सायबर गुन्ह्यांत वाढ, आरोपी मोकाट!

0
159
  • देवेश कु. कडकडे
    (डिचोली)

इंटरनेट माध्यम जितके उपयुक्त आहे तितकेच ते भ्रामक आहे. या भ्रामक जगात वावरताना वास्तवाचे भान राखले नाही तर मानसिक रोग, फसवणूक अशा घटना घडत राहून ते अंमलात आणणारे गुन्हेगार मात्र समाजात मोकाट फिरत राहणार आहेत.

भारतात इंटरनेटची सुविधा १५ ऑगस्ट १९९५ पासून सुरू झाली. तेव्हा ग्राहकांची संख्या केवळ १० हजारपर्यंत होती. आता ती ६० कोटींपर्यंत पोहोचली असून त्यातील ५० कोटी लोक मोबाईल इंटरनेटचा वापर करतात. आधुनिक जगात संगणक आणि इंटरनेट सारख्या माध्यमांनी सार्‍या जगाला आपल्या कवेत घेतले आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील जवळजवळ सर्वच क्षेत्रांत संगणकाने शिरकाव केला आहे. तरुणवर्ग तर सोशल मीडियाच्या भ्रामक जगात इतका गुंतला आहे की त्यांना वास्तव जगाचे भान राहिलेले नाही.

इंटरनेटच्या माध्यमातून जशी समाजपयोगी कामे होतात, तशी जुगार, वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थांची विक्री अशी अनेक समाजद्रोही कृत्येही केली जातात. या माध्यमातून जगाला नवे नवे लाभ मिळत असताना दुसर्‍या बाजूला यातील धोक्याने अनेकांची झोप उडवली आहे. आज समाजात संगणक आणि इंटरनेटच्या संबंधित एकदम नव्या स्वरुपाचे गुन्हे समोर येत आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे जगाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यातून हे गुन्हे करता येतात. समाजात आधीपासून गुन्हे होणे ही गोष्ट स्वाभाविक होती, मात्र त्यांचा माग घेऊन गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे पोलीस यंत्रणेला सहजशक्य होते. मात्र अशा गुन्ह्यांचा तपास करणे म्हणजे समुद्रातील सुई शोधण्याइतके कठीण काम असते.

हे लोक चाकू, सूरी यांसारखी हत्यारे वापरत नाहीत तर आपले तांत्रिक कौशल्य वापरून लोकांच्या खात्याला कात्री लावतात. त्यामुळे या गुन्हेगारांचा माग घेणे तपासयंत्रणेच्या अवाक्याबाहेर असते. हे गुन्हेगार आपल्या हालचाली कोणत्या देशातून करतात, तो पुरुष आहे की स्त्री याचा पत्ता लागत नाही. अशा अदृश्य स्वरुपात करणार्‍या गुन्ह्यांना सायबर गुन्हे म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारचे गुन्हे घडतात, कारण आपल्याला इंटरनेट सुविधा वापरताना सुरक्षेच्या नियमांबद्दल अज्ञान असते. याच बेजबाबदार वृत्तीचा आणि निष्काळजीपणाचा फायदा उठवून गुन्हेगार समाजात फसवणूक करतात. हे गुन्हेगार केवळ एका व्यक्तीला किंवा कुटुंबाला गंडा घालतात असे नव्हे, तर मोठमोठ्या कंपन्या आणि सरकारी क्षेत्रालाही हानी पोचवतात. दुसर्‍यांच्या संगणकातून माहिती चोरणे, त्यांच्या ईमेल खात्यावरून संदेश प्रसारित करणे, देशद्रोही संदेशांचा प्रसार करणे, अश्लीलता पसरवणे, असे गुन्हे दुसर्‍यांच्या खात्यावरून अंमलात आणल्याने खातेदाराला आपले निर्दोषत्व सिद्ध करणे कठीण जाते. ग्राहकांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून सतत फोन येतात. अनेक आकर्षक बक्षिसे, योजनांचा भडीमार केला जातो. ग्राहक या थापांना भुलून आपली गुप्त माहिती उघड करतो. ऑनलाईन व्यवहार आपल्या दृष्टीने कितीही सुरक्षित मानले जात असले तरी फसवणूक करणारे या बाबतीत तरबेज आणि प्रशिक्षित असे निष्णात संगणकतज्ञ असतात, फरक इतकाच की ते आपली चलाखी आणि बुद्धिमत्ता सकारात्मक कामासाठी नव्हे, तर दुसर्‍यांना लुबाडण्यासाठी वापरतात. अशा लोकांना कष्ट न करता कमी वेळेत पैसा कमवायचा असतो. यातून वाचण्याचे सर्वांत उत्तम उपाय म्हणजे सावधगिरी बाळगणे.

आजच्या आधुनिक युगात अनेकजण झटपट व्यवहारासाठी इमेल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन बँकिंगसारख्या सुविधांचा लाभ उठवतात. मात्र त्यांच्या सुरक्षित व्यवहारासंबंधी अनेकजण अनभिज्ञ असतात. बँक कधीही फोनवरून डेबिट कार्ड किंवा इतर सुविधांच्या बाबतीत माहिती जाणून घेण्यासाठी फोनवरून संपर्क साधत नाही. आवश्यकता भासली तर बँक ग्राहकांना प्रत्यक्ष भेटायला बँकेत बोलावते. बँक यासंबंधी ग्राहकांच्या मोबाईलवर संदेश पाठवतात. हे संदेश इंग्रजीत असतात. अनेकांना वाचता येत नाहीत, अथवा काहीजण वाचण्यात स्वारस्य दाखवत नाहीत, याचाच हे फसवणारे फायदा उठवतात. फोनवरून माहिती दिली नाही तर तुमचे खाते बंद होईल, बैसे बुडतील असा भीतीचा बागुलबुवा दाखवून हे लोक ग्राहकांना घाबरवून सोडतात आणि ग्राहक आपली सर्व गुप्त माहिती उघड करतो. अशा तर्‍हेने कष्ट करून पै पै करून जमवलेली आयुष्यभराची कमाई एका क्षणात खात्यातून गायब होते. हा धक्का सहन न झाल्यामुळे अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत.

बँका सहसा याबाबतीत जागृती करताना दिसत नाहीत. एखादी फसवणूक झाल्यानंतर बँकांकडून सहसा नकारघंटाच ऐकू येते. गुन्ह्यांची त्वरित नोंद होत नाही. अशाने वेळेचा अपव्यय होऊन तपास भरकटत जातो. बँक सहसा अशा घटनांची बाहेर वाच्यता करत नाही, कारण गुन्हा उघड झाला तर बँकेची विश्‍वासार्हता धोक्यात येते.
ग्राहकांना बँका धीर न देता वेड्यात काढून त्यांनाच दोष देतात. त्यामुळे ग्राहक लज्जेपोटी आणि खचून असल्या फसवणुका पचवतात. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अनेक बँका आपले उत्तरदायित्व झटकत असते. अशाने गुन्हेगार मोकाट सुटतात. झारखंड राज्यातील जामजाडा जिल्ह्यातील करमठा गाव अशा गुन्ह्यांनी बदनाम झाले आहे. वास्तविक बँक डेबिट कार्ड सारख्या सुविधांसाठी विशेष शुल्क आकारतात. मात्र त्यासाठी सुरक्षेची काळजी घेत नाहीत, कारण एटीएम कक्षामध्ये सुरक्षा रक्षक नसतातच. त्यामुळे एटीएम मशीन फोडणे, छेडछाड करणे, ग्राहकांची गुप्त माहिती चोरणे अशा घटना सर्रास घडतात. अनेकदा स्वतः ग्राहक नियम धाब्यावर बसवतात. हेल्मेट घालून, बुरखा घालून, तोंड लपवून एटीएममध्ये व्यवहार करतात. काही बँकांतील कर्मचारी ग्राहकांना पैसे भरण्यासाठी मशीन वापरण्याचा आग्रह धरतात. मात्र ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य ग्राहकांना याचे ज्ञान नसल्याने अडचणी येतात. त्यामुळे अनेकदा ते अनोळखी व्यक्तींची मदत घेतात आणि फसवणूक होते. बँकेतील कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याने कामाचा भार प्रचंड असल्यामुळे कर्मचारी ग्राहकांशी सौजन्याने वागत नाहीत, उद्धट उत्तरे देतात. गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्ह्यांची संख्या इतकी वाढत आहे की सरकारला खास सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर विभागाची स्थापना करावी लागली आहे. मात्र अशा विभागात काम करण्यास बहुतांश पोलीस उदासीन असतात. तिथे कामावर रुजू झाले तरी त्वरित बदली करून घेतात. त्यामुळे तपास ढिला पडतो आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण नगण्यच आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये लहान मुले लगेच शिकार होतात. मुलेही सामान्यतः संगणक आणि इंटरनेटचा उपयोग सुरुवातीला अभ्यासाची अध्ययन सामग्री मिळवण्यासाठी उपयोग करतात. मात्र मुले हळूहळू इंटरनेटच्या अन्य सुविधा जसे फेसबुक, इमेल, चॅटिंग, ऑन लाईन गेम्स खेळणे, नव्या नव्या वेबसाईट शोधणे यात अश्‍लील व्हिडिओंचा समावेश असतो. पालक याविषयी अनभिज्ञ असतात. त्यातील धोक्याची मुलांना माहिती नसते. काही पालकांना इंटरनेटचे प्राथमिक ज्ञान नसते. मुले भावनिक असल्याने गुन्हेगारांच्या सापळ्यात अलगद अडकतात. यासाठी शालेय अभ्यासक्रमात सायबर सुरक्षिततेविषयी जागृती करणे आवश्यक आहे. इंटरनेट माध्यम जितके उपयुक्त आहे तितकेच ते भ्रामक आहे. या भ्रामक जगात वावरताना वास्तवाचे भान राखले नाही तर मानसिक रोग, फसवणूक अशा घटना घडत राहून ते अंमलात आणणारे गुन्हेगार मात्र समाजात मोकाट फिरत राहणार आहेत.