मोटर वाहन कायदा दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर

0
169

मोटर वाहन कायदा १९८८ मध्ये सुधारणा करणारे विधेयक काल राज्यसभेत संमत करण्यात केंद्र सरकारला यश आले. रस्ता अपघातांमध्ये मानवी बळी जाणार्‍या देशांमध्ये भारत आघाडीवर असल्याचे चित्र बदलण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी सातत्याने मतप्रदर्शन करत होते. हे दुरुस्ती विधेयक गेल्या २३ रोजी लोकसभेत संमत झाले होते.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात आल्याने याबाबतचा कायदा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हे दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याने मोटर वाहन कायद्यात आता मोठे बदल होणार आहेत. देशातील रस्ते व रस्ता वाहतूक याबाबत प्रशासकीय पद्धतीची कडक अंमलबजावणी शक्य होणार आहे. रस्ता वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याविरोधातील नियम कडक करणे, त्यासाठी दंड रक्कम वाढवणे तसेच अनावश्यक नियमप्रक्रिया हटविणे याबाबत या कायद्यामुळे शिस्त आणली जाणार आहे. तसेच रस्ता अपघात पीडितांना मदत करणार्‍यांना सुरक्षा देण्याची तरतूदही या सुधारीत कायद्यात होणार आहे.
या विधेयकात वाहतूक नियम उल्लंघन केल्यास ठोठावल्या जाणार्‍या दंडाची किमान रक्कम १०० रु. वरून ५०० रु. अशी वाढणार आहे. दंडाची कमाल रक्कम १० हजार रु. पर्यंत वाढणार आहे.

वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविल्यास असलेली दंडाची रक्कम ५०० रु. वरून ५ हजार रु. अशी वाढविली आहे. सीट बेल्ट न घातल्यास १०० रु. ऐवजी १००० रु. दंड भरावा लागेल. मद्यपान करून ड्रायव्हिंग केल्यास दोन हजार ऐवजी दहा हजार रु. दंड होणार आहे. धोकादायक ड्रायव्हिंगसाठी दोन हजार ऐवजी दहा हजार रु भरावे लागतील. आपत्कालीन वाहनास वाट न दिल्यास दहा हजार रु. दंड होणार आहे. याआधी अशा गुन्ह्यासाठी तरतूद नव्हती. ओव्हर स्पीडिंग केल्यास हलक्या वाहनांसाठी १ हजार व अवजड वाहनांना २ हजार रु. दंड होणार आहे. वाहनांची शर्यत लावणार्‍यांस ५ हजार रु. दंड होणार आहे.

वाहनाच्या विम्याची मुदत संपूनही तसेच वाहन चालविल्यास २ हजार रु. दंड होणार आहे. अल्पवयीनांना वाहन चालविण्यास मान्यता नसल्याने अल्पवयीन वाहन चालवून त्याच्याकडून अपघात झाल्यास पालकांना जबाबदार धरून कारवाई होणार आहे.
अपघातावेळी ‘हिट अँड रन’ प्रकरणात मृत्यू झाल्यास सध्याच्या कायद्यात २५ हजार रु. नुकसान भरपाईचा नियम आहे. नव्या कायद्यानुसार ही रक्कम २ लाख रु. केली आहे. तर जखमीबाबत ही रक्कम १२,५०० वरून ५० हजार रु. अशी केली आहे.
वाहन अपघात निधी
केंद्रीय पातळीवर वाहन अपघात निधीची स्थापना केली जाईल. त्यातून सर्व रस्ता वापरणार्‍यांना सक्तीचे विमा कवच व रस्ता अपघात पीडितांना नुकसान भरपाई दिली जाईल.

ड्रायव्हिंग परवान्याची
आठवी उत्तीर्ण अट रद्द
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी असलेली ८ वी उत्तीर्णची अट काढण्यात आली आहे. ड्रायव्हिंग स्कूलकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कोणतीही व्यक्ती परवान्यासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल.