मुंबईने रोखला चेन्नईचा विजयरथ

0
131

मुंबई इंडियन्सने काल बुधवारी वानखेडे स्टेडियमवर आपल्या घरच्या प्रेक्षकांच्या साक्षीने चेन्नई सुुपर किंग्सचा विजयी घोडदौडीला ब्रेक लगावला. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील या १५व्या सामन्यात मुंबईने ३७ धावांनी विजय संपादन केला. हार्दिक पंड्याची अष्टपैलू चमक तसेच जेसन बेहरेनडॉर्फ व मलिंगाच्या भेदक मार्‍यासमोर चेन्नईच्या संघाने गुडघे टेकले. विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य असताना चेन्नईला ८ बाद १३३ धावाच करता आल्या.

विजयासाठी १७१ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची दोनबाद ६ अशी दयनीय स्थिती झाली होती. सुरेश रैना परतला तेव्हा फलकावर केवळ ३३ धावा लागल्या होत्या. केदार जाधवने ५४ चेंडूंत ५८ धावा केल्या. परंतु, आवश्यक धावगतीच जवळपासदेखील जाणे त्याला शक्य झाले नाही. धोनीच्या कुर्मगती फलंदाजीमुळे वाढलेल्या दबावाचा जाधव बळी ठरला. धोनीने २१ चेंडू खेळून केवळ १२ धावा जमवल्या. यानंतरच्या फलंदाजांनी अधिक प्रतिकार केला नाही.

तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण देताना धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. नव्या चेंडूने गोलंदाजी केलेल्या दीपक चहर व शार्दुल ठाकूर यांनी टिच्चून मारा करताना स्विंग होणार्‍या चेंडूचा पुरेपूर लाभ उठवला. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असलेल्या क्विंटन डी कॉक याला चहरने स्क्वेअर लेगवर असलेल्या केदार जाधवकरवी झेलबाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. नैसर्गिक फटकेबाज असलेल्या रोहित शर्मावरदेखील दबाव दिसून आला. धावा जमवण्यासाठी त्याला झगडावे लागले. मध्यमगती गोलंदाजांविरुद्ध चाचपडल्यानंतर डावखुरा संथगती गोलंदाज रवींद्र जडेजाचा चेंडू कव्हर्सच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नात यष्टिरक्षक धोनीकरवी झेलबाद होऊन तो परतला. रोहितने १८ चेंडू खेळताना केवळ १३ धावांचे योगदान दिले. एका टोकाने गडी बाद होत असताना तिसर्‍या स्थानावरील सूर्यकुमार यादवने परिपक्वतेचे दर्शन घडविले. हवाई फटकेबाजी टाळताना मैदानालगत अधिक फटके खेळत त्याने संघाचा डाव सावरला. ४३ चेंडूंचा सामना करत ८ चौकार व १ षटकारासह त्याने ५९ धावांचे योगदान दिले. युवराज सिंगच्या अपयशाची मालिका कायम राहिली. जबाबदारीने खेळ दाखवण्याची आवश्यकता असताना ताहीरच्या गोलंदाजीवर लॉंगऑफवरून मोठा खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. अंबाती रायडूने त्याचा सोपा झेल घेतला. कृणाल पंड्याने ३२ चेंडूंत ४२ धावांची आकर्षक खेळी साकारली. यानंतरही १८ षटकांत मुंबईला केवळ ५ बाद १२५ धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटच्या दोन षटकांनी मात्र डावाचे चित्र पूर्णपणे बदलले. शार्दुल ठाकूरने टाकलेल्या डावातील १९व्या व वैयक्तित चौथ्या षटकात मुंबईने १६ धावा चोपल्या. यात हार्दिक पंड्या व कायरन पोलार्डच्या प्रत्येकी एका षटकाराचा समावेश होता. ‘डेथ ओव्हर्स स्पेशलिस्ट’ ड्वेन ब्राव्होने शेवटच्या षटकांत २९ धावांची खैरात केली. पहिल्या दोन अधिकृत चेंडूंत केवळ तीन धावा दिल्यानंतर ब्राव्होने तिसरा चेंडू कमरेवरील नोबॉल टाकला. या चेंडूवर पोलार्डने षटकार खेचला. ‘फ्री हिट’वर पोलार्डने तीन धावा घेत स्ट्राईक हार्दिक पंड्याला दिली. पंड्याने शेवटच्या तीन चेंडूंत दोन षटकार व एक चौकार ठोकत संघाला १७० धावांपर्यंत पोहोचविले. चेन्नईच्या यापूर्वीच्या लढतीत ब्राव्होने १२ धावांचा यशस्वी बचाव करताना केवळ तीन धावा दिल्या होत्या. या सामन्यात मात्र त्याने सामन्याची दिशा बदलून टाकणारे षटक टाकले.

चेन्नईने अतिरिक्त मध्यमगती गोलंदाज खेळवताना या सामन्यात डावखुरा संथगती गोलंदाज मिचेल सेंटनरला बाहेर बसवून मोहित शर्माला पसंती दिली. दुसरीकडे मुंबईने मिचेल मॅकलेनाघन व मयंक मार्कंडे यांच्या जागी जेसन बेहरेनडॉर्फ व राहुल चहर यांना ‘अंतिम ११’मध्ये संधी दिली.
मुंबईच्या विजयामुळे चेन्नई सुपरकिंग्सला आपले अव्वलस्थान गमवावे लागले असून सरस निव्वळ धावगतीच्या जोरावर किंग्स इलेव्हनचा संघ प्रथमच पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

धावफलक
मुंबई इंडियन्स ः क्विंटन डी कॉक झे. जाधव गो. दीपक ४, रोहित शर्मा झे. धोनी गो. जडेजा १३, सूर्यकुमार यादव झे. जडेजा गो. ब्राव्हो ५९, युवराज सिंग झे. रायडू गो. ताहीर ४, कृणाल पंड्या झे. जडेजा गो. शर्मा ४२, हार्दिक पंड्या नाबाद २५, कायरन पोलार्ड नाबाद १७, अवांतर ६, एकूण २० षटकांत ५ बाद १७०
गोलंदाजी ः दीपक चहर ३-०-२१-१, शार्दुल ठाकूर ४-०-३७-०, मोहित शर्मा ३-०-२७-१, इम्रान ताहीर ४-०-२५-१, रवींद्र जडेजा २-०-१०-१, ड्वेन ब्राव्हो ४-०-४९-१
चेन्नई सुपरकिंग्स ः शेन वॉटसन झे. पोलार्ड गो. मलिंगा ५, अंबाती रायडू झे. डी कॉक गो. बेहरेनडॉर्फ ०, सुरेश रैना झे. पोलार्ड गो. बेहरेनडॉर्फ १६, केदार जाधव झे. डी कॉक गो. मलिंगा ५८, महेंद्रसिंग धोनी झे. यादव गो. हार्दिक १२, रवींद्र जडेजा झे. डी कॉक गो. हार्दिक १, ड्वेन ब्राव्हो झे. डी कॉक गो. मलिंगा ८, दीपक चहर झे. बुमराह गो. हार्दिक ७, शार्दुल ठाकूर नाबाद १२, मोहित शर्मा नाबाद ०, अवांतर १४, एकूण २० षटकांत ८ बाद १३३
गोलंदाजी ः जेसन बेहरेनडॉर्फ ४-०-२२-२, लसिथ मलिंगा ४-०-३४-३, हार्दिक पंड्या ४-०-२०-३, जसप्रीत बुमराह ४-०-२७-०, राहुल चहर २-०-११-०, कृणाल पंड्या २-०-१२-०