भाजप आमदारासह ५ जण नक्षली हल्ल्यात ठार

0
123

छत्तीसगडमधील दंत्तेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजपचे आमदार भीमा मांडावी तसेच त्यांच्या वाहन ताफ्यातील ४ सुरक्षा रक्षक ठार झाले. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर नक्षलवाद्यांनी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली होती. तरीही हा हल्ला झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

आमदार भीमा मांडावी यांच्या बुलेटप्रुफ वाहनावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला चढविण्यात आल्याचे वृत्त आहे. मांडावी यांच्या वाहनांचा ताफा बचेली भागातून कुवाकोंडा येथे जातेवेळी शामागिरी टेकडीजवळ पोचले असताना नक्षलवाद्यांनी मार्गावर पेरलेल्या आयईडी स्फोटकांच्या स्फोटामुळे मांडावी यांच्या वाहनाच्या ठिकर्‍या उडाल्या. नक्षलवाद्यांनी ताफ्यावर गोळीबारही केला.
दंतेवाडा जिल्हा हा लोकसभेच्या बस्तर मतदारसंघात असून तेथे येत्या दि. ११ रोजी मतदान होणार आहे.