉकडाऊन’ जारी आहे. कोरोनाग्रस्तांसाठी देशभरातील डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी युद्धपातळीवर सक्रिय असून ‘लॉकडाऊन’ मोहिमेच्या यशस्वीतेसाठी पोलिस दलही दिनरात्र कार्यरत आहे. ‘कोविड 19’ मोहिमेत अनेक सेलेब्रिटिज, उद्योजक, क्रीडापटू, समाजकार्यकर्तेही आपापल्यापरीने योगदान देत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला नामना मिळवून दिलेले दिग्गज, नामवंत क्रीडापटूही सक्रिय योगदान देत आहेत.

राष्ट्रकुल मेळा सुवर्णपदक विजेता तथा प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार विजेता मुष्टियोद्धा अखिल कुमार हरयाना पोलिस दलातील पोलिस अधिकारी, उपअधीक्षक या नात्याने हरयानातील जनतेला ‘घरी रहा, स्वस्थ रहा’ असा मौलिक सल्ला देण्यासाठी रस्त्यावर सक्रिय आहे.

27 मार्च 1981 रोजी उत्तर प्रदेशमधील फैझाबाद शहरात जन्मलेला अखिल कुमार 13व्या वर्षापासून मुष्टियुद्ध रिंगणात सक्रिय झाला. राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक किताबे प्राप्त केलेला अखिल आपल्या ‘ओपन गार्डेड बॉक्सिंग स्टायल’साठी माहीर आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय क्षितिजावरील चमकदार कामगिरीमुळे भारत सरकारने 2005 मध्ये अर्जुन पुरस्कार देऊन त्याला गौरविले होते. 2017 मध्ये भारत सरकारच्या युवा व्यवहार तथा क्रीडा मंत्रालयातर्फे अखिलची महिला मुष्टियोद्धा मेरी कोमसह बॉक्सिंगमधील नॅशनल ऑब्झर्व्हर म्हणून नियुक्ती केली होती.

2066 मध्ये मेलबर्न येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या अखिल कुमारने बालवयातच आपला ठसा उमटविताना 1999 मध्ये सहाव्या वायएमसीए ज्युनियर इंटरनॅशनल बॉक्सिंग चँपियनशीपमध्ये आपले पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले. 2001 मध्ये रशियात झालेल्या निमंत्रित युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत अखिलने आणखी एक सुवर्णपदक जिंकले. 2003 मध्ये फ्लायवेट गटात अखिलने आणखी एक सुवर्णपदक मिळविले. कारकिर्दीत तीन वेळा ‘बेस्ट बॉक्सर’ किताब पटकावलेल्या अखिल कुमारने आपल्या धवल कारकिर्दीत 12 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्य पदके जिंकली.

2004 साली चीनमध्ये झालेल्या ऑलिंपिक प्रवेशपात्रता स्पर्धेत द्वितीय स्थान मिळवीत ऑलिंपिक प्रवेशपात्र ठरलेल्या अखिल कुमारने 2005 मध्ये ग्लासगो, स्कॉटलंड येथे झालेल्या चौथ्या कॉमनवेल्थ फेडरेशन बॉक्सिंग स्पर्धेत द. आफ्रिकेच्या बोंगानी महालान्गुचा 54 कि.ग्रॅ. गटात 18-17 असा पराभव करीत सुवर्णपदकाचा मान मिळविला. 2006 मधील मेलबर्न कॉमनवेल्थ गेम्समध्ये अखिलने बँटमवेटमधील 54 कि.ग्रॅ. गटात मॉरिशसच्या ब्रुणो ज्युलीवर अधिकारवाणीचा विजय मिळवीत आपले पहिलेवहिले राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकले.

2008 मधील बीजिंग ऑलिंपिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत त्याने मजल मारली. 2008 मध्येच मॉस्को येथील एआयबीएफ वर्ल्डकप स्पर्धेची उपांत्य फेरी ‘टाय’ झाल्याने पंचांच्या निर्णयामुळे अखिल कुमारला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. 2010 मधील लंडन ऑलिंपिकमध्ये वजन घटविण्यात असफल ठरल्याने अखिल स्पधेंत सहभागी होऊ शकला नाही.

हरयाना सरकारच्या क्रीडापटूंना पोलिस दलात बहुमानित पद देण्याच्या योजनेनुसार अखिल कुमार पोलिस अधिकारी म्हणून रुजू झाला. सध्या गुरुग्राम पोलिस ठाण्यात उपअधीक्षकपदी असलेला अखिल कुमार ‘लॉकडाऊन’ मोहिमेत जनतेला ‘घरी रहा, स्वस्थ रहा’ असा सल्ला देण्यासाठी अन्य नामवंत क्रीडापटू/पोलिस अधिकार्‍यांसह रस्त्यावर उतरून देशसेवा बजावत आहे. ‘लॉकडाऊन’ मोहिमेत जनतेकडून आम्हाला उत्तम प्रतिसाद लाभतोय. जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा नियमित असल्याने जनतेत गोंधळ, धांदल नाही. सरकारी आदेशाचे पालन केल्यास ‘कोविड 19’ महामारीवर मात करण्यात देशवासी सफल होतील अशी आशा आता जनतेलाही वाटते, असे राष्ट्रकुल मेळा सुवर्णपदक विजेता मुष्टियोद्धा अखिल कुमार म्हणतो.

हल्लीच आपला 38 वा वाढदिवस साजरा केलेल्या अखिल कुमार यांनी आपल्या सहकारी, मित्रांच्या सहयोगाने थोडा निधी उभारून गरजू नागरिकांना खाद्यपदार्थ तसेच सॅनिटायझर्स पुरविण्याचे सत्कार्य केलेले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी बजावीत देशाची शान उंचावलेला अखिल, विश्वचषक विजेता क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा, भारताचा माजी हॉकी कर्णधार राजपाल सिंह, कबड्डीस्टार अजय ठाकूर आदी अनेक दिग्गज क्रीडापटू पोलिस दलातर्फे ‘कोविड 19’ विरुध्द आपली मोहीम लढत आहेत. क्रीडाविश्व सध्या ठप्प बनलेले असले तरी अनेक दिग्गज आपापल्यापरीने या कार्यात भरीव योगदान देत असून या सर्वांच्या परिश्रम, प्रयत्नांना यश येवो आणि क्रीडाजगतही लवकरच सक्रिय बनो अशी आशा बाळगूया.