समीर वर्मा पुढील फेरीत

0
112

>> सायना नेहवाल सलामीलाच गारद

समीर वर्मा व मिश्र दुहेरीतील जोडी प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी यांनी डेन्मार्क ओपन ‘बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुुपर ७५०’ स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत काल बुधवारी प्रवेश केला. सायना नेहवाल हिला मात्र पहिल्याच फेरीत झालेल्या पराभवाने बाहेरचा रस्ता धरावा लागला. जपानच्या सायाका ताकाहाशी हिने सायनाला सरळ दोन गेममध्ये २१-१५, २३-२१ असे पराभूत केले. दुसर्‍या गेममध्ये सायनाने १६-२० अशा स्थितीतून चार मॅच पॉईंट्‌स वाचवले.

परंतु, २१-२१ अशा स्थितीत तिच्या प्रतिस्पर्ध्याने लागोपाठ दोन गुणांची कमाई करत गेम व सामना जिंकला. सायनाचा पराभव झाला तरी समीरला विजयासाठी अधिक घाम गाळावा लागला नाही. त्याने जपानच्या कांता त्सुनेयामा याचा २१-११, २१-११ असा धुव्वा उडविला. समीरने सामन्याच्या सुरुवातच ४-० अशी केली. यानंतर त्याने किमान ३ गुणांची आघाडी राखली. दुसर्‍या गेममध्ये त्याने ४-४ अशी बरोबरीतून ९-४ अशी पाच गुणांची आघाडी घेतली. यानंतर त्याने मागे वळून न पाहता विजय साकारला. पुढील फेरीत समीरचा सामना ऑलिंपिक विजेत्या चेन लॉंग याच्याशी होणार आहे.

समीरविरुद्ध चेन लॉंगचा रेकॉर्ड २-० असला तरी मागील काही महिन्यांत लॉंगला अनेक चढउतार पहावे लागले आहेत. मिश्र दुहेरीत प्रणव-सिक्की यांनी मार्विन सिडेल व लिंडा एफलर या जर्मन जोडीचा २१-१६, २१-११ असा पराभव केला. पुढील फेरीत त्यांना मलेशियाच्या चौथ्या मानांकित चान पेंग सून व गोह लियू यिंग यांच्याशी दोन हात करावे लागतील. मिश्र दुहेरीतील अन्य एक भारतीय जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा यांनी अखेरच्या मिनिटाला सामन्यातून अंग काढून घेतले. अश्‍विनीच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यांनी माघार घेतल्याचे संघाच्या फिजियोने स्पष्ट केले.