- अजित पैंगीणकर
नऊ दिवस चालणारा हिंदूंचा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस दुर्गा देवीचा उत्सव असतो. त्याला शारदीय नवरात्र असेही म्हणतात. दुर्गा किंवा काली ही ज्या प्रमाणे ब्राह्मणांची कुलदेवता आहे, त्याप्रमाणे अनेक क्षत्रियांचीही ती कुलदेवता आहे. देवीच्या देवळातूनही सार्वत्रिक रीतीने हा उत्सव केला जातो. पहिल्या दिवशी घटस्थापना होते. लहानशा मातीच्या ढिगार्यावर गहू पेरून त्यावर मातीचा घट ठेवतात. घटावर देवीची स्थापना करतात. नऊ दिवस देवीचे पूजन करतात. रोज माळ घालणे, कुमारीचे पूजन करणे, अखंड दीप लावणे, उपवास करणे, सप्तशतीचा पाठ करणे, ब्राह्मण सुवासिनींना भोजन घालणे, हे आचार विविध कुळात पाळले जातात.








































































