लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा जिंकू

0
269

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मडगाव पत्रपरिषदेत व्यक्त केला विश्‍वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे उद्दिष्ट साध्य केले. त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती सुधारली. ही लोकसभा निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या दोन्ही तसेच तिन्ही विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. मडगाव येथील भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

भाजपने गोव्यात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली असून यावेळी प्रचारात सर्वत्र अफाट प्रतिसाद मिळाला आहे. आता दुसरी फेरी सुरू केली आहे. प्रत्येक ठिकाणी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या विकासाने जनता खुश आहे व ते भाजपकडे आशेने पहातात. भारतीय जनता पक्ष सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जातो असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने प्रशासकीय कारभार मंदावला. आपण मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली व सुरळीतपणा आणण्याचा प्रयत्न केला पण अजून यश आले नाही. आचारसंहिता संपल्यानंतर त्याला गती दिली जाईल असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

मगो पक्षाचे भाजपचा पाठिंबा काढून घेतला नाही. सुदिन ढवळीकर हे ज्येष्ठ मंत्री असून ते लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देतील अशी खात्री आहे व प्रधानमंत्र्यांच्या विकास योजनांना सहकार्य करतील अशा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दक्षिण गोव्यातील ऍड. नरेंद्र सावईकर यांचे दक्षिण गोव्यातील जनतेशी चांगले संबंध आहेत. पाच वर्षात खासदार निधीचा त्यांनी सर्व मतदारसंघात उपयोग केला. गोव्यातील रेल्वेचे प्रश्‍न सोडविले, खाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. पण कॉंग्रेसच्या माजी खासदारांनी कोणतेच काम केले नाही. आता कॉंग्रेसने निष्क्रीय माणसाला उमेदवारी देऊन हसे करून घेतले आहे असे मुख्यमंत्री सावंत यांनी फ्रान्सिस सार्दिन यांचे नाव न घेता टीका केली.

नितीन गडकरी यांनी पक्ष बदलू्‌ना उमेदवारी देऊ नका व जवळ ठेवू नका असे म्हटले आहे त्याचा विधानसभा पोटनिवडणुकीवर परिणाम होणार आहे का असे विचारता, त्यांचे म्हणणे गोव्यासाठी लागू होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही मतदारसंघाचे आमदार मतदारसंघांच्या विकासासाठी भाजपात आले. गोवा फॉरवर्ड पक्ष हा सहकारी असून तो नेहमीच साथ देत आहे. मंत्री विजय सरदेसाई दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात सहभागी आहेत. त्यांना भाजपात घेण्याचा प्रश्‍नच येत नाही असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सालसेत मिशन फसलेले असल्याने या निवडणुकीत भाजपचे नुकसान होईल का असे विचारता, कोणताच परिणाम होणार नाही. भाजप हा सर्व धर्मजातीच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.