रस्ता शुल्कातील कपातीनंतर खात्याला ८ कोटींचा महसूल

0
121

>> वाहतूक मंत्र्यांचा दावा, आठ दिवसांत २३८८ वाहनांची नोंदणी

वाहतूक खात्याने रस्ता शुल्कात केलेल्या ५० टक्के कपातीनंतर केवळ आठ दिवसात साडेआठ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला, असा दावा वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला.

वाहतूक खात्याचा रस्ता शुल्कात ५० टक्के कपात करण्याच्या निर्णयाची कार्यवाही १८ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. मागील १८ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर या आठ दिवसाच्या काळात वाहतूक खात्याकडे एकूण २३८८ नवीन वाहनांची नोंदणी झाली. त्यात १५५५ दुचाकी आणि ८३३ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. चार चाकी वाहनांकडून रस्ता शुल्कापोटी ३ कोटी ६३ लाख ५२ हजार ४६९ रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. तर १३.५५ कोटींचा जीएसटी जमा करण्यात आला आहे.

दुचाकी वाहनांकडून ५७ लाख १२ हजार ६२९ रुपयांचे रस्ता शुल्क गोळा करण्यात आले आहे. तर, २ कोटी ४४ लाख ३४ हजार ३९९ रुपयांचा जीएसटी प्राप्त झाला आहे. आठ दिवसांत ८ कोटी ३९ लाख ५१ हजार ६०८ रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

राज्याबाहेर नोंदणी केलेल्या महागड्या कारगाड्यांच्या मालकांनी ५० टक्के शुल्क कपातीच्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या वाहनांची गोव्यात पुन्हा नोंदणी करावी, अशी सूचना मंत्री गुदिन्हो यांनी केली. राज्यातील अनेकांनी महागड्या कारगाड्या विकत घेतल्या आहे. या गाड्यांची नोंदणी कमी शुल्क असलेल्या परराज्यात करण्यात आली आहे. तथापि, सदर महागड्या कारगाड्या गोव्यात चालविण्यात येत आहेत. परराज्यात नोंदणी केलेल्या महागड्या कारगाड्यांवर कारवाईला जानेवारी महिन्यापासून प्रारंभ केला जाणार आहे. असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.