मन हो श्यामरंगी रंगले…

0
585
  • मीना समुद्र

कृष्णाचं संपूर्ण जीवन म्हणजे मानवाला अनाकलनीय वाटणार्‍या अनेक विलक्षण घटनांची गुंफण. एकता, समानता, सत्यता, मित्रत्व, सख्यत्व, पावित्र्य, मांगल्य, सेवाभाव, निर्भयता याचं प्रतीक म्हणजे श्रीकृष्ण. त्याच्या खेळातला आनंद म्हणून गोवर्धन उभारून, गोपाळकाला करून, दहिहंड्या फोडून, बासरीवादन, नर्तन करून आपण कृष्णजन्म साजरा करतो.

माणसाच्या भोवतालचा निसर्ग जोपर्यंत डोंगर-नद्या-सागर-झाडेवेली यांच्या रूपाने कार्यरत आहे; भोवतीची सारी सृष्टी जोपर्यंत चैतन्यशील आहे, तोपर्यंत त्यांनीच दिलेली संस्कृती माणूस कसा विसरेल? यंदाच्या जागतिक आपत्तीच्या काळातही बाह्यजग हादरले तरी भारतीयांनी आपल्या अंतर्यामीची ज्योत विझू दिली नाही. उलट जगाला आशेचे सोनेरी किरण दाखविले. त्यामुळेच आठवणीत रुजलेला श्रावण नेहमीसारखाच अंकुरून वर आला; एवढेच नव्हे तर त्याला नवउन्मेषाचे, कल्पनेचे, कलात्मकतेचे नवनवीन धुमारे फुटले. मनामनांत तेवणारे आशेचे दीप स्नेहस्निग्धतेने उजळले. बाहेरची मंदिरे बंद झाली तरी सणा-उत्सवांच्या स्मृतींचे अंतस्थ गाभारे खुले झाले आणि तिथे तेवणार्‍या नंदादीपाचा उजाळ माणसाच्या कृतींना साथ करत राहिला.

हिरवाई लेवून आलेला हा मनभावन श्रावण पारिजातासारखा टपटपत, जाईजुईच्या, मोगरा-चमेलीच्या मिषाने दरवळत राहिला. मनोमनी फुलत, खुलत राहिला आहे. नवनवलनयनोत्सवाने उल्हसित करीत राहिला आहे. पंचमीच्या सणाला नागप्रतिमेची वा चंदनी नागचित्राची पूजा झाली. पार दूर रानावनात जिथे माणसांचा संसर्ग-संपर्क नाही अशा ठिकाणी वारुळे पुजली गेली. फांद्यांना बांधलेले हिंदोळे माहेरवाशिणी आणि मुलीबाळींनी झुलवले. ऊन-पावसाचा लाजरा-बुजरा खेळ खेळणारा श्रावण पौर्णिमेला रक्षा-बंधनासाठी सज्ज झाला. जवळ असलेल्या भावांचे हात बहिणींच्या राख्यांनी सजले. दूरदूरच्या बहीण-भावांचे सजल नयन श्रावणधार होऊन बरसले. दर्याचे उधाण शांतविण्यासाठी नारळ अर्पून मनोभावे प्रार्थना झाली. आणि आता सर्वांना वेध लागले आहेत ते कृष्णजन्माचे- जन्माष्टमीचे, कृष्णाष्टमीचे. घनश्याम, मेघश्याम अशा त्या ‘नीलमण्या’चे!
होय! ‘नीलमणी!’ असेच त्या श्यामसुंदराच्या रांगत्या, गोंडस, गोड गोजिर्‍या बालरूपाचे वर्णन सूरदासांनी केले आहे. बालकृष्णलीलावर्णन करताना सूरदासांची वाणी पालवते, मधुस्रवा बनते. त्यांच्या दृष्टिहीनतेवर त्यांच्या अंतःस्थ जिव्हाळ्याने आणि कल्पक प्रतिभेने मात केली आहे. आणि ते लिहून गेले आहेत-
सोभित कर नवनीत लिये
घुटरुनि चलत, रेनु-तन-मंडित, मुख दधि लेप किये
चारू कपोल, लोल लोचन, गोरोचन तिलक दिये
लट लटकनि मनु मत्त, मधुप-गन मादक मधुहि पिये
कठुला-कंठ, व्रज केहरि-नख, राजत रूचिर हिये
धन्य ‘सूर’ एकौ पल इहिं सुखका सत कल्प किये
– अर्थात, नीलमणी श्यामसुंदराच्या हातात शुभ्र लोण्याचा गोळा आहे. धूळ लागून मळलेले अंगही शोभून दिसत आहे. लाल ओठ दह्याने माखलेले आहेत आणि भव्य कपाळ गोरोचनाचा टिळा लावून सजले आहे. डोळ्यातली (मिस्किल) शोभा आगळीच आहे. मस्तकावर रुळणारे कुरळे केस म्हणजे जणू सुंदर मुखकमलाचे मधुपान करणारे भुंगेच. मधुर सौंदर्यरसपान करून मत्त होऊन ते जणू त्याच्या मुखकमलाभोवती भिरभिरत गुंजारव करत आहेत. गळ्यात कंठा आणि छातीवर जादुटोणानिवारक अशी वाघनखं गुंफलेली माळ झुलते आहे. या रूपाच्या क्षणभर दर्शनाच्या आनंदापुढं शेकडो कल्पांचं जीवन व्यर्थ आहे.

घरातलं नवजात तान्हुलं हा सार्‍यांच्याच कौतुकाचा, कुतूहलाचा, ममतेचा, आंतरिक उमाळ्याचा आणि जीवीच्या जिव्हाळ्याचा विषय. त्याचं किती गुणगान करू असं प्रत्येकाला होऊन जातं. ते बाळ दिसतं कसं- कोणासारखं, हसतं कसं, त्याचे नाक, डोळे-हात-पाय-बोटे कशी आहेत, त्याचा वर्ण कसा आहे हे सारंच अगदी न्याहाळून पाहिलं जातं. वंशाच्या त्या दिव्याला किंवा दीपज्योतीला तळहाताचा पाळणा आणि काळजाचा कप्पा करून जपत असतात. कुणाची वाईट नजर लागू नये, त्याला कसली बाधा होऊ नये म्हणून काजळबोट, निर्भय व्हावं म्हणून वाघनखं गळ्यात घातली जातात. काळा गोफ गळ्यात, मनगटात बांधला जातो. सूरदासांची दिव्यदृष्टी या नीलाभ सानुल्या बाळाचे सारेच बारकावे टिपते, हे खरोखरच विस्मित करणारे.

असं हे परमसुंदर अद्भुत बालक श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री धो-धो पावसात, मेघांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत असताना कंसासारख्या क्रूर राक्षसानं बंदिवासात ठेवलेल्या वसुदेव-देवकीच्या पोटी जन्मलं. तेव्हा सात अर्भकांना कंसानं ठार केल्याचा अनुभव गाठीशी असल्यानं याला वाचविण्यासाठी देवकीनं काळजाचा तो तुकडा टोपलीत ठेवला आणि वसुदेवानं ती डोक्यावर घेऊन आपला मित्र नंद याच्याकडे त्याला सुरक्षित पोचविलं. त्याच्या अटळ निर्धारापुढे हातापायाच्या बेड्याही तुटल्या, कारागृहाचे दरवाजे उघडले आणि तुडुंब भरलेल्या यमुनेनं त्या चिमुकल्याचे चरणस्पर्श होताच त्याला वाट करून दिली. नंदाची नवजात कन्या या बाळाच्या जागी ठेवली गेली. तिला ठार मारण्यासाठी कंसाने उचलताच ती निसटून गेली आणि ‘कंसाला मारणारा गोकुळात आहे’ ही आकाशवाणी झाली.

गोपराज नंदाघरी कृष्णाच्या रूपाने नंदनवन फुलले. त्याचे बोबडे बोल सार्‍या गोकुळात घुमले. सार्‍या गोप-गोपींना कृष्णाने वेड लावले. त्याचे दर्शन, त्याचे स्पर्शन, त्याचे बोल, त्याची चाल सारे कसे वेधक. गोपांच्या घरी तो जाई तेव्हा त्यांना ब्रह्मानंद होई.
बालदसा गोपालकी सब काहूको भावै
जाके भवनमें जात है सो लै गोद खिलावै
गोपांच्या घरी दूध-दही-लोण्याला कसला तोटा? या घननीळाला मांडीवर घेऊन कौतुकाने त्याला तोच खाऊ दिला जाई. आणि ते बालक एवढे सुदृढ, एवढे निरोगी की सारे काही खाई आणि पचवे. घरी यशोदामातेचा डोळा चुकवून लोण्याचा गोळा खाणं हे तर नित्याचंच. बलराम हा त्याचा मोठा भाऊ. त्याची कागाळी घेऊन यशोदेला तो म्हणे-
‘‘मला बलरामदादा खूप चिडवतो, राग आणतो. तो सारखं मला विचारतो की नंद-यशोदा गोरे मग तू कसा काळा-सावळा? तुझे आईबाबा कोण आहेत? -म्हणून मी खेळायला नाही जात. सगळे गोपाळही मग मला चिडवतात आणि हसतात.’’ त्या लडिवाळाच्या तक्रारीवर यशोदा त्याला जवळ घेऊन सांगते की, बलराम मोठ्ठा वाईट आहे. मीच तुझी माता आणि तूच माझा पुत्र आहेस. ‘मैया मोरी मैं नहीं माखन खायो’ या ‘सूर’रचित पदात हा माखनचोर आपली चोरी कबूल करत नाही. मी तर गोपबाळांबरोबर रानात गेलो होतो. गायी राखत होतो. माझे हात एवढे छोटे ते त्या उंच शिंक्यापर्यंत कसे पोचतील? सगळे गोपाळ माझ्याशी मुद्दाम दुष्टपणानं वागतात. माझ्या तोंडाला जबरदस्तीनं लोणी फासतात. तुला मान्य नसेल तर ही घे तुझी काठी. आणि रुसून बसलेल्या कान्हाला यशोदा हसून जवळ घेऊन गळामिठी घालते. हृदयाशी धरते. ‘आकाशीचा चांदोबा हवा, त्याचा चेंडू करून मी खेळेन’ असा बालहट्ट करत कृष्ण रिंगण घालतो तेव्हा त्याची जगावेगळी मागणी ऐकून यशादो आश्‍चर्यविमूढ होते.

आपल्या गोपसख्यांसह नाना तर्‍हेचे खेळ खेळणे हा कृष्णाचा बालपणीचा आवडता उद्योगच. गवळणी, गोपिका जलभरणासाठी यमुनेवर गेल्या की यांनी घरात घुसून धुडगूस घातलाच म्हणून समजा! त्यातल्या त्यात गरीब गोपांना दही-दूध-लोणी मिळावे म्हणून सधन घरच्या दह्यादुधाच्या, लोण्याच्या हंड्या, मडकी फोडणे; त्यासाठी मनोरा रचून एकमेकांच्या खांद्यावर चढणे आणि सारे फस्त करणे; चाहूल लागताच पळून जाणे- त्यातूनही सुटून जाणे; उखळाशी बांधून घातले तर तेच उखडून देणे अशा करामती चालत. गोपांचे काम गायी राखण्याचे. कृष्ण गोपराजाचा गोपांच्या मुखियाचा पुत्र असला तरी त्यालाही ते चुकले नाही. हे सारेजण गायी राखायला वनात जात त्यांचे वर्णन अतिशय सुंदर शब्दात केले गेले आहे-
वनी खेळती बाळ ते बल्लवांचे
तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे
फुलांचे गळा घालुनी दिव्य हार
स्वनाथासवे ते करीती विहार
असे ते बाळगोपाळ गायींना चरायला सोडून वनात मुक्तविहार करत. कदंबाच्या भरगच्च झाडावर चढत. उड्या मारत. दुपारी न्याहारीला बसत. एकदा न्याहारीसाठी सर्वांनी पाने आणायची ठरवली. सगळे गोप कसले ना कसले पान घेऊन आले. कृष्ण मात्र जागचा हलला नाही. सर्वांनी विचारल्यावर त्याने आपला तळहात दाखवला. तेच त्याचे पान. कृष्ण सर्वांची भाजी-भाकर, गोडधोड, दहीदूध, फळे एकत्र करी आणि तो काला सर्वांना वाटे. हा गोपालकाला सर्वांना खूप गोड लागे. वेळूची बासरी कृष्ण वाजवे तेव्हा गोपबाळ तर मनाचे कान करून ऐकतच, पण गाईवासरे आणि पक्षीही ते सुस्वर ऐकण्यासाठी त्याच्या भोवती जमत. त्या मधुर आवाजाने तल्लीन होत. गोप-गोपी आणि सारे व्रजवृंदावन त्याच्या या मुरलीवादनाने भारले होते. साध्या काष्ठात प्राण फुंकून स्वराविष्कार केला तो कृष्णाने. गळ्यात फुलमाळा, माथ्यावर मोरमुकुट घालून हा पीतांबरधारी श्यामसावळा मुरली वाजवे तेव्हा त्याची ती उभं राहण्याची ढबही (लकब) अपूर्व असे. एकनाथांनी मोठ्या कौतुकाने त्याच्या या रूबाबद्दल म्हटलंय-
असा कसा देवाचा देव बाई ठकडा
देव एका पायाने लंगडा गं बाई
कृष्णाचं संपूर्ण जीवन म्हणजे मानवाला अनाकलनीय वाटणार्‍या अनेक विलक्षण घटनांची गुंफण. लहानपणापासूनच या अद्भुत घटनांची सुरुवात झालेली. कंसाचे क्रूर मनसुबे हाणून पाडत पूजना-वध, कंस-वधकरण, कालियामर्दन, यशोदेला बालमुखातून विश्‍वरूप दर्शन, रासलीला, पुढे सत्य व न्यायनीतीसाठी पांडवांच्या पाठीशी उभं राहणं, द्रौपदीचं लज्जारक्षण, द्रौपदीच्या थाळीतलं पान खाऊन ढेकर देऊन वनवासात तिचा सहाय्यक होणं, द्वारकेचा राणा असून निर्धन सुदाम्याचे पोहे खाणं, विदुराघरच्या कण्या खाऊन संतुष्ट होणं, महाभारत युद्धात अर्जुनाचं सारथ्य करणं, त्याला स्वतःच्या विराटरूपाचं दर्शन घडवणं- त्याचा मानवतेलाच अर्जुनाच्या मिषाने केलेला गीतोपदेश…

कृष्णजीवनातील असे अनेक प्रसंग आपल्याला चकित करतात. राधा-कृष्णाचं दिव्य भक्तिप्रेम आपल्याला आध्यात्मिक पातळीवर घेऊन जातं. मानव्याचे मोल शिकवणारे हे सारे प्रसंग. कृष्ण याचा अर्थच आकर्षून घेणारा. आपल्या आगळ्या गोंडस सौष्ठवाने आणि खेळकर लीलालाघवाने कृष्णाचे बालरूपच आपल्याला अधिक आकर्षून घेते. त्याच्यातले खट्याळ, खोडकर मूल अधिक भावते. दही-दूध-लोणी चोरणार्‍या त्या माखनचोराचा राग येत नाही. गोपींची मडकी फोडली, दह्यादुधाचा रबडा केला तरी त्याचं दह्यालोण्यानं बरबटलेलं मुखच आपल्याला आवडतं. गोपींची वस्त्रे चोरण्याचा खट्याळपणा, त्यांची विनवणी आणि लटका राग-रुसवा हे सारं कुठेतरी खोडकरपणाचंच म्हणून सोडून देतो. सानेगुरुजींनी क्षणाक्षणाला बदलणार्‍या वृत्ती म्हणजे गोपी- त्यांची दुष्टवृत्ती बाह्यरंग ओढून लाक्षणिक वस्त्रे दूर केली, असा त्यामागचा अर्थ सांगितलाय. एकता, समानता, सत्यता, मित्रत्व, सख्यत्व, पावित्र्य, मांगल्य, सेवाभाव, निर्भयता याचं प्रतीक म्हणजे श्रीकृष्ण. त्याच्या खेळातला आनंद म्हणून गोवर्धन उभारून, गोपाळकाला करून, दहिहंड्या फोडून, बासरीवादन, नर्तन करून आपण कृष्णजन्म साजरा करतो.

‘गो’ म्हणजे इंद्रिये. यांना पाळणारा, संयमित ठेवणारा हा कृष्ण आज खूप खूप हवा आहे. आज जीवनात संकटभयामुळे कृष्णपक्षाचा अंधःकार दाटलेला असताना, निराशेचे, दौर्बल्याचे सावट अधिकाधिक दाट होत असताना, कुठलाही मार्ग नीट दिसत नसताना, मृत्युभय, प्राणभय दाटलेले असताना ‘संभवामि युगे युगे’ ही कृष्णाची ग्वाही ऐकू यायला हवी. कृष्णजन्म व्हायला हवा. या प्रलयकाळानंतर पायाचा अंगठा चोखत पिंपळपानावर वा वटपत्रावर पहुडलेले तान्हुले नवजीवनाची नवजीवनाची चैतन्यकिरणे उजळीत लडिवाळ हसेल हीच आशा आता कृष्णजन्मादिवशी प्रत्येकाच्या मनी असेल.