-ः खुले मैदान ः- दिग्गज हॉकीपटू बलबीर सिंग कालवश

0
154
  • सुधाकर रामचंद्र नाईक

भारतीय हॉकीला स्वातंत्र्योत्तर काळातील पहिले धवल यश, ऑलिंफिक सुवर्ण देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बलबीरजीच्या निधनाने भारतीय हॉकीचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यापासून भारतीय हॉकीला सुवर्णयुग पुनर्प्राप्त करून देण्याची प्रेरणा युवा खेळाडूंनी घेतली तर तीच खरी त्यांना श्रध्दांजली ठरावी!!

भारताचे महान हॉकीपटू तथा तीन वेळचे ऑलिपिक सुवर्णपदक विजेते, दिग्गज स्ट्रायकर बलबीर सिंग, सीनियर (९६) यांचे नुकतेच वाधर्क्य तथा आजारामुळे निधन झाले. १९४८ मधील लंडन ऑलिंपिकमध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील भारताच्या पहिल्या प्रमुख आंतरराष्ट्रीय यशाचे शिल्पकार ठरलेले बलबीर यांनी १९५२ मधील हेलसिंकी ऑलिंपिक आणि १९५६ मधील मेलबर्न ऑलिंपिकमधील भारतीय संघाच्या अजिंक्यपदात महत्त्वपूर्ण योगदान दिले. १९७५ मधील विश्‍वचषक विजेत्या तथा १९७१ मधील कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक/व्यवस्थापक म्हणून त्यांनी यशस्वीरीत्या जबाबदारी हाताळली.

३१ डिसेंबर १९२३ रोजी हरीपूर खालसा पंजाब येथे जन्मलेले बलबीर यांचे हॉकी कौशल्य तत्कालीन खालसा हॉकी संघाचे प्रशिक्षक हरबैलसिंग यांनी ओळखले आणि त्याना शिख नॅशनल कॉलेज लाहोरमधून खालसा कॉलेज अमृतसरमध्ये दाखल होण्याची ‘ऑफर’ दिली. अखेर १९४२ मध्ये बलबीरच्या कुंटुंबीयांनी त्यांना खालसा कॉलेजमध्ये दाखल होण्याची परवानगी दिली. हरबैलसिंग यांच्या मार्गदर्शन आणि कठोर सरावाखाली बलबीर यांचा खेळ बहरला. हरबैल यांनी नंतर हेलसिंकी आणि मेलबर्न ऑलिंपिकमध्ये भारतीय संघाचे यशस्वी प्रशिक्षकपद भूषविले.

१९४२-४३ मध्ये बलबीर यांना पंजाब विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पंजाब विद्यापीठ संघाने बहुतेक सर्व आंतरविद्यापीठ हॉकी जेतेपदे प्राप्त केली. १९४३ ते १९४५ अशी सलग तीन वर्षे बलबीर यांनी पंजाब विद्यापीठाचे कर्णधारपदही भूषविले.

फाळणीनंतर बलबीर यांच्या कुटुंबीयांनी लुधियानात स्थलांतर केले आणि त्याना पंजाब पोलिस दलात नोकरी मिळाली. १९४१ ते १९६१ या कालावधीत त्यानी पंजाब पोलिस संघाचे कर्णधारपद भूषविले.
लंडन ऑलिंपिकमध्ये (१९४८) अर्जेंटिनाविरुध्द बलबीर यांना पहिला ऑलिंपिक सामना खेळण्याची संधी मिळाली. नंतर ग्रेट ब्रिटनविरुध्द अंतिम सामन्यात ते खेळले आणि भारताच्या ४-० विजयात महत्त्वपूर्ण योगदान देताना पहिले दोन गोल नोंदवीत यशाचे शिल्पकार ठरले.

हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये बलबीर यांची उपकर्णधारपदी निवड झाली, तसेच शुभारंभ सोहळ्यात ध्वजाधिकार्‍याचा मानही त्यांना लाभला होता. के. डी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या ब्रिटनविरुध्दच्या उपांत्य फेरीतील ३-१ विजयात बलबीर यांनी शानदार हॅट्‌ट्रिक नोंदली. अंतिम फेरीत अर्जेंटिनाविरुध्द बलबीरनी आणखी मोठा भीमपराक्रम नोंदताना भारताच्या ६-१ विजयात पाच गोलांचा विक्रम नोंदला. या वीराट विक्रमासह बलबीर यांनी इंग्लंडच्या रॅगी प्राइडमोअर यांनी १९०८ मधील अंतिम फेरीत आयर्लंडविरुध्दच्या ८-१ विजयात नोंदलेल्या चार गोलांचा विक्रम मोडला. हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक मर्दुमकी गाजविताना बलबीर यांनी सर्वाधिक १३ गोल नोंदले. भारतीय संघाच्या एकूण गोलसंख्येत त्यांची आकडेवारी ६९.२३ टक्के एवढी होती!
मेलबर्न ऑलिंपिकमध्ये (१९५६) बलबीर यांची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. अफगाणिस्तानविरुध्दच्या शुभारंभी सामन्यात भारताला एकहाती विजय मिळवून देताना त्यांनी पाच गोल नोंदले. पण या सामन्यात ते जायबंदी झाले आणि प्राथमिक फेरीतील शेष सामन्यात त्यांची जागा रणधीरसिंग यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. उपांत्य आणि अंतिम फेरीत मात्र बलबीर यांनी पुनरागमन केले आणि अखेर अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर १-० अशा सनसनाटी विजयासह भारताला अजिंक्यपद मिळवून दिले. तीन ऑलिंपिकमध्ये भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केलेल्या बलबीरजीनी ८ ऑलिंपिक सामन्यांत २२ गोल नोंदले.

१९५७ मध्ये भारत सरकारतर्फे देण्यात येणारा क्रीडापटूंसाठीचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त करणारे बलबीर पहिले भारतीय क्रीडापटू ठरले. १९५८ मधील एशियन गेम्समधील रौप्यपदक विजेत्या संघाचेही ते सदस्य होते. १९७१ मधील विश्‍वचषक हॉकी स्पर्धेत कांस्यपदक मिळविलेल्या भारतीय हॉकी संघाचे ते प्रशिक्षक होते, तसेच १९७५ मधील विश्‍वचषक सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे ते प्रशिक्षक तथा व्यवस्थापक होते.

भारतीय हॉकीच्या यशात अजोड योगदान दिलेले बलबीर यांनी ‘गोल्डन हॅट्‌ट्रिक’ (१९७७) हे आत्मचरित्र आणि ‘दी गोल्डन यार्डस्टीक : इन क्वेस्ट ऑफ हॉकी एक्सलन्स’ (२००८) अशी दोन महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिली आहेत.

भारतीय हॉकीमधील योगदानाचा यथोचित सन्मान करताना बलबीर यांना केंद्र सरकारतर्फे १९५७ मध्ये पद्मश्री किताबाने गौरविण्यात आले. १९५८ मध्ये १९५६ मेलबर्न ऑलिंपिक सोहळ्यानिमित्ताने डॉमिनिकन रिपब्लिकतर्फे काढण्यात आलेल्या ‘स्टॅम्प’मध्ये बलबीर आणि गुरदेव यांचा समावेश होता. १९८२ मध्ये नवी दिल्लीत एशियन गेम्स क्रीडा ज्योत प्रज्वलनाचा मान बलबीर यांना देण्यात आला होता. १९८२ मध्ये ‘पॅट्रियट’ या वृत्तपत्राने घेतलेल्या ‘नॅशनल पोल’मध्ये बलबीर यांची ‘इंडियन स्पोर्टसपर्सन ऑफ दी सेंच्युरी’ म्हणून निवड झाली. २००६ मध्ये त्यांना ‘बेस्ट शिख हॉकी प्लेयर’ पुरस्कार देण्यात आला. आपण निधर्मवादी आहोत आणि आपणाला जातीयवाद मान्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले, पण अखेर हॉकीच्या प्रगतीसाठी हे कार्य असल्याने त्यानी तो स्वीकारला. २०१५ मध्ये हॉकी इंडियातर्फे बलबीर यांचा ‘मेजर ध्यानचंद लाइफटाइम ऍचिव्हमेंट’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळात संघाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले तसेच प्रशिक्षक म्हणूनही वाटा उचललेले बलबीर सिंग हे भारतीय हॉकीमधील एक महान हॉकीपटू होते आणि त्याना त्यावेळी आधुनिक काळातील ‘ध्यानचंद’ असेही संबोधले जायचे. वाधर्क्यामुळे गेल्या ८ मे रोजी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्याना तीन हृदयविकाराचे झटके आले आणि प्रकृती खालावली. त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली पण ती ‘निगेटिव्ह’ होती ही कुटुंबीयांसाठी सुखद बाब होती, पण एमआरआय चाचणीत मेंदूमध्ये ‘ब्लड क्लॉट’ असल्याचे स्पष्ट झाले आणि प्रकृती खालावली. अखेर सोमवार दि. २५ मे रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे कन्या सुशबीर, तीन पुत्र कंवलबीर, करणबीर आणि गुरबीर असा परिवार आहे. बलबीरजीच्या अंत्यविधीला पंजाबची क्रीडामंत्री, आजी-माजी मंत्री, सरकारी अधिकारी, ऑलिंपियन, त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय हॉकीला स्वातंत्र्योत्तर काळातील पहिले धवल यश, ऑलिंफिक सुवर्ण देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बलबीरजीच्या निधनाने भारतीय हॉकीचे मोठे नुकसान झालेले असून त्यांच्यापासून भारतीय हॉकीला सुवर्णयुग पुनर्प्राप्त करून देण्याची प्रेरणा युवा खेळाडूंनी घेतली तर तीच खरी त्यांना श्रध्दांजली ठरावी!!