-ः इतिहासाच्या पाऊलखुणा ः- गडचिंचली येथील साधूंचे हत्याकांड

0
308
  • दत्ता भि. नाईक

हत्या साधूंची झालेली आहे; भाजपाच्या कार्यकर्त्यांची नव्हे. तरीही तुमचे सरपंच असताना ही घटना घडलीच कशी असा भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारला जातो. या घटनेमुळे देशातील संतसमाजामध्ये क्षोभ पसरलेला आहे.

 

16 एप्रिलच्या रात्री पालघर जिल्ह्यातल्या पालघर या तालुक्यातील गडचिंंचले या गावी सुमारे चारशे ते पाचशे लोकांच्या जमावाने दोन भगवा वेशधारी साधू व त्यांचा चालक यांची लाठ्याकाठ्या व दंडुक्यांनी मारून हत्या केली. या निर्दय घटनेमुळे संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. हे साधू म्हणजे मुलांना पळवून नेऊन त्यांचे मूत्रपिंड वगैरे अवयव काढून घेणारी टोळी आहे असा गैरसमज पसरल्यामुळे त्यांच्यावर गावकर्‍यांनी हल्ला केला असे सांगितले जाते. परंतु अशी अफवा पसरवणारे कोण होते व त्यांचा हेतू काय होता यात बारकाईने लक्ष घालणे आवश्यक आहे. काही वर्षांमागे दवर्ली या गावी एका गॅरेजमध्ये ठक्कर नावाचे दोन बंधू गाडी दुरुस्त करून देण्यासाठी म्हणून आले असता घंटा बडवून गॅरेजमध्ये दरोडेखोर आलेले आहेत अशी अफवा पसरवून जमावाकडून त्यांच्यावर हल्ला घडवून आणला होता व त्यात दोन्ही ठक्करबंधूंचा मृत्यू झाला होता. त्या दोघांपैकी एक कस्टमचा अधिकारी होता व म्हणूनच लष्कराकरवी हा हल्ला म्हणजे ‘मॉब लिंचिंग’ केले गेले होते. त्याचप्रमाणे या मॉब लिंचिंगमागे कोणते कारण आहे याची शहानिशा केली पाहिजे.

मिशनर्‍यांचा पोटशूळ

भोळ्याभाबड्या जनजाती समाजातील लोकांचे धर्मांतर करण्याचे काम इस्ट इंडिया कंपनी भारतात प्रगट झाल्यापासून सुरू आहे. इंग्रजांनी 1857 च्या अनुभवानंतर भारतीय समाजाच्या धर्मसंस्थांमध्ये ढवळाढवळ करायची नाही असे ठरवले असले तरी रोमन कॅथोलिक प्रोटेस्टंट, बाप्ती÷स्ट या सर्व चर्चेसच्या मिशनर्‍यांना देशात मोकळीक दिली. धर्मांतराने राष्ट्रांतर होते हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उघडपणे जगासमोर मांडले. त्याचप्रमाणे महात्मा गांधींनीही हा धोका ओळखला होता व म्हणूनच त्यांनी त्यांचे शिष्य ठक्कर यांना जनजातींचे धर्मांतर रोखण्यासाठी या क्षेत्रात वावरण्यास सांगितले. गांधीजींच्या नंतर काँग्रेसचे नेतृत्व देशाच्या सांस्कृतिक वारशावर विश्वास नसलेल्या नेत्यांकडे गेले व त्याच धोरणानुसार देशाचीही अंतर्गत नीती बनत गेली. त्यामुळे आम्हाला तुमच्या सरकारने धर्मांतर करायची परवानगी दिलेली आहे इतपत उत्तर नियोगी कमिशनला देण्यापर्यंत ख्रिस्ती मिशनर्‍यांची मजल गेली. यावर उपाय म्हणून गिरीकंदरात व रानावनात राहणार्‍या जनजातीतील स्त्री-पुरुषांच्या सांस्कृतिक परंपरांचे रक्षण करण्यासाठी विश्व हिंदू परिषद तसेच वनवासी कल्याण आश्रम या संस्थांनी या क्षेत्रात निरनिराळे प्रकल्प सुरू केले. यात यात विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे, महिलांसाठी कौशल्य व कलाविकास केंद्रे, पशुपालन इत्यादी गोष्टींचा या प्रकल्पात अंतर्भाव होता. यामुळे ख्रिस्ती मिशनर्‍यांना लालूच दाखवणे व चमत्कारांची छाछूगिरी करणे या मार्गातून जनजाती समाजातील लोकांचे धर्मांतर करणे यावर पायबंद बसला म्हणून त्यांचा पोटशूळ उठणे हे साहजिक होते. परंतु युरोपमध्ये ख्रिस्ती धर्माविरुद्ध आघाडी उघडणार्‍या कम्युनिस्ट पक्षाने ख्रिस्ती मिशनर्‍यांशी संगनमत करून अपप्रचार व खुनशी हल्ले करीत या प्रकल्पाला विरोध चालू ठेवलेला आहे.

1967 साली माधवराव काणे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेऊन तळासरी (त्यावेळी हा भाग ठाणे जिल्ह्यात होता) जनजातीतील कातकरी व इतर समाजांतील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी जे वसतिगृह सुरू केले होते त्यावर 1991 च्या 14 ऑगस्ट रोजी खुनी हल्ला केला गेला. तेथील प्रकल्प चालवणार्‍या जोडप्याला मारहाण केली. प्रमुखाच्या अंगावर रॉकेल ओतले असतानाच पोलीस आल्यामुळे ते वाचले. त्यांनी विहिरीला बसवलेले पंप विहिरीत टाकले, पाळलेल्या बकर्‍यांच्या पाठीचे कणे मोडले, कुणीतरी पोलिसांना कळवल्यामुळे पोलीस आले, नाहीतर त्यांनी अधिकच नासाडी केली असती. या प्रकल्पाद्वारा तेथील जनजाती समाजातील स्त्री-पुरुषांकडून चारोळ्या, मध यांसारख्या वस्तू गोळा केल्या जात असतात व त्याचप्रमाणे त्यांनी विणलेल्या कलावस्तू या सर्व गोष्टी एकत्र करून त्यांना शहरात चांगला भाव मिळवून दिला जातो. यापूर्वी त्यांच्याकडून अतिशय कमी दरात या वस्तू विकत घेणारे त्यांचे शोषण करीत असत. जगातील पीडितांचे शोषण बंद करण्याच्या वल्गना करणार्‍या कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला घडवून आणला होता.

गुंतागुंतीचं राजकीय गणित

कल्पवृक्ष गिरी महाराज- वय वर्षे 70, सुशील गिरी महाराज- वय वर्षे 35 आणि त्यांच्या वाहनाचा चालक निलेश- वय वर्षे 30 अशी या घटनेत मरण पावलेल्यांची नावे आहेत. मुंबईहून सुरतला त्यांच्या परंपरेतील ज्येष्ठ साधूच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित राहण्यासाठी ते चालले होते. या घटनेचे राजकीय भांडवल करू नये असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच गृहमंत्र्यांनीही वक्तव्य केलेले आहे. साधूंवरील हल्ला हा संतप्त जमावाचा हल्ला नसून तो एक ठरवून केलेला कट होता. साधूंना वनखात्याच्या रक्षकांनी संरक्षण देऊन त्यांना पोलिसांच्या हवाली केले होते. याचा अर्थ ते चोर-दरोडेखोर असते तरीही त्यांच्या जिवाला त्या क्षणी धोका नव्हता. परंतु त्यांना पोलिसांच्या वाहनातून उतरवून त्यानंतर मारले गेलेले आहे. घटनास्थळी पोलीस वेळेवर पोहोचता कामा नये म्हणून रस्त्यारस्त्यांवर अडथळे तयार केले होते. पोलिसांनाही घेरून त्यांच्यावर हल्ला करायची हल्लेखोरांची तयारी होती हे यावरून सिद्ध होते. हा जमाव जमवण्यामागे कोण आहेत याची चौकशी झाली पाहिजे. जमावाने सरपंचाना जुमानले नाही व राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषद सदस्य श्री. काशिनाथ चौधरी तेथे आले असता हिंसक जमावाला अधिकच चेव चढला असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.

या भागातील राजकीय गणित बरेच गुंतागुंतीचे आहे. ज्या गावात ही घटना घडली त्या गडचिंचली गावच्या सरपंच चित्रा चौधरी या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. डहाणू विधानसभा क्षेत्राचा आमदार कम्युनिस्ट पार्टीचा आहे, तर पालघर लोकसभा क्षेत्राचा खासदार शिवसेनेचा आहे. हत्या साधूंची झालेली आहे; भाजपाच्या कार्यकर्त्यांची नव्हे. तरीही तुमचे सरपंच असताना ही घटना घडलीच कशी असा भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारला जातो. या घटनेमुळे देशातील संतसमाजामध्ये क्षोभ पसरलेला आहे. जनजाती संत समाज तसेच जनजाती सनातन हिंदू संस्कृती या संघटना व संस्थांचे प्रमुख यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे. स्वामी यतीन्द्रानंद गिरी, महामंडलेश्वर पुरी, नागा साधूंची संघटना व दार्जिलिंगमधील बौद्ध लामा उदय पाखदिन यांनीही या नृशंस घटनेचा निषेध केलेला आहे.

या घटनेच्या निमित्ताने अनेक गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत. शेजारील उदवा गावचे सरपंच सुरेश शिंदे यांच्या म्हणण्याप्रमाणे जनजातीच्या प्रत्येक वाड्यावर ख्रिस्ती मिशनरी फिरत असतात. लोकांना जाळ्यात पकडून त्यांचे धर्मांतर करतात. समाजमंदिर नावाचे सभागृह उभारून तेथे आलेलुईयाचा गजर करण्यास लावतात. जनतेच्या अशिक्षितपणाचा फायदा उठवतात. भांडणे सोडवण्याचे निमित्त करून फसवतात. औषधे देऊन चमत्कार केला म्हणून सांगतात. याचबरोबर कम्युनिस्टांशी संगनमत करून तुमचा देव रावण आहे असे त्यांना सांगतात व काही ठिकाणी रावणमहोत्सवही साजरा करतात.

सावधगिरी बाळगली पाहिजे

गडचिंचलीची घटना ही मॉब लिंचिंगचे अमानुष उदाहरण आहे. परंतु यापूर्वी मॉब लिंचिंगचे निमि÷त्त करून गदारोळ माजवणारे माध्यमवाले, पुरस्कार परत करणारे विचारवंत, हा देश आता सुरक्षित राहिला नाही म्हणणारे अभिनेते या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. केंद्रशासन समाजात कोरोना विषाणू पसरू नये म्हणून प्रयत्न करते तर त्यात यश मिळू नये म्हणून प्रयत्न करणारे गट उभे राहतात. हे गट कोणाच्या इशार्‍यावर नाचतात याचीही चौकशी झाली पाहिजे. हिंदूंच्या रक्ताचा एकही थेंब सांडला तर त्याचा बदला घेण्याची भीमप्रतिज्ञा करणारी शिवसेना सध्या सत्तेच्या वृक (लांडगा) जालात फसलेली आहे.

साधूच्या हत्येचा विषय चालू असतानाच रिपब्लिक टी.व्ही. चॅनेलचे मालक व संचालक अर्नब गोस्वामी यांच्या गाडीवर ते त्यांच्या पत्नीसह घरी परत जात असताना हल्ला करण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न केला. त्यांच्या निवास संकुलाच्या रक्षकांनी त्यांना ओळखले, तरीही देशभरातून अर्नब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले. सर्वोच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी वकिलांनी जी गर्दी केली त्यावरून न्यायमूर्तींनी त्यांना फटकारले. या घटनाक्रमामुळे शांतताप्रिय जनतेच्या असंतोषात अधिकच भर पडली आहे.

देशात असंतोषाचे वातावरण पसरले आहे व देशातील जनता क्रांती घडवून आणण्यास उत्सुक आहे, असा प्रचार करण्यात कम्युनिस्टांचा हातखंडा असतो. विकास म्हणजे पक्षाचा विकास; सामान्य माणसाचा नव्हे हे त्यांचे तंत्र आहे. आता पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या शिरगणतीत जे ख्रिस्ती जनजाती आहेत त्याने ख्रिस्ती म्हणून नोंद करावी व जे हिंदू आहेत त्यांनी ट्रायबल अशी नोंद करावी यासाठी देशात प्रयत्न सुरू झालेले आहेत. गोवाही त्याला अपवाद नाही. म्हणून सर्वजणांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.