भाजपकडून निवडणुकीत पैशांचा वापर ः कॉंग्रेस

0
115

पणजी पोट निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पणजीतील मतदारांची दिशाभूल करण्यासाठी भाजपकडून दोन लोकसभा आणि तीन विधानसभेच्या मिळून राज्यातील पाचही जागांवर भाजपचा विजय होणार असे वातावरण तयार केले जात आहे. भाजपने निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला. म्हापसा, मांद्रे, शिरोडा मतदारसंघात पैशांचा वापर केला, अशी टिका गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केला.

मांद्रे, म्हापसा, शिरोडा या मतदारसंघातील पोट निवडणुकीत मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. काहींना नोकर्‍यांची आमिषे दाखविण्यात आली. भाजपच्या आमिषांना स्वाभिमानी मतदार बळी पडला नाही. त्यामुळे दोन लोकसभा आणि तीन पोट निवडणुकीत कॉंग्रेसचा विषय निश्‍चित आहे, असा दावा चोडणकर यांनी केला.
कॉंग्रेस पक्षाने आता पणजी मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केले आहे. निवडणूक निकालानंतर राज्यात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येणार आहे, असा दावा चोडणकर यांनी केला.

पणजीतील समस्यांबाबत पर्रीकर अपयशी
पणजीच्या २०१७ च्या पोट निवडणुकीत दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ३६५ दिवसात पणजीतील सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाची पूर्तता करण्यात पर्रीकर यांना यश आले नाही. पणजीतील नागरिकांनी पाणी, रस्ते, वीज या सारख्या प्राथमिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.

पणजी शहरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली राबविण्यात येणार्‍या विविध विकास प्रकल्पातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला जाणार आहे. पणजीत विकासकामे अपूर्णावस्थेत आहेत, असेही चोडणकर यांनी सांगितले.
उत्तर गोव्यातील मतदान केंद्रावर कॉंग्रेसचे एजंट नव्हते, असा दावा भाजपकडून केला जात आहे. यावर बोलताना चोडणकर यांनी सांगितले की, सर्वच मतदान केंद्रावर कॉंग्रेसचे एजंट कार्यरत होते. केवळ पर्वरी १० मतदान केंद्रावर एजंट नव्हते. या केंद्राची जबाबदारी दिलेली व्यक्ती अखेरच्या क्षणी गायब झाली, असे चोडणकर यांनी सांगितले.

कॉंग्रेस पक्ष घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता. आता, भाजपने घराणेशाहीला प्रोत्साहन देण्याचे काम सुरू केले आहे. या विषयावर भाजपने स्पष्टीकरण करण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.

म्हापशात कॉंग्रेसचा विजय नक्की ः कांदोळकर
म्हापसा मतदारसंघातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे विजय निश्‍चित आहे, असे कॉंग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांनी सांगितले. मांद्रे मतदारसंघात विजय निश्‍चित आहे, असे उमेदवार बाबी बागकर यांनी सांगितले.