मुसळधार पावसामुळे सर्वत्र पडझड

0
146

पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या गोमंतकीयांना तृप्त करताना काल पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काही भागांतील रस्ते पाण्याखाली जाणे, झाडे कोसळणे, वाहतुकीची कोंडी होणे अशा गोष्टी घडल्याने राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले.

बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने शालेय विद्यार्थी, कर्मचारी वर्ग, उघड्यावर बसून मालविक्री करणारे विक्रेते, बाजारहाट करण्यासाठी जाणारे लोक आदींची धांदल उडाली. काल ढवळी-फोंडा येथे रस्त्यावरून धावणार्‍या एका गाडीवर झाड कोसळून पडले. मात्र, सुदैवाने ह्या अपघातात जीवीतहानी झाली नाही. पण वाहतूक कित्येक तास खोळंबली.

राजधानी पणजी शहरासह पर्वरी, म्हापसा, मडगाव व अन्य ठिकाणी बुधवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील काही रस्ते पाण्याखाली गेले. दरम्यान, येत्या शनिवारपर्यंत २९ जूनपर्यंत राज्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच मच्छिमारांना मच्छिमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मडगाव – पणजी महामार्गावर चक्काजाम
दरम्यान, जोरदार पावसामुळे काल पणजी-मडगाव महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. मडगाव-पणजी महामार्गावर पुलाचे व चारपदरी महामार्गाचे काम चालू असून त्यामुळे कुठ्ठाळी ते वेर्णा या दरम्यान वाहतुकीची कोंडी होत असते.

पणजीत १६ तासांत ४.३७ इंच

राजधानी पणजीमध्ये काल (बुधवारी) पहाटे ५.३० ते रात्री ८.३० या १६ तासांमध्ये ४.३७ इंच पावसाची नोंद झाली आहे. पणजीमध्ये आत्तापर्यंत १७.४८ इंच पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे पणजीतील अनेक रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला. सकाळच्या सत्रात जोरदार पावसाने पणजीला झोडपून काढल्याने जनजीवनावर विपरीत परिणाम झाला. दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी झाले. सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या १३ तासांमध्ये साधारण २ इंच पावसाची नोंद झाली, अशी माहिती पणजी हवामान विभागाने दिली.