सीमेवर धुमश्‍चक्रीत ३५ दहशतवाद्यांचा खात्मा

0
194

>> दहशतवादी भारतात घुसवण्याच्या पाकच्या कारस्थानावर भारतीय लष्कराचा प्रहार : पाकचे १० सैनिकही ठार

भारत सरकारने काश्मीरातील ३७० कलम लागू केल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार होणार्‍या शस्त्रसंधी उल्लंघनांना प्रत्त्युत्तर देण्यासाठी काल भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमील भागांमध्ये जोरदार कारवाई केली. तेथील दहशतवाद्यांचे कित्येक अड्डे भारतीय लष्कराने उध्वस्त करीत ३५ दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय हद्दीत घुसण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील भागांमध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी आपले अड्डे तयार केले होते. त्या अड्ड्यांवरून काल दहशतवाद्यांनी व पाक सैनिकांनीही भारतीय हद्दीत जोरदार गोळीबार केला. मात्र भारतीय जवानांनी त्याचा डाव हाणून पाडला.

कालच्या धुमश्‍चक्रीत भारताच्या दोन जवानांना वीरगती प्राप्त झाली. तसेच एका नागरिकाचाही मृत्यू झाला. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसविण्याच्या हेतुने पाक सैनिकांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात होते.

भारतीय हद्दीत मालमत्तेचे नुकसान
पाक सैन्याच्या हल्ल्यात भारतीय हद्दीतील मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एक घर, तांदळाचे गोदाम जमीनदोस्त झाले असून काही गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच १९ मेंढर्‍याही ठार झाल्या आहेत.
भारतीय लष्कराच्या प्रभावी कारवाईमुळे नीलम व्हॅलीतील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उध्वस्त झाले. दहशतवाद्यांबरोबरच या कारवाईत १० पाक सैनिकही ठार झाल्याचे सांगण्यात आले.

गुप्तचर यंत्रणांनी सतर्क केले होते
भारतात घातपात कारवाया घडवून आणण्याचे पाकचे कारस्थान असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. त्यामुळे भारताच्या सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क होत्या. या पार्श्‍वभूमीवर काल पाकिस्तानी सैनिक व दहशतवाद्यांनी कुरापती सुरू केल्यानंतर भारतीय लष्कराने चोख कारवाई बजावली.

निवडणुकांवेळी सर्जिकल स्ट्राईक
मोदी सरकारचा ‘पॅटर्न’ : कॉंग्रेस

देशातल्या मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका आल्या की सर्जिकल स्ट्राईक करायचा ही आता मोदी सरकारची पध्दत झाली आहे अशी टीका काल कॉंग्रेस नेते अखिलेश सिंह यांनी केली.

पाकव्याप्त काश्मीरात काल भारतीय लष्कराने कारवाई केल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आता यापुढे ज्वलंत विषयांपासून अन्यत्र लक्ष वळविण्यासाठी या कारवाईचा वापर केला जाईल असे सिंग म्हणाले. या विषयाचा आपल्या राजकीय फायद्यासाठी मोदी सरकारकडून वापर केला जाणार असल्याचा दावा त्यांनी केला.

पाकने वृत्त फेटाळले
भारतीय लष्कराने पीओकेमधील किमान ४ दहशतवादी अड्डे उध्वस्त केल्याचे वृत्त पाकिस्तानने फेटाळले आहे. तसेच याविषयी खातरजमा करण्यासाठी पाक सरकारची पी ५ देशांच्या राजनितिज्ञांना तेथे नेण्याची व्यवस्था करण्याची तयारी असल्याचेही सांगण्यात आले. हे वृत्त हा भारताचा खोटारडेपणा असल्याचा दावा पाकने केला आहे.

भारतीय उच्चायुक्तांना पाचारण
दरम्यान पाकिस्तानने इस्लामाबादमधील जुरा, शाहकोट व नौसेहरी भागांमध्ये आपले ५ नागरिक या गोळीबारात मरण पावल्याचे पाकने म्हटले आहे.